🌺🌸🌺
हल्ली माणसाला स्वतःचं आयुष्य जगण्यापेक्षा, 'मी किती भारी जगतोय' हे जगाला दाखवण्याचं टेन्शन जास्त आलंय. या सोशल मीडियाने माणसाला एक असा आजार दिलाय, ज्याचं नाव कुठल्याही मेडिकल डिक्शनरीत सापडणार नाही; पण तो घरोघरी पसरलाय. त्याचं नाव... 'लाईफ स्टाईल टेन्शन'!
पूर्वी घरात एखादा सण असला, गोडधोड शिजलं की घराचा कोपरा न् कोपरा सुगंधाने दरवळायचा. घरातल्या माणसांच्या चेहऱ्यावर एक तृप्ती असायची. आता कसंय, हॉटेलमध्ये ताटात पदार्थ आल्यावर आधी त्याचा 'फोटो' काढला जातो. तो पदार्थ गरम आहे की गार, याची चव घेण्यापेक्षा तो इन्स्टाग्रामवर किती 'हॉट' दिसतोय, याची चिंता जास्त! भूक पोटाला लागलीय की 'लाईक्स'ला, हेच हल्ली माणसाला कळेनासं झालंय.
सोशल मीडिया म्हणजे एक असा चकवा आहे हो, जिथे प्रत्येकाचं आयुष्य 'परफेक्ट' दिसतं. दुसऱ्याचे परदेशातले फोटो, नव्या गाडीचे स्टेटस, नवऱ्याने दिलेली सरप्राईज गिफ्ट्स... हे सगळं बघून इकडे साध्या माणसाच्या डोक्यात भुंगे भुणभुणू लागतात. "अरे, हा एवढा मजेत जगतोय आणि आपण इथेच?" हे जे टेन्शन आहे ना, ते माणसाला आतून पोखरतंय. आपण दुसऱ्याच्या आयुष्यातल्या 'हायलाईट रील'ची तुलना आपल्या आयुष्यातल्या 'बिहाइंड द सीन्स'शी करतो आणि विनाकारण स्वतःलाच दुःखी करून घेतो. जगातला अर्धा अधिक संताप तर यातूनच जन्माला आलाय की 'माझ्यापेक्षा दुसरा जास्त सुखी कसा दिसतोय?'
पूर्वी माणसं फिरायला जायची ती निसर्ग डोळ्यांत साठवण्यासाठी, दोन क्षण स्वतःसाठी जगण्यासाठी. आता माणसं जातात ती फक्त 'स्टोरीज' मध्ये टाकण्यासाठी. समोर एखादा अथांग समुद्र फेसाळत उभा असतो, पण माणसाचे डोळे मात्र मोबाईलच्या स्क्रीनवर अडकलेले असतात. कॅमेरा समोर आला की माणसाच्या चेहऱ्यावर जे ३२ दातांचं खोटं हसू येतं ना, ते बघून कधीकधी गंमत वाटते. आतून माणूस कितीही रडकुंडीला आलेला असला, दुःखात असला, तरी फोटोखालचं 'कॅप्शन' मात्र 'फिलिंग ब्लेस्ड'च असायला हवं! स्वतःला फसवण्याचा हा केवढा मोठा अट्टाहास?
कुणीतरी भारी कपडे घातले, भारी गाडी घेतली, की आपल्याला वाटतं आपली 'लाईफस्टाईल' एकदमच मागासलेली आहे. पण एक साधं सत्य आपण विसरतो... सोशल मीडियावर दिसणारं जग हे फिल्टर लावून रंगवलेलं असतं. तिथे कुणीही आपले अश्रू पोस्ट करत नाही, सगळे फक्त आपले 'स्माईल्स' विकायला बसलेत.
म्हणूनच म्हणतो, या व्हर्च्युअल जगाच्या शर्यतीत पळण्यापेक्षा, वास्तवात पाय घट्ट रोवून उभं राहावं. 'लाईक्स' च्या दुनियेत जगण्यापेक्षा, एखादा क्षण असा जगावा की तिथे मोबाईल खिशातून काढायची आठवणच होणार नाही🙏
Post a Comment
0 Comments