Type Here to Get Search Results !

जुन्या आठवनी

 *सुधारस*


साधारणपणे १९८०-९० च्या दशकात कोणा नातेवाईकाच्या लग्नाला गेले की आदले दिवशी रात्री सीमान्त पूजनाच्या जेवणाचा मेनू ठरलेला असायचा! 

पंगत बसली की मीठ लिंबू काकडीची कोशिंबीर, दाण्याची चटणी लिंबाचे लोणचे ही डावी बाजू, मग उजव्या बाजूला वाटीत कढी,त्याच्या खाली मटकीची उसळ आणि मध्यभागी भात वरण! त्यावर तुपाची धार पडली की मग वदनी कवळ घेता श्लोकाने पंगत सुरू व्हायची.भात संपत आला की यायची पुरी आणि "सुधारस"!! कार्यालयाच्या दर्जाप्रमाणे त्यात काजू बदामाचे तुकडे किंवा केळ्याचे तुकडे असायचे! आम्ही लहान मुले आशेने वाढप्याकडे बघत असू! आमच्यापैकी एखाद्याच्या ताटात एखादा बदामाचा काप किंवा केळ्याचा तुकडा आला की धन्यता वाटे! 

सुधारस! सुधा म्हणजे अमृत किंवा मध! अमृता सारखा अवीट गोडीचा "साधा-सुधा" पदार्थ! पण त्याने कित्येक दशके पंगती गाजवल्या!

साखरेच्या गोड पाकाला वेलदोडा आणि लिंबाच्या रसाची आंबटसर चव असलेला पदार्थ! हा करायला देखील किती सोपा.साधारण वाटीभर साखरेत अर्धी वाटी पाणी घालून गॅसवर ठेवायचे.उकळी आली की गॅस बंद करून त्यात केळ्याचे काप वेलदोड्याची पूड लिंबाचा रस २ थेंब घालायचे.आवडत असल्यास बदामाचे काप आणि केशर घालायचे!थोडे थंड झाले की झाला सुधारस तयार.


आम्ही घरी पोळीबरोबर खायचो! सुधारसात तूप घालून देखील मस्त चव यायची! कधी आजारपणातून उठले की सुधारस खाल्ल्याने तोंडाला चव यायची.

कधी चुकून घरी ब्रेड असेल तर तो थोडा तूप लावून भाजून त्याला सुधारस लावून खायचो! जॅम नाही तर सुधारस ही सही! घरी कधी ऐनवेळी कोणी जेवायला आले तर आई पटकन सुधारस करायची! घरात कायम उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून तयार होणारा सोपा पदार्थ आलेल्या पाहुण्यांना खुश करायचा!

आता मात्र काळाच्या ओघात सुधारस मागे पडला आहे! हल्ली लग्नाच्या जेवणाच्या पंगती देखील नसतात! पूर्वी जेवणारे एका जागी बसायचे आणि वाढपी फिरायचे.आता वाढपी एका जागी उभे राहतात आणि जेवणारे फिरतात!असो!

आज खूप दिवसांनी सुधारसाची आठवण झाली. म्हणून हे लिहिण्याचा खटाटोप. पण नुसते लिहून काम भागायचे नाही..लवकरच करायला हवा- सुधारस!

Post a Comment

0 Comments