*आनंदाने जगा आणि जगवा*
*चार वर्षांपूर्वींची गोष्ट*
त्या रात्री जोगेश्वरीहून निघताना प्रणव गळाभेट घेऊन म्हणाला काका आमच्या इथे सर्वांना तुमचा डान्स खुप आवडला. तुम्ही माझ्या हळदीला येऊन खरंच चार चांद लावलेत. ह्यावयात देखील तुमची एनर्जी लेव्हल लाजवाब होती. तुम्ही न दमता शेवटपर्यंत नाचलात. माझा शाळेपासूनचे मित्र-मैत्रिणी जे इथे उपस्थित होते ते सुद्धा खुप खुष झाले. सगळ्यांनी मस्त एन्जॉय केली हळद तुमच्या सोबत नाचून. घरी सांभाळून जा आणि पोहोचल्यावर आठवणीने मेसेज करा.
नाचून झाल्यावर प्रणवच्या शाळेच्या मित्र मैत्रिणींसोबत गरमगरम बिर्याणी खाल्ली आणि मी घरी परत यायला निघालो तेव्हा एक वाजत आला होता. प्रणवचा मित्र मला हायवेवर रिक्षा मिळवून देण्यासाठी आला होता.
सुदैवाने एक रिक्षावाला जणूकाही माझी वाट बघत उभा होता. मी कुठे जायचे ते सांगितले आणि रिक्षांत बसलो.
प्रवास सुरू झाली आणि मला आठवली माझी आणि प्रणवची पहिली भेट. फेसबुकने मला दिलेल्या जवळपास ५००० मित्रांपैकी एक आहे प्रणव. फेसबुकवरील एका विशिष्ट समुहामधील त्याच्या भन्नाट मजेशीर पण रोखठोक कमेंट वाचून आमची मैत्री झाली. हळूहळू संवाद वाढला आणि मग माझ्या बऱ्याचशा पोस्ट वर प्रणवचे माहोल बनवणारे कमेंट्स यायला लागल्या. एकदिवस तो घरी आला आणि अगदी बालपणापासूनचा मित्र असल्यागत आम्ही तासभर गप्पा मारल्या.
पुढे प्रणवच्या शाळेच्या काही मित्रांशी पण ओळख झाली होती आणि त्या दिवशी पहिल्यांदाच आम्ही प्रत्यक्ष भेटलो. प्रत्येकाने भेटल्यावर एकच गोष्ट सांगितली ती ही की काका आज बघायचाच आहे तुमचा डान्स आम्हाला. सगळे मिळून मजा करू. सगळी सोय आहे. काही लागलं तर हक्काने सांगा आमच्यापैकी कोणालाही.
खरंतर मी त्या दिवशी ठरवूनच गेलो होतो नेहमीप्रमाणेच बेभान होऊन नाचायचं आणि आपल्या मित्राला खुष करायचं. निघताना प्रणव तेच भरभरून बोलला आणि तीच खरी पावती होती.
मित्रांनो आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो आणि बऱ्याचदा निराशेचे क्षण आपल्या वाट्याला येतात. ते जर वेळीच दूर ठेवायला आपण प्रामाणिक प्रयत्न केला नाही तर ते आपल्या आयुष्यात मिसळून जातात आणि आपलं मन प्रत्येक बाबतीत नकारात्मक विचार करत बसतं. त्यापेक्षा जे जे समोर येईल त्यातून सकारात्मक उर्जा कशी मिळेल ह्याचा विचार आपण जरूर केला पाहिजे. जेणेकरून संकटातून कमीतकमी त्रासात आपण सुखरूप बाहेर पडू शकू. आपल्या अवतीभवती बऱ्याच गोष्टी असतात ज्याकडे आपलं लक्ष्य नसतं पण त्या गोष्टी क्षणभरासाठी का होईना पण आपल्याला आनंद देऊन जाऊ शकतात आणि आपलं मन ताजेतवाने ठेवण्यास आपोआप मदत होते.
अशा गोष्टी शोधून काढण्यासाठी आपली नजर बदलली पाहिजे जेणेकरून या गोष्टींमधून तुम्ही आनंद घेत तुमचं मन सदैव सकारात्मक आणि टवटवीत ठेवू शकाल. अशा मनांची माणसं येणाऱ्या संकटांना अधिक जिद्दीने आणि कणखरपणे सामोरे जाऊ शकतात. संकटातून मार्ग काढण्यासाठी त्यांची विचारशक्ती अधिक चौफेर आणि जोमाने कामाला लागते. शेवटी विजय त्यांचाच होतो.
त्या रात्री हळदीला गेल्यावर ओळख नाही म्हणून मी नुसता खुर्चीवर बसून कार्यक्रम बघू शकलो असतो. पण मग त्यात सजीवता नसती. नपेक्षा डिजेच्या तालावर पावलं थिरकवून मी नेहमीप्रमाणे बिनधास्तपणे भरपूर नाचलो आणि माझ्याबरोबर उपस्थितांना देखील चार क्षण मजेचे आणि आनंदाचे मिळवून देऊ शकलो ह्याचे मला खुप समाधान आहे.
आनंद ही गोष्ट अशी आहे की ज्यात मिळविण्यापेक्षा देण्यात अधिक समाधान मिळते. अशा देण्यासाठी पैशाचीही गरज नसते. जितका जास्त प्रमाणात तुम्ही आनंद वाटता तितके तुम्ही तुमच्या नकळत कित्येकांच्या जवळ जाता आणि ती प्रत्येक व्यक्ती तुमच्यात स्वतःला शोधत रहाते.
तेव्हा घेण्यापेक्षा देण्यातच
तुम्ही माना धन्यता.
Post a Comment
0 Comments