Type Here to Get Search Results !

कथा



प्रस्तुती : साहित्य उत्सव.. ...


दुकानाच्या फळ्या लावताना मी मनाशी म्हणालो,

‘‘चला, एक दिवस गेला. किरण आली नाही.’’

मी शेवटची फळी लावली. बंद दुकानाला सगळ्या सेल्समन्सनी पायरीला हात लावून नमस्कार केला. आणि निघाले. देवधरांनी चारही कुलूपं नीट लावली आहेत ना, हे पाहिलं. मग तेही निघाले.

आता फक्त मधली खिडकी उघडी होती.

आत दिवा आणि रात्रपाळी करणारे साळवी.

घरी जावं की पार्टनरकडे ?

मी संभ्रमात.

तोच समोर किरण.

‘‘तुम्ही ?’’

‘‘समोर फुटपाथवर उभी होते.’’

‘‘का ?’’

‘‘दुकान कधी बंद करतात ते पाहायचं होतं.’’

‘‘अगोदर का नाही आलात ?’’

‘‘जी व्यक्ती आता येऊ शकते ती त्याच्या अगोदरही येऊ शकते.’’

‘‘मग ?’’

‘‘मला हाच मुहूर्त साधायचा असेल तर ?’’

‘‘पण का ?’’

‘‘म्हणजे दुकानात कस्टमर्सची गर्दी आहे असं सांगून तुम्ही मला कटवणार नाही.’’

‘‘भलतंच काय !’’

‘‘मग काल का आला नाहीत ?’’

मी गप्प. काय सांगणार ?

‘‘जाऊ दे ! नका सांगू ! किती दिवस टाळाल ? किती दांड्या माराल ?’’

‘‘काल आला होतात ?’’

‘‘दोनदा.’’

‘‘काही खास ?’’

‘‘खास पण शेवटचं नाही.’’

‘‘किरण...’’

‘‘कुठं जायचं ?’’

‘‘सांगाल तिथं !’’

‘‘इथंच दुकानाच्या पायरीवर बसलो तर ?’’

‘‘Will do.’’

पायऱ्यांच्या बाजूला संगमरवरी फरशा बसवलेला कट्टा आहे. त्या कट्ट्यावर दुकान उघडं असतं तेव्हा एक मोