Type Here to Get Search Results !

चाळीतली शाळा

 चाळीतली शाळा... 

आणि माझं हरवलेलं बालपण


*भाग १* - खिमजी विश्राम बिल्डिंग,

            माझी आई आणि शाळेची पहिली घंटा.


काही ठिकाणं अशी असतात की, ती फक्त नकाशावरची जागा नसतात; ती आपल्या आयुष्याचा एक भाग असतात. त्या जागेवरून आपण कितीही दूर गेलो, कितीही मोठे झालो, तरी मन मात्र पुन्हा पुन्हा तिथेच जाऊन बसतं. 


डोळे मिटले की त्या जागेचे आवाज ऐकू येतात, त्या भिंती दिसतात, त्या गल्ल्या दिसतात, आणि नकळत ओठांवर हसू तरळतं. कधी डोळ्यांत पाणीही येतं.


माझ्यासाठी अशीच एक जागा म्हणजे दक्षिण मुंबईतील शिवडी विभागातली खिमजी विश्राम बिल्डिंग.


आजच्या पिढीला ती कदाचित एक जुनी चाळ वाटेल; पण आमच्यासाठी ती चाळ नव्हती, ती आमचं विश्व होतं. आमचं गाव होतं. आमचं बालपण होतं.


सन १९२५ च्या आसपास गिरणी कामगार आणि गोदी कामगारांसाठी ही तीन मजली इमारत बांधण्यात आली. जवळजवळ १०१ खोल्यांची ती इमारत. प्रत्येक खोलीत एक कुटुंब. प्रत्येक कुटुंबामागे संघर्षाची कहाणी. सकाळी लवकर कामावर जाणारे वडील, घर सांभाळणाऱ्या आया, गॅलरीत खेळणारी मुलं, सण-उत्सवात एकत्र येणारे शेजारी हीच त्या चाळीची खरी ओळख होती.


त्या काळात पैशांची श्रीमंती नव्हती, पण माणुसकी अफाट होती.


कॉमन टॉयलेट होतं, कॉमन नळ होता, पण सुख-दुःख'ही कॉमनच होतं.


एखाद्या घरात आनंद असला की संपूर्ण चाळ आनंदी व्हायची. एखाद्या घरात दुःख आलं की सगळे धावून यायचे. कोणाचं मूल आजारी पडलं तर दुसऱ्या घरातली आई रात्रभर जागायची. कुणाच्या घरी पाहुणे आले तर शेजारच्या घरातून ताट-वाट्या यायच्या. नात्यांना कुलूप नव्हतं, दारं उघडी होती आणि मनं तर त्याहून'ही उघडी होती.


या चाळीचं आणखी एक वैशिष्ट्य होतं.


तिसऱ्या मजल्यावरच बृहन्मुंबई महानगरपालिकेची साऊथ शिवडी प्राथमिक विद्यालय भरायची.


आजच्या मुलांना शाळेत जायला बस लागते, व्हॅन लागते, काहींना तर कार'ही लागते. आम्हाला मात्र घराबाहेर पडायचं, दोन मजले चढायचे आणि शाळा यायची.


इतकी जवळ शाळा असूनही शाळेत जाण्याचा कंटाळा मात्र रोज यायचाच,


सन १९७२.- माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा दिवस.


आईने माझा हात धरला आणि पहिल्यांदाच मला शाळेत घेऊन गेली.


माझं खरं नाव अविनाश. पण घरात सगळे मला प्रेमाने राजू म्हणायचे.


शाळेत शिक्षकांनी आईला विचारलं, मुलाचं नाव काय ?


आईने क्षणाचाही विचार न करता उत्तर दिलं, - राजू.


आणि त्या दिवसापासून माझं नाव शाळेच्या नोंदवहीत कायमचं राजू कुंडलिक शिंदे असंच झालं.


आज मागे वळून पाहताना वाटतं. त्या एका उत्तराने माझी शालेय ओळख बदलली; पण आयुष्याची ओळख मात्र अधिक सुंदर झाली.


