*वास्तूचा स्वभाव जन्माला कसा येतो?*
मित्रांनो...
प्रत्येक जागेचा
एक स्वभाव असतो...
स्वभाव म्हणजे कॅरेक्टर... एक feel...
ICU चा स्वभाव वेगळा.
मॉलचा स्वभाव वेगळा.
ढाब्याचा स्वभाव वेगळा.
मंदिराचा स्वभाव वेगळा.
आजीच्या घराचा स्वभाव वेगळा.
आणि...
त्या प्रत्येक जागेत गेल्यावर
आपल्यामध्येही काहीतरी बदलतं.
आपला आवाज बदलतो.
आपला श्वास बदलतो.
आपला वेग बदलतो.
आपली नजर बदलते.
आपली चाल बदलते.
आपली एकूण अवस्था बदलते.
पण शेवटी
एक प्रश्न उभा राहिला होता...
एखाद्या वास्तूचा स्वभाव/कॅरेक्टर
जन्माला कसा येतो?
तो भिंतींमधून येतो?
रंगांमधून येतो?
फर्निचरमधून येतो?
दिशांमधून येतो?
की...
तो काही वेगळ्याच गोष्टीतून
हळूहळू जन्माला येतो?
मुळात एक गोष्ट लक्षात घ्या की
एखाद्या वास्तूचा स्वभाव
एका दिवसात तयार होत नसतो.
तो अचानक जन्माला येत नाही.
तो हळूहळू तयार होत असतो.
जसा एखाद्या खोलीत
रोज धूप लावला...
तर काही दिवसांनी
त्या खोलीच्या पडद्यांना,
लाकडाला,
भिंतींना,
हवेतील सूक्ष्म कणांनाही
तो सुगंध लागतो.
जसा एखाद्या घरात
वर्षानुवर्षं मसाल्याची फोडणी झाली...
तर दार उघडताच
आपल्याला त्या घराचा
एक वेगळाच वास येतो.
जसं जुन्या पुस्तकांच्या कपाटाला कागदाचा,शाईचा,
धुळीचा,आणि काळाचा
एक मंद गंध असतो.
जसं जुन्या मंदिराच्या दगडात घंटांचा नाद,पावलांचा स्पर्श,धूपाचा धूर,आणि शेकडो नमस्कारांची शांतता
जणू कुठेतरी साठलेली असते.
तसंच...
घरात रोज जगल्या जाणाऱ्या अवस्था
त्या घराच्या अदृश्य त्वचेवर
हळूहळू बसत जातात... मुरत जातात.
त्या दिसत नाहीत.
पण जाणवतात.
त्या ऐकू येत नाहीत.
पण मनाच्या आत
त्यांचा नाद उठतो.
त्या हाताला लागत नाहीत.
पण शरीराला
त्यांचा स्पर्श जाणवतो.
वास्तूचा स्वभाव
असाच तयार होतो.
हळूहळू.
दररोज.
वारंवार.
ज्या घरात
रोज सकाळची सुरुवात
घाईगडबडीत होते...
अलार्मचा तीक्ष्ण आवाज.
मोबाईलवरच्या नोटिफिकेशन्स.
बाथरूमच्या दारावरची टकटक.
स्वयंपाकघरात
घाईघाईने ठेवलेली भांडी.
गॅसवरचा कूकर.
शिट्टीवर शिट्टी.
“लवकर कर!”
“किती वेळ लावतोस ?”
“आता पुन्हा उशीर होणार!”
“कुठे ठेवलंस?”
“काहीच नीट ठेवत नाहीस!”
दिवसाची पहिली वाक्यं
जर अशी चिडचिडीची असतील...
पहिला स्पर्श
जर घाईचा असेल...
पहिली नजर
जर दोष शोधणारी असेल...
पहिला श्वास
जर ताणाचा असेल...
तर त्या घराची सकाळ
फक्त सकाळ राहत नाही.
ती एक वातावरण बनते.
मग मुलं त्या वातावरणात उठतात.
मोठी माणसं त्या वातावरणात बोलतात.
चहा त्या वातावरणात पिला जातो.
डबा त्या वातावरणात भरला जातो.
देवापुढे तसाच दिवा लावला जातो...
पण मनात दिवा लावायला वेळ नसतो.
घरात प्रकाश असतो.
पण प्रसन्नता नसते.
आवाज असतो.
पण संवाद नसतो.
व्यवस्था असते.
पण विसावा नसतो.
ज्या घरात
प्रत्येक गोष्टीत ताण असतो...
जिथे मुलांशी बोलताना
काळजीपेक्षा नियंत्रण जास्त असतं...
जिथे पैशांबद्दल बोलताना
विश्वासापेक्षा भीती जास्त असते...
जिथे नात्यांमध्ये
संवादापेक्षा अबोला जास्त असतो...
