Type Here to Get Search Results !

कथा

 रात्रभर जागणारी पिढी आणि गप्प होत चाललेले पालक


रात्रीचे एक दोन वाजलेले असतात. घरातले सगळे दिवे बंद असतात. फक्त एका खोलीतून थोडासा अंधुकस लाइट  बाहेर पडत असतो. आईला मधेच जाग आलेली असते. ती उठते, पाणी पिते आणि सहज मुलाच्या किंवा मुलीच्या खोलीत डोकावून पाहते. हातात मोबाईल असतो. कानात इयरफोन. स्क्रीनवर काहीतरी सुरू असतं. वेळेचं भान हरवलेलं असतं.

“अजून झोपला नाहीस?”आईचा प्रश्न.“हो ना… पाच मिनिटांत झोपतो.”हे पाच मिनिटं मग एक तास होतात. दोन तास होतात. आणि शेवटी रात्र संपते.

हे दृश्य आज अनेक घरांमध्ये रोज घडतं आहे.

सकाळी दहा-अकरा वाजेपर्यंत झोप. उठल्यावर चहा हातात आणि पुन्हा मोबाईल. शरीर जागं झालेलं असतं, पण दिवसाची लय हरवलेली असते.

रात्रभर जागणं, सकाळी उशिरा उठणं, दिवसाची सुरुवातच दुपारच्या सुमारास होणं आणि मग पुन्हा रात्री उशिरापर्यंत मोबाईल, लॅपटॉप किंवा स्क्रीनसमोर बसणं हे अनेक मुलांचं रूटीन बनलं आहे.

काळ बदलला आहे, तंत्रज्ञान बदललं आहे, जीवनशैली बदलली आहे. हे सगळं मान्य आहे. पण माणसाच्या शरीराच्या गरजा बदललेल्या नाहीत. शरीराला विश्रांती हवीच असते. मनाला शांत झोप हवीच असते. डोळ्यांना अंधार हवा असतो. मेंदूला पुनरुज्जीवनासाठी वेळ हवा असतो.

पण आजची पिढी जणू स्वतःच्या शरीराशीच स्पर्धा करत आहे.

आमच्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे वेगळंच जग होतं. रात्री गच्चीवर झोपायचं. तारांकडे पाहत गप्पा मारायच्या. सकाळी सूर्य उगवण्याआधीच जाग यायची. पक्ष्यांचा आवाज याने दिवस सुरू व्हायचा. अंगात उत्साह असायचा. दिवसभर खेळणं, वाचन, भटकंती, गप्पा यात वेळ जायचा.

आज अनेक मुलांना सूर्योदय पाहण्याची सवयच राहिलेली नाही. पहाट म्हणजे काय, सकाळची प्रसन्नता म्हणजे काय, पक्ष्यांचा किलबिलाट म्हणजे काय, याचा अनुभवच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही.

आणि याचं दुःख फक्त जुन्या आठवणींचं नाही. त्याचा संबंध त्यांच्या आरोग्याशी, मानसिक स्थितीशी आणि भविष्यातील जीवनशैलीशी आहे. पण आजची पिढी जणू रात्रीला दिवस आणि दिवसाला रात्र मानू लागली आहे.

पालक म्हणून आम्ही हे सगळं पाहत असतो.सुरुवातीला आम्ही सांगतो.खूप प्रेमाने सांगतो.नंतर समजावतो.पुन्हा पुन्हा सांगतो.कधी रागावतो.कधी विनवणी करतो.पण आजकाल मुलांकडेही प्रत्येक गोष्टीचं उत्तर तयार असतं.

“आम्हाला माहिती आहे.”

“तुम्ही काळजी करू नका.”

“सगळेच असं करतात.”

“आमच्या जनरेशनचं लाइफ वेगळं आहे.”

ही उत्तरं ऐकताना पालक शांत होतात. पण त्यांचं मन मात्र शांत नसतं. कारण अनुभवाने त्यांना माहीत असतं की शरीरावर अन्याय केला की त्याची किंमत कधीतरी मोजावी लागते.

वीस-पंचवीस वर्षांच्या वयात काही परिणाम जाणवत नाहीत. पण सततची अपुरी झोप, अस्थिर दिनचर्या, शारीरिक हालचालींचा अभाव, स्क्रीनचा अतिरेक आणि मानसिक ताण याची छोटी छोटी बीजं नकळत पेरली जात असतात.

उद्या त्याच बीजांचं झाड उभं राहतं.चिडचिड वाढते.एकाग्रता कमी होते.उत्साह हरवतो.नात्यांमध्ये संवाद कमी होतो.आत्मविश्वास डळमळतो.आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवनातील साध्या साध्या गोष्टींमधला आनंद हरवायला लागतो.

पण पालकांना सर्वात जास्त वेदना या परिणामांची नसते.

त्यांना वेदना असते ती आपल्या मुलांपर्यंत पोहोचता न येण्याची.

