Type Here to Get Search Results !

कथा



नमस्कार मंडळी। 


आमच्या घराच्या मागे खूप मोठा असा मोकळा परिसर होता। २०१२ साली आम्ही इथे आमच्या बंगल्यावर मे महिन्यात रहायला आलो तेव्हा इथे जवळपास अतिशय कमी घरे होती। त्यातून आमच्या धायरीचा हा परिसर म्हणजे फक्त पुण्यापासूनच म्हणजे पुणे सिटी पासूनच दूर नाहीये तर खुद्द धायरीचा सुद्धा जवळ जवळ टोकाचा भाग म्हणता येईल असा आहे। त्यामुळे मुलांना कॉलेजला जायला लांब पडत होता। सौन्ना सुद्धा ऑफिसमध्ये जायला दूर पडत असलं तरी तिला इथे रहायची इच्छा होती। आमचे नातेवाईक मात्र वैतागून म्हणाले की वारजे माळवाडीचा ( कोथरूडच्या थोडं पुढे ) हायवे वरचा एव्हढा सुंदर फ्लॅट सोडून तिकडे जंगलात रहायला का जाताय? मुलं सुद्धा त्यांचे मित्र मैत्रिणी वारज्याला असल्याने इकडे यायला फारशी तयार नव्हती। पण आम्हाला मोकळी जागा, घरा भोवतीची बाग, गॅलरी, गच्ची, प्रशस्त खोल्या आणि जमिनी पासूनचं घर हवं होतं। म्हणून आम्ही इकडे रहायला आलो। माझं ऑफिस कम क्लिनिक बंगल्यावरच बनवलेलं होतं। त्यामुळे मोठं स्वयंपाकघर, प्रशस्त हॉल, स्वतंत्र बेडरूम, मुलांच्या स्वतंत्र सेल्फ कंटेंड रूम्स, वरच्या मजल्यावरच्या मोठाच्या मोठा हॉल, अडगळीची खोली हे सगळं सगळं इथे साध्य झालं। 


गेल्या काही वर्षात दिवसा सुद्धा ये जा करायला भीती वाटावी असा हा परिसर आता सिमेंटची जंगले आणि टिपिकल भारतीय बेशिस्त मनोवृत्तीची बेफिकीर माणसं यांनी गजबजू लागला आहे। पूर्वी आमच्या घराच्या मागे घराला लागून कंपाऊंडच्या पलीकडच्या प्लॉटवर पावसाळ्यात इतकी झुडपं उगवत असत की त्यातून बेडूक-पेके ( बेडकांचा एक प्रकार ) दिवसरात्र ओरडत असत। फुरसं, घोणस, नाग आणि मण्यार या चारीही प्रकारच्या विषारी सापांचा मुक्त वावर होता। आम्ही रहायला असल्याच्या आठव्याच दिवशी आमच्या दारात दोन मण्यारी आल्या होत्या। बाथरूमच्या खिडकीत कात टाकली होती। एकदा मला आणि एकदा आमच्या गायत्रीला दरवाज्या समोर नाग दिसला होता। ते आमचे अनुभव मी स्वतंत्रपणे इथे नमूद केलेले होतेच। इतका वादळी वारा सुटायचा की त्याच्या जोराने आम्ही लावलेली झाडं कोलमडून पडत असत। केळीची पानं फाटून जायची। बाहेर उभं राहणं मुश्किल होत असे। उन्हाळ्यात सुद्धा घरात थंडी वाजे। पंख्याची आवश्यकता वाटत नसे। गच्चीवर रात्री झोपलं तर दवाने भिजून जायला होत असे। आणि थंडी सुद्धा इतकी वाजायची की दोन दोन तीन तीन रग ( ब्लँकेट्स ) कमी पडावेत। 


पण आता मात्र ते सारं चित्र पालटत चाललेलं आहे। जिकडे तिकडे फेकलेला कचरा, हावरटा सारखी इंच इंच लढवून केलेली बांधकामं, रेन वॉटर हार्वेस्टिंगची कोणतीही व्यवस्था न करता भूमीतील पाण्याचं बोअर मारून दोहन करणं, प्लास्टिक-कचरा जाळणं वगैरे टिपिकल गलिच्छ भारतीय मेंटॅलिटीचे सगळे प्रकार सुरू झालेत। २०१२ साली आम्ही इथे रहायला आल्यावर मोठ्या मुश्किलीनेच आम्हाला दोन एक वर्ष स्वच्छ सुंदर परिसराचा आनंद घेता आला। पण तेव्हा आजूबाजूचे गावकरी त्यांची गुरं आमच्या कॉलनीत चारायला आणत असत। ती झाडांचं नुकसान करायची। एक वर्ष मी रेशीम ( ही शेंग हिरवट-राणी कलरची असते। ) घेवडा लावलेला होता आणि तो कडेचं कंपाऊंड आणि मागचं कंपाऊंड यावर प्रचंड पसरलेला होता। आणि दोन तीन महिन्यात घेवड्याच्या इतक्या शेंगा आल्या की आम्ही खूप खाऊन नातेवाईक, शेजारी, मोलकरीण हे सगळेजण खाऊन कंटाळले। पण याच गुरांनी ( म्हशी होत्या। मी हाकलून देई पर्यंत वाट लागलेली होती। ) हिसडे-हिसके देऊन हा घेवडा तोडला आणि खाल्ला। आणि हा सुंदर घेवडा नष्ट झाला। बोलणार कोणाला? कारण आम्ही "त्यांच्या प्रदेशात" राहतोय ना? 