जिथे शांतता असली
तरी ती शांतता नसून
दाबलेला राग असतो...
जिथे जेवताना
ताटात अन्न असतं,
पण टेबलावर ऊब नसते...
जिथे देवघरात दिवा असतो,
पण घरात देवभाव जागृत नसतो...
त्या घराचा स्वभाव
हळूहळू तसाच होऊ लागतो.
तुम्ही त्या घरात प्रवेश करता...
आणि काहीतरी जड वाटतं.
काहीतरी बंद वाटतं.
जणू हवा हलत नाही.
जणू भिंती ऐकून थकल्या आहेत.
जणू खुर्च्यांवर बसलेल्या शरीरांपेक्षा
न बोललेली वाक्यं जास्त जड झाली आहेत.
जणू खिडक्या उघड्या आहेत...
पण मनं बंद आहेत.
कधी कधी
त्या घरात सगळं असतं.
सुंदर फर्निचर असतं.
महागडे पडदे असतात.
छान रंग असतात.
मोठा टीव्ही असतो.
स्वच्छ फरशी असते.
देवघर असतं.
सुविधा असतात.
पण तरीही...
त्या घरात विसावा नसतो.
कारण
विसावा वस्तूंमधून जन्माला येत नसतो.
विसावा
त्या घरात दररोज जगल्या जाणाऱ्या अवस्थेतून
जन्माला येतो.
आता आपण
दुसरं घर पाहूया.
सकाळ होते.
खिडकीतून येणारा
मऊ प्रकाश
फरशीवर पडतो.
कोणीतरी शांतपणे
पाण्याचा ग्लास भरतं.
स्वयंपाकघरातून
फोडणीचा मंद आवाज येतो.
जिऱ्याचा वास.
चहाचा सुगंध.
एखादं हलकंसं गाणं.
एखाद्याचा मंद आवाज...
“झोप नीट झाली का?”
“आज थोडं हळू घे.”
“घाई नाही.”
“बस, आधी चहा घे.”
या घरातही कामं आहेत.
जबाबदाऱ्या आहेत.
थकवा ही आहे.
कधी मतभेदही आहेत.
पण तिथे
प्रत्येक मतभेद भांडण होत नाही.
प्रत्येक चूक अपमान होत नाही.
प्रत्येक उशीर दोष होत नाही.
प्रत्येक शांतता दुरावा होत नाही.
तिथे लोक एकमेकांना
पूर्णपणे समजतातच असं नाही.
पण ऐकण्याचा प्रयत्न करतात.
तिथे रोज मोठमोठ्या पूजा होत नसतीलही
पण...
कृतज्ञतेचे छोटे क्षण असतात.
तिथे सर्व काही परिपूर्ण नसतं.
पण मन मोकळं करण्यासाठी
थोडी जागा असते.
थोडं हसणं असतं.
थोडा स्वीकार असतो.
थोडं प्रेम असतं.
थोडी प्रार्थना असते.
थोडं “चालेल” असतं.
थोडं “मी आहे” असतं.
आणि त्या थोड्या थोड्या गोष्टी
दररोज त्या घरात साठत जातात.
जसा धूपाचा धूर
हळूहळू खोलीच्या हवेत मिसळतो...
तशी सौम्यता
त्या घराच्या वातावरणात मिसळु लागते.
जशी सकाळची सूर्यकिरणं
दररोज त्याच खिडकीतून येतात...
तसा विश्वास
त्या घराच्या नात्यांवर पडत राहतो.
जसा चहाचा वास
कपांच्या भोवती थांबतो...
तशी ऊब
त्या घराच्या संवादांभोवती स्थिरावु लागते.
आणि मग
त्या घराचा स्वभावही
हळूहळू तसाच होत जातो.
तिथे गेल्यावर
शरीर रिलॅक्स होतं.
श्वास मोकळा होतो.
खांदे थोडे खाली येतात.
आवाजाला कोमलता येते.
मनाला आधार वाटतो.
आणि कधी कधी
आपल्याला स्पष्ट सांगताही येत नाही...
पण आपण म्हणतो...
“या घरात काहीतरी छान वाटतं.”
मित्रांनो...
ते “काहीतरी”
वेगळं नसतं.
ते त्या घरात
वारंवार जगल्या गेलेल्या जीवनाची
प्रतिध्वनी असते.
ते त्या घरात
वर्षानुवर्षं फिरलेल्या शब्दांचा नाद असतो.
ते तिथे शिजलेल्या अन्नाचा भाव असतो.
ते तिथे सांडलेल्या अश्रूंची शांत ओल असते.
ते तिथे व्यक्त झालेल्या प्रेमाची ऊब असते.
ते तिथे वारंवार आठवलेल्या देवाची मूक उपस्थिती असते.