प्रत्येक पिढीला वाटतं की पालक आपल्याला समजून घेत नाहीत. पण सत्य हे आहे की आई-बाबा मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न आयुष्यभर करत असतात.

लहानपणी मुलांच्या रडण्याचा अर्थ समजून घेतात.शाळेतल्या भीतीचा अर्थ समजून घेतात.पहिल्या अपयशाचं दुःख समजून घेतात.पहिल्या प्रेमाची चाहूलही ओळखतात.मुलं काही बोलली नाहीत तरी त्यांच्या चेहऱ्यावरून मनातील गोष्ट वाचतात.

मग एक वेळ अशी येते की तीच मुलं मोठी होतात आणि म्हणतात,

“तुम्हाला काहीच समजत नाही.”हे वाक्य पालकांच्या मनाला सर्वाधिक जखम करतं. कारण त्यांना माहिती असतं की त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मुलांना समजून घेण्यात घालवलं आहे.

आई-बाबा मुलांच्या आयुष्यातील शत्रू नसतात.

ते त्यांच्या स्वप्नांचे खरे साक्षीदार असतात. त्यांच्या यशासाठी प्रार्थना करणारे पहिले लोक असतात.त्यांच्या अपयशाने आतून तुटणारेही तेच असतात.

मुलं आजारी पडली की रात्रभर जागणारे तेच.

मुलांना यश मिळालं की स्वतःपेक्षा जास्त आनंदी होणारे तेच.

मग ते रात्रभर जागू नकोस असं सांगतात, तेव्हा त्यामागे नियंत्रण ठेवण्याची इच्छा नसते.

त्यामागे प्रेम असतं.

काळजी असते.

अनुभव असतो.

आणि एक निःस्वार्थ भीती असते

“आपल्या मुलाला काही त्रास होऊ नये.”

पण सतत समजावूनही जेव्हा काही बदल होत नाही, तेव्हा पालक हळूहळू गप्प होऊ लागतात.

मुलांना वाटतं की आता त्यांना काही फरक पडत नाही.

पण खरं तर त्यांना खूप फरक पडत असतो.

फक्त त्यांना कळून चुकलेलं असतं की आता शब्दांची ताकद संपली आहे.

आता अनुभवच शिकवणार आहे.

हे गप्प होणं म्हणजे हार नाही.

तो एक प्रकारचा दुःखी स्वीकार असतो.

ज्यादिवशी पालक बोलणं कमी करतात, त्यादिवशी त्यांच्या मनातली काळजी संपलेली नसते.

उलट ती आणखी वाढलेली असते.

कारण आई-वडील असणं ही अशी अवस्था आहे की मुलं पन्नास वर्षांची झाली तरी त्यांची काळजी संपत नाही.

त्यांच्या वयाबरोबर काळजीचं स्वरूप बदलतं, पण काळजी कधीच संपत नाही.

म्हणूनच आजच्या मुलांना एक विनंती आहे.

आई-बाबांचं प्रत्येक म्हणणं मान्य करा असं नाही.

प्रत्येक गोष्टीत त्यांच्याशी सहमत व्हा असंही नाही.

स्वतःचे विचार ठेवा.

स्वतःचे निर्णय घ्या.

स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगा.

पण कधीतरी त्यांच्या बोलण्यात दडलेलं प्रेम ऐकण्याचा प्रयत्न करा.

कारण आयुष्यात अशी एक वेळ येते, जेव्हा आई-बाबांनी सांगितलेल्या अनेक गोष्टींचा अर्थ अचानक समजू लागतो.

आणि मग मनात एकच खंत राहते—

“हे तेव्हा समजलं असतं तर किती बरं झालं असतं.”

आजही अनेक घरांमध्ये एखादी आई रात्री उठून मुलाच्या खोलीत डोकावते.

एखादा बाबा सकाळी उशिरापर्यंत झोपलेल्या मुलाकडे पाहून न बोलता निघून जातो.

ते काही बोलत नाहीत.

रागावत नाहीत.

वाद घालत नाहीत.

पण त्यांच्या मनात एक नि:शब्द प्रार्थना सतत सुरू असते 

“देवा, आमच्या मुलांना चांगलं आरोग्य दे. योग्य समज दे. त्यांना सुखी ठेव. आणि जे आम्ही शब्दांत सांगू शकलो नाही, ते त्यांना आयुष्य वेळेवर शिकवो.”

कारण जगातलं सर्वात निःस्वार्थ प्रेम कोणतं असेल, तर ते पालकांचं.

ते कधी उपदेशाच्या रूपात दिसतं.

कधी काळजीच्या रूपात.

कधी भांडणाच्या रूपात.

आणि कधी पूर्णपणे गप्प झालेल्या शब्दांमधूनही ते तितक्याच ताकदीने व्यक्त होत राहतं. त्यांची ही काळजीच त्यांच्या प्रेमाची सर्वात खरी भाषा असते.🆔🙏🏻

Post a Comment

0 Comments