आता आमच्या घराच्या मागे फोटो आणि व्हिडीओ मध्ये तुम्ही बघाल त्या प्रमाणे प्लॉटचं लेव्हलिंग करून खड्डे घेऊन मोठं गोडाऊन बांधत आहेत। अगदी आमच्या कंपाऊंडला लागून-चिकटून। आमच्या घरात येणारा पश्चिमेचा मोकळा, स्वच्छ वारा आता येत्या दोन चार दिवसात येणं बंद होईल। आणि तो निसर्गाचा मनमुराद आनंद घेणं सुद्धा त्या बरोबर  संपेल। पण आम्हीच मनाची समजूत काढतो की २०१२ सालापासून २०१९ सालाच्या शेवटापर्यंत तरी आनंद मिळाला ना आपल्याला? तो सुद्धा खूप आहे। आमच्या गच्चीवरून आख्खं पुणं दिसायचं ते तर सुरवातीच्या दोन तीन वर्षांत आजूबाजूला झालेल्या बांधकामांच्या मुळे दिसणं बंदच झालेलं होतं। आता हाही आनंद जाणार। असो। 


याच परिसराच्या व्हिडीओसह माझं एक गवळण प्रकारातलं गाणं ( गवळण म्हणजे  गोपींनी कृष्णासाठी गायलेली गाणी। )  तुमच्या आनंदासाठी जोडावसं वाटलं। म्हणून तेही शेअर केलं आहे। प्लिज प्रतिक्रिया नक्की द्या ऐकून। त्याची थोडी माहिती या लेखाच्या खाली देतो आहे। 



मी लिहून संगीतबद्ध केलेली एक गवळण ( गवळण म्हणजे कृष्णाचे आर्जव, थट्टा-मस्करी तरी कधी तक्रार करणारी गोपिकांनी म्हंटलेली गाणी। ) । नक्की ऎका आणि आवडली का अवश्य सांगा। या गवळणीचा कोकणी बाज आहे। घाटावरच्या गवळणी खूप वेगळ्या असतात। 


माझं हे गाणं श्री. कुलकर्णी यांनी गायलेलं होतं. त्यांना गाताना पेटी ( हार्मोनियम ) वाजवत गायची सवय असल्याने त्यांनी श्री. विवेक म्हसवडे हे सिंथेसायझर वाजवत असूनही स्वतः पेटी सुद्धा वाजवत गाणं म्हंटलं. त्यामुळे सिंथ आणि पेटी क्लॅश झालं आहे. पण प्रॅक्टिसच्या वेळेस कधी कधी असं होतंच. मात्र कार्य ज्या वेळेला मी घेतलेला होता तेव्हा मात्र त्यांनी पेटी वाजवलेली नव्हती. असो. तर हे घरगुती प्रॅक्टिसच्या वेळेला केलेलं रेकॉर्डींग आहे. त्यामुळे अगदी सफाईदार नाहीये. पण आनंद नक्की घेऊ शकाल. विशेषतः मधेच ठेका पूर्णपणे थांबतो आणि लगेच सुरू होतो तिथे तुम्हाला मस्त वाटेल. धन्यवाद!!!!!!!


सांठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संप्रूण ( संपूर्ण!) 


                           !! इति लेखन सीमा !! 


नेहमीच आपला मित्र, 


Dr. हेमंत उद्धव सहस्रबुद्धे उर्फ कलादास। 

लेखक, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार। 

धायरी-पुणे।


गाण्याचे शब्द- 


कान्हाला का ही राधाला आवडली, राधा आवडली, 

कान्हाला का ही राधाला आवडली, कान्हाला का ही राधाला आवडली !! धृ !! 


राधेचे बोल लाघवी, राधेचे सुंदर हसणे, 

राधेचे वळून पहाणे, राधेचे मंद चालणे, 

राधेला म्हणतो कान्हा, राधे राधे गं थांब ना, 

मानेला झटके, हासुनिया लटके, का ही राधा अवघडली? !! १ !! 


कृष्णाची हाक आर्जवी, गालावर स्मित वाजवी, 

पायाने ठेका धरुनी, मुकुंदा वेणू वाजवी, 

पाव्याचा नाद पावला, राधेचा पाय थांबला, 

डोळ्याला पाणी, थरथरती वाणी, का ही राधा अवघडली? !! २ !! 

का ही राधा बडबडली?


कवी, लेखक, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार - कलादास। 


गायक- श्री. विजय कुलकर्णी। 

सिंथेसायझर वर- श्री. विवेक म्हसवडे। 

तबला- कुमार चैतन्य डांगे।

Post a Comment

0 Comments