Type Here to Get Search Results !

आज 10 फेब्रुवारी

 *आज १० फेब्रुवारी*

*आज जुन्या काळातील मराठी लेखिका #दुर्गा_भागवत यांचा जन्मदिन.*

जन्म. १० फेब्रुवारी १९१० इंदूर येथे.

दुर्गा भागवत या लोकसंस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधक; समाजशास्त्र, मानववंशशास्त्र व बौध्दधर्म यांच्या अभ्यासक आणि लेखन-विचार-स्वातंत्र्याच्या झुंजार पुरसकर्त्या होत्या. शालेय शिक्षण मुंबई, नगर, नाशिक, धारवाड, पुणे येथे. १९२७ साली त्या मॅट्रिक उत्तीर्ण झाल्या. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबई येथे झाले. १९३२ मध्ये त्या पहिल्या वर्गात बी.ए. (संस्कृत व इंग्रजी) झाल्या. १९२९ साली शिक्षण स्थगित करून म. गांधीच्या राष्टीय चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. १९३५ मध्ये त्या एम्.ए. झाल्या. त्यासाठी 'इंडियन कल्चरल हिस्टरी' शाखेत 'अर्ली बुध्दीस्ट ज्युरिसप्रूडन्स' या विषयावर त्यांनी प्रबंधलेखन केले. पीएच्.डी. च्या प्रबंधासाठी 'सिंथिसीस ऑफ हिंदू ऍड ट्रायबल कल्चर्स ऑफ सेंट्रल प्रॉव्हिन्सेस ऑफ इंडिया' या विषयावर त्यांनी संशोधन कार्य केले; परंतु प्रबंध सादर केला नाही. त्यांच्या प्रबंधातील निवडक भाग परदेशी नियतकालिकांतून प्रसिध्द झाला होता. म. गांधी, टॉलस्टॉय, हेनरी डेव्हिड थोरो, मिल, रॉबर्ट ब्राउनिंग, राजारामशास्त्री भागवत, डॉ.केतकर ही दुर्गाबाईंची काही प्रमुख प्रेरणास्थाने होत. भारताच्या आद्य स्त्री-शास्त्रज्ञ कमला सोहोनी या दुर्गा भागवतांच्या भगिनी होत्या. आचार्य राजारामशास्त्री भागवत हे दुर्गाबाईच्या आजीचे बंधू होते. दुर्गाबाईंचे वडीलही शास्त्रज्ञ होते. दुर्गा भागवत या गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे येथे दोन वर्षे समाजशास्त्रविभागाच्या प्रमुखपदी होत्या. तसेच साहित्य-सहकार ह्या मासिकाचे वर्षभर संपादनही त्यांनी केले. त्यांचा पहिला इंग्रजी ग्रंथ 'अर्ली बुध्दीस्ट ज्युरिस्प्रूडन्स' हा तर त्यांचा पहिला मराठी ग्रंथ्र 'राजारामशास्त्री भागवत'. व्यक्तिचित्र व वाङ्मयविवेचन आणि पहिला मराठी ललितग्रंथ 'महानदीच्या तीरावर- गोंडजीवनावरील नवलिका' हा होय.संशोधन वैचारिक लेखनाने दुर्गाबाईंनी लेखनास प्रारंभ केला. समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, लोकसाहित्यशास्त्र या विषयांवरील त्यांचे लेखन मुख्यत: इंग्रजीत आहे. भाषाशास्त्रावरिल 'ए डायजेस्ट ऑफ कम्पॅरेटिव्ह फिलॉलॉजी'; बौध्द व जैन धर्मांच्या अभ्यासातून हाती आलेल्या प्रेमकथांच्या अन्वयार्थांवर आधारित 'रोमान्स इन सॅकिड लोअर' व आदिवासींसाठी काय काम करावे याचे मार्गदर्शन करणारी सुबोध विवेचंपर पुस्तिका 'ए प्रायमर ऑफ ऍंथ्रॉपॉलॉजी' ही मध्ये लिहिलेली पुस्तके आहेत. 'रायडल इन इंडियन लाईफ' ज्यात वेदकाळापासून कलगीतु-यापर्यंत कोडी आहेत व मृत्युबद्दलची विशेष प्रसिध्द आहेत. भारतीय लोकसाहित्याच्या संशोधनावर आधारित ऍन आउटलाइन ऑफ इंडियन फोकलोअर व रिडल इन इंडियन लाइफ, लोअर ऍड लिटरेचर हे त्यांचे काही इंग्रजी ग्रंथ. त्यांचे बरेसचे महत्त्वाचे लेखन लेखरूपांतही आहे. हिंदुइझम ऍड इट्स प्लेस इन द न्यू वर्ल्ड सोसायटी हा डॉ. केतकरांच्या समाजशास्त्रीय ग्रंथाचा दुर्गाबाईंनी केलेला अनुवाद होय.

त्यांनी संशोधनपर, समीक्षात्मक, वैचारिक, लोकसाहित्य, कथा, चरित्र, संपादन, अनुवाद, बालसाहित्य, ललितगद्य असे विविधांगी लेखन केले. त्यांची सुमारे सत्तर पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आणीबाणीच्या काळात दुर्गाबाईंनी लेखन-विचार स्वातंत्र्याचा जोरदार पुरस्कार केला व त्यासाठी कारावासही पत्करला. विद्वत्ता, ज्ञानसाधना, नवनिर्मिती यांचे अनुशासन नोकरशाहीच्या हाती असू नये व ख-या लोकशाहीची प्रतिमा सिध्द करण्यास विचारवंतांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. 'मुक्ता' व 'जनतेचा सवाल' ही त्यांच्या त्या काळातील भाषणलेखांची संकलने आहेत. दुर्गाबाई विणकाम, भरतकाम उत्तम करायच्या आणि स्वयंपाकात त्या पारंगत होत्या. त्यांनी काही नवीन पाककृती शोधून काढल्या आहेत. मुंबईतील एशियाटिक सोसायटीच्या त्या क्रियाशील कार्यकर्त्या होत्या. भारतातील सन्माननीय लेखिका म्हणून रशिया भेटीचे निमंत्रण त्यांना मिळाले होते. कऱ्हाड येथे १९७५ साली झालेल्या ५१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. आणीबाणीच्या काळात त्यांनी लेखन स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य याविषयी ठाम जाहीर भूमिका घेतली, आणि त्यासाठी तुरुंगवास भोगला. *दुर्गा भागवत* यांचे निधन ७ मे २००२ रोजी झाले. आपल्या समूहातर्फे दुर्गा भागवत* यांना आदरांजली.


Post a Comment

0 Comments