ते तिथे रोज परत परत जगल्या गेलेल्या
अवस्थांचं अदृश्य संगीत असतं.
म्हणूनच
मला असं वाटतं...
वास्तूचा स्वभाव
वास्तूत ठेवलेल्या वस्तूंमुळे
काही प्रमाणात निश्चित घडतो.
वास्तूची रचना,
दिशा,
प्रकाश,
हवा,
स्वच्छता,
रंग,
व्यवस्था...
यांचा परिणाम नक्कीच असतो.
पण...
वास्तूचा खरा स्वभाव
फक्त या गोष्टींनी ठरत नाही.
तो ठरतो...
त्या जागेत
दररोज कोणत्या अवस्थेतून जगलं जातं
यावर.
त्या घरात
रोज काय बोललं जातं?
कशा भावनेतून बोललं जातं?
आवाजाचा सूर कसा असतो?
शांततेचा अर्थ काय असतो?
ताटात अन्न ठेवताना
हातात कृतज्ञता असते
की फक्त कर्तव्य?
मुलांना हाक मारताना
प्रेम असतं
की त्रागा ?
देवापुढे बसताना
नमतं काय?
शरीर...
की मन?
रात्री झोपताना
घर शांत होतं
की फक्त आवाज बंद होतात?
किती वेळा भीती जगली जाते?
किती वेळा विश्वास जगला जातो?
किती वेळा राग साठवला जातो?
किती वेळा प्रेम व्यक्त केलं जातं?
किती वेळा कृतज्ञता आठवली जाते?
किती वेळा घर फक्त वापरलं जातं...
आणि किती वेळा
घराशी नातं जोडलं जातं?
हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे.
कारण
अनेक लोक वास्तूकडे
फक्त एक वस्तू म्हणून पाहतात.
एक प्रॉपर्टी.
एक फ्लॅट.
एक बंगला.
एक जागा.
एक गुंतवणूक.
एक पत्ता.
पण भारतीय मनाने
घराकडे कधीही फक्त वस्तू म्हणून पाहिलं नाही.
आपण सहज म्हणतो...
या घरात वास आहे.
या घरात ऊब आहे.
या घरात प्रसन्नता आहे.
या घरात शांतता आहे.
या घरात देवपण आहे.
किंवा...
या घरात काहीतरी जड आहे.
या घरात ताण आहे.
या घरात अस्वस्थता आहे.
या घरात मन लागत नाही.
हे शब्द सहज आलेले नाहीत.
या शब्दांमागे
मानवी अनुभवाची खूप खोल जाण आहे.
“वास” म्हणजे फक्त सुगंध नाही.
वास म्हणजे
त्या जागेत काहीतरी राहिलं आहे.
काहीतरी साठलं आहे.
काहीतरी पुन्हा पुन्हा जगलं गेलं आहे.
जसा चंदनाचा गंध
लाकडात राहतो...
जसा पावसाचा ओलावा
मातीमध्ये राहतो...
जशी आईची ओढ
जुन्या साडीच्या घडीत राहते...
जसा आजोबांचा स्पर्श
जुन्या खुर्चीच्या हातावर राहतो...
तसा माणसांच्या जगण्याचा वास
वास्तूमध्ये राहतो.
कधी तो भीतीचा असतो.
कधी ताणाचा.
कधी अबोल्याचा.
कधी प्रेमाचा.
कधी प्रार्थनेचा.
कधी कृतज्ञतेचा.
कधी संघर्षाचा.
कधी सौम्यतेचा.
आणि त्या वासातूनच
वास्तूचा स्वभाव जन्माला येतो.
म्हणूनच...
वास्तूचा स्वभाव
आकाशातून पडत नाही.
तो फक्त नकाशातून येत नाही.
तो फक्त दिशांमधून येत नाही.
तो फक्त रंगांमधून येत नाही.
तो जन्माला येतो...
रोज उघडणाऱ्या दारातून.
रोज उच्चारल्या जाणाऱ्या शब्दांतून.
रोज शिजणाऱ्या अन्नातून.
रोज साठणाऱ्या शांततेतून.
रोज घुमणाऱ्या रागातून.
रोज दिल्या जाणाऱ्या क्षमेतून.
रोज लावल्या जाणाऱ्या दिव्यातून.
रोज विसरल्या जाणाऱ्या कृतज्ञतेतून.
रोज व्यक्त होणाऱ्या प्रेमातून.
आणि रोज नकळत जगल्या जाणाऱ्या अवस्थेतून.
वास्तू
फक्त बाहेरून घडत नाही.
वास्तू आतूनही घडते.
आणि त्या आतल्या वास्तूचे शिल्पकार
आपणच असतो.
आपली वाणी.
आपला श्वास.
आपली भावावस्था.
आपले संबंध.
आपली कृतज्ञता.
आपली भीती.
आपली प्रार्थना.