माझ्यापूर्वी माझी भावंडं आणि मोठे भाऊ अशोक शिंदे यांचंही शिक्षण याच शाळेत झालं होतं. त्यामुळे आमच्या घराचं आणि त्या शाळेचं नातं जणू रक्ताचंच होतं.


आम्ही पहिल्या मजल्यावर राहत होतो. सकाळी सातची घंटा वाजली की आमच्या घरात एकदम धांदल उडायची.


राजू... उठ, उशीर होतोय. आईचा आवाज अजूनही कानात तसाच घुमतो.


खरं सांगायचं तर मला शाळेत जायचा प्रचंड कंटाळा यायचा. रोज नवनवीन कारणं शोधायचो.


आज पोट दुखतंय...

आज डोकं दुखतंय...

आज नाही जात...


पण आई म्हणजे आई. तिच्यासाठी मुलाचं शिक्षण ही तडजोड करण्याची गोष्टच नव्हती.


ती प्रेमळ होती, पण तितकीच कणखरही होती. आज माझी आई वयाच्या उत्तरार्धात अहमदनगर येथे सुखरूप राहते. तिचे केस पांढरे झाले आहेत, चालणं थोडं मंदावलं आहे; पण तिच्या डोळ्यांतली माया आजही तशीच आहे. आज तिच्याशी बोलताना त्या दिवसांची आठवण झाली की आम्ही दोघंही नकळत हसतो.


पण त्या वेळी. त्या वेळी तिच्या रागाचा आम्हाला खूप राग यायचा.


एक दिवस तर मी हट्टालाच पेटलो. आज काही केल्या शाळेत जाणार नाही.


मी रडलो. रुसलो.

जमिनीवर बसलो. पण आईने काही ऐकलं नाही.


तिने माझा हात घट्ट धरला आणि अक्षरशः ओढत-ओढत जिन्याकडे घेऊन जाऊ लागली.


त्या काळी आमच्या चाळीचा जिना लोखंडी पायऱ्यांचा होता. मी हात झटकण्याचा प्रयत्न करत होतो.


अचानक माझा हात आईच्या हातातून सुटला आणि क्षणार्धात मी धाडकन त्या लोखंडी पायऱ्यांवर पडलो.


माझी हनुवटी थेट पायरीवर आदळली. क्षणात रक्ताची धार लागली.


आई घाबरली. तिने मला उचललं. घरात आणलं. जखमेवर तात्पुरती मलमपट्टी केली. मला वाटलं...


झालं, आज शाळा बुडाली. पण आईच्या मनात वेगळंच चाललं होतं./तिने माझ्या डोक्यावरून हात फिरवला, डोळ्यांतलं पाणी पुसलं आणि म्हणाली,


चल... आता शाळेत.

रक्त थांबलं होतं. पण माझा हट्टही तिथेच थांबला.


त्या दिवशी हनुवटीवर जखम घेऊन मी शाळेत गेलो. त्या वेळी आईचा खूप राग आला होता.


पण आज, आयुष्याच्या या टप्प्यावर उभा राहून वाटतं. जर त्या दिवशी आई माझ्या हट्टापुढे हरली असती, तर कदाचित आयुष्यभर मी हट्टच शिकलो असतो.


तिने मला शाळेत पाठवलं. म्हणून आयुष्याने मला माणूस बनवलं.


आजही माझ्या हनुवटीवरची ती छोटीशी खूण आरशात दिसली की लोखंडी जिना आठवतो. आईचा घट्ट धरलेला हात आठवतो.


आणि तिच्या त्या कठोर वाटणाऱ्या प्रेमापुढे नकळत माझं मस्तक झुकतं.


त्या वेळी तो राग वाटायचा...

आज कळतं, तो राग नव्हता. ती एका आईची आपल्या मुलाच्या भविष्यावरची अढळ श्रद्धा होती.


आणि म्हणूनच आजही मी मनोमन म्हणतो, आईने त्या दिवशी मला हाताला धरून शाळेत नेलं नव्हतं. तिने मला आयुष्याच्या योग्य वाटेवर नेलं होतं.


*क्रमश .....*

Post a Comment

0 Comments