*प्राणघातक झिंग*
(सकाळ वृत्तसेवा, १६ एप्रिल २०२६)
मुंबईच्या गोरेगाव येथे एका सांगीतिक कार्यक्रमात ड्रग्जच्या अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूची घटना अपवादात्मक मानून त्याची गांभीर्याने दखल घेण्यास टाळाटाळ करणे घातक ठरेल. संगीताचा कार्यक्रम हा खरे तर सामूहिक आनंदाचा, सर्जनशीलतेचा आणि अभिव्यक्तीचा उत्सव असतो… तोच आता नशेच्या उन्मादात बुडून जीवघेणा ठरू लागला आहे. यात गुंतलेले वेगवेगळे घटक, त्यांची साखळी आणि समाजावर होणारे त्याचे परिणाम या सगळ्याचा विचार करून सरकारला उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
अर्थात *केवळ सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही, तर पालकांची, समाजाची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.* अमली पदार्थांचा पुरवठा करणारी साखळी, त्याचा शालेय विद्यार्थ्यांपासून ते मनोरंजन विश्वातील बहुप्रतिष्ठित लोकांपर्यंत अनेकांना घातलेला *विळखा,* हे सारेच काळजीचे विषय आहेत. भारतीय संस्कृतीत संगीत परंपरा केवळ करमणुकीचे नव्हे तर अंतर्मुख करणारे माध्यम आहे. थेट आत्म्याला साद घालणारे ते आहे. संगीत चांगल्या अर्थाने रसिकांना बेधुंद करते. ती *नशा* शरीरावर हल्ला करणारी नसते; ती मनाला स्थिर करणारी, आत्म्याला समृद्ध करणारी असते. त्या नशेला कोणत्याही बाह्य आधाराची गरज नसते, कारण ती अनुभवातून, साधनेतून आणि अंतर्मनाच्या स्पंदनातून निर्माण होत असते.
'कॉन्सर्ट'च्या नावाखाली होणाऱ्या सध्याच्या कार्यक्रमांत संगीत हे केंद्रस्थानी उरलेले नाही. त्यात संगीताच्या पार्श्वभूमीवर उन्मादाची, गोंगाटाची आणि रासायनिक उत्तेजनावर्धक पदार्थांचा व्यवसाय करणारी संस्कृती रुजवून पिढीच्या पिढी नासवण्याचे काम सुरू आहे. कायदा - सुव्यवस्थेच्या चौकटीत तर कठोर कारवाई करावी लागेलच; पण हा प्रश्न त्यापलीकडचा आहे. तो म्हणजे आनंद मिळविण्याच्या, साजरा करण्याच्या बदललेल्या कल्पना. त्यामुळे आनंदाचा अर्थच बदलून गेला आहे. तो आता शांत, गहिरा आणि टिकाऊ अनुभव राहिलेला नाही; तो तीव्र झटपट आणि क्षणभंगुर झाला आहे. या बदललेल्या आनंदासाठी शरीरावर मेंदूवर थेट परिणाम करणाऱ्या पदार्थांची गरज भासते. त्या पदार्थाचे सेवन करण्याचा नाद वाढत जातो. त्यातूनच गोरेगावातील सांगीतिक कार्यक्रमामध्ये अतिसेवन केल्यामुळे दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने समाजमन सुन्न झाले आहे.
गोरेगाव येथील कार्यक्रमाच्या आयोजनात नियम पायदळी तुडवले गेले. याचा अर्थ नियमन करणाऱ्या साऱ्या यंत्रणाही नशेत झोपी गेल्या होत्या. त्यामुळेच प्रवेशद्वारावर कसून तपासणी झाली नाही. वयोमर्यादेचे उल्लंघन करून मद्य उपलब्ध करून देण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळेची अट मोडली गेली. *या सगळ्या गोष्टी अपघाती नाहीत त्या जाणीवपूर्वक केलेल्या दुर्लक्षाचे निदर्शक आहेत. नफ्याच्या, गर्दीच्या, पैशांच्या मोहात तरुणाईच्या जीवाशी खेळला गेलेला हा खेळ अतीव दुःखदायी आहे. या घटनेत सहभागी असलेले विद्यार्थी नामांकित महाविद्यालयांमध्ये शिकणारे, करिअरच्या उंबरठ्यावर उभे असलेले तरुण आहेत. म्हणजेच, शिक्षण, संधी आणि सामाजिक भान या सगळ्यांचा अभाव इथे कारणीभूत नाही. उलट, या सगळ्या गोष्टी असूनही असा निर्णय घेतला जातो, हे चिंताजनक आहे. समस्या माहितीच्या अभावाची नाही; ती मूल्यांच्या आणि जाणीवेच्या अभावाची आहे.*
समाज म्हणून आपण तरुणाईला काय शिकवतो, याचा विचार अपरिहार्य आहे. यश, पैसा, लाइफस्टाइल यांचा अतिरेक करून आपण नकळत आपल्या समृद्ध जीवन संस्कृती विसरत आहोत. सोशल मीडिया, चित्रपट आणि जाहिरातींमध्ये दिसणारी पार्टी संस्कृती, जिथे नशा ही मजा म्हणून दाखवली जाते, ती तरुणांच्या मनावर खोलवर परिणाम करते. ते त्या प्रतिमांना वास्तव मानू लागतात आणि त्यांच्याशी स्वतःला जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. तरुणाईला आपण नेमक्या कोणत्या दिशेने नेत आहोत, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. आजची पिढी माहितीच्या, संधींच्या आणि स्वातंत्र्याच्या अभूतपूर्व युगात जगते आहे. तरीही तिच्या आयुष्यात एक विचित्र पोकळी आहे. बाह्य यशाच्या सततच्या धावपळीत, स्वतःला सिद्ध करण्याच्या दबावात आणि इतरांशी तुलना करण्याच्या सवयीमध्ये, तिचे अंतर्मन कुठेतरी हरवले आहे. या हरवलेल्या मनाला काही क्षणांसाठी तरी विसावा हवा असतो एक अशी जागा जिथे विचार थांबतात, जिथे ताण नाहीसा होतो, जिथे स्वतःपासून पळ काढता येतो. सांगीतिक कार्यक्रम आणि नशा ही त्या पळवाटेची साधने बनतात; पण ही पळवाट तात्पुरती असते. ती प्रश्न सोडवत नाही; ती केवळ त्यांना पुढे ढकलते. जेव्हा हीच पळवाट वारंवार वापरली जाते, तेव्हा ती सवय बनते, गरज बनते आणि शेवटी अपरिहार्यतेकडे नेते.
गोरेगावातील दोन जीवांचा अंत ही त्या प्रक्रियेची अंतिम, क्रूर परिणती आहे. अमली पदार्थांचा फास समाजविघातक टोळीकडून दिवसेंदिवस अधिक तीव्रतेने आवळला जात आहे. रेल्वेतून कोकेनची तस्करी करणाऱ्या तस्कर महिलेकडून सव्वाचार कोटी रुपयांचे कोकेन महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केल्याची नुकतीच घडलेली घटना काय किंवा पंजाबातून महाराष्ट्रात येणाऱ्या अमली पदार्थांच्या प्रकरणात एकाला झालेली अटक काय, या समस्येची व्याप्ती बरीच मोठी आहे, हे स्पष्ट होते. ड्रग्जचे आंतरराज्य जाळे नष्ट करायला हवे. त्यासाठी प्रभावी समन्वय आणि प्रखर इच्छाशक्तीची गरज आहे. हा प्रश्न विविध स्तरांवर नीट हाताळावा लागेल.
Post a Comment
0 Comments