आपला राग.
आपला स्पर्श.
आपली उपस्थिती.
हे सगळं
घराच्या अदृश्य वातावरणात
थोडं थोडं उतरू लागतं.
आणि मग
ती जागा आपल्याशी
तशीच बोलू लागते.
म्हणून
कधी कधी
आपण घरात पाऊल टाकतो...
आणि काहीही कारण नसताना
अस्वस्थ होतो.
किंवा...
एखाद्या जागेत बसताच
आपल्याला शांत वाटतं.
आपण म्हणतो...
“या घरात काहीतरी आहे.”
हो.
आहे.
पण ते काहीतरी
फक्त घराचं नाही.
ते त्या घरात राहणाऱ्या माणसांचंही आहे.
वास्तू
माणसाला घडवते...
हे खरं आहे.
पण त्याच वेळी...
माणूसही
वास्तूला घडवत असतो.
आणि हाच
वास्तू उपासनेचा
अत्यंत महत्त्वाचा बिंदू आहे.
वास्तूचं वातावरण बदलायचं असेल...
तर फक्त वस्तू बदलू नका.
त्या वास्तूत
तुम्ही रोज कोणती अवस्था जगता
हे पाहायला सुरुवात करा.
घरात प्रवेश करताना
तुम्ही काय घेऊन येता त्याबद्दल जागरूक व्हा?
थकवा?
राग?
अधीरता?
भीती?
अपमान?
बाहेरचा गोंगाट?
की...
जाणीव?
कृतज्ञता?
शांत श्वास?
प्रेमळ उपस्थिती?
घरात तुमचा आवाज
कसा फिरतो?
तुमचे शब्द
भिंतींवर कसे पडतात?
तुमचा राग
किती वेळ वातावरणात थांबतो?
तुमची प्रार्थना
किती वेळ त्या जागेत स्थिरावते?
तुमची कृतज्ञता
त्या घराला कधी स्पर्श करते का?
मित्रांनो...
आजसाठी एवढंच पाहा.
तुमच्या घरात
वारंवार काय जगलं जातं?
तुमच्या घरात
कशाचा वास जास्त आहे?
भीतीचा?
ताणाचा?
अबोल्याचा?
की...
प्रेमाचा?
प्रार्थनेचा?
कृतज्ञतेचा?
सौम्यतेचा?
हा प्रश्न साधा आहे.
पण जर तो प्रामाणिकपणे विचारला...
तर तो
वास्तूकडे पाहण्याची तुमची दृष्टी
पूर्णपणे बदलू शकतो.
कारण
वास्तूचा स्वभाव
एका दिवसात निर्माण होत नाही.
तो
दररोजच्या जगण्यातून जन्माला येतो.
आणि...
जिथे जगणं बदलतं...
तिथे वास्तूचा स्वभावही
हळूहळू बदलायला सुरुवात करतो.
मित्रांनो...
आजकाल समाजामध्ये
वास्तूविषयीची जागरूकता
मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
लोक घराची दिशा पाहतात.
स्वयंपाकघर कुठे आहे ते पाहतात.
शयनकक्ष,
टॉयलेट,
जिने,
दरवाजे,
खिडक्या...
सगळ्याचा विचार करतात.
वास्तूदोष दूर करण्यासाठी
वेगवेगळे उपायही करतात.
त्यांच्या दृष्टिकोनातून हे सगळं योग्य असेलही.
पण...
एक प्रश्न मात्र
आपण स्वतःला क्वचितच विचारतो.
मी रोज
माझ्या वास्तूला
काय अर्पण करत आहे?
माझे विचार...
माझ्या भावना...
माझी भीती...
माझा राग...
माझी कृतज्ञता...
माझी प्रार्थना...
माझी उपस्थिती...
माझी दानत....
यांनी
मी माझ्या वास्तूचा स्वभाव
दररोज कसा घडवत आहे?
माझ्या मते...
हा प्रश्न समजला...
तर
वास्तूकडे पाहण्याची आपली दृष्टी
पूर्णपणे बदलू शकते.
ही लेखमाला
याच शोधाचा
एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
जर ती
घाईघाईने न वाचता...
मनन,
चिंतन
आणि अनुभवातून समजून घेतली...
तर
कदाचित तुम्हाला
तुमच्या वास्तूची भाषा
हळूहळू समजू लागेल.
आणि...
ज्या दिवशी
वास्तूची भाषा समजू लागेल...
त्या दिवशी
वास्तूचा अर्थ समजून घेण्यासाठी
तुम्हाला कोणाच्याही आधाराची गरज उरणार नाही.
कारण...
त्या दिवसापासून
तुम्हीच
तुमच्या वास्तूचे
सर्वात जागरूक अभ्यासक
आणि सर्वात योग्य मार्गदर्शक असाल
Post a Comment
0 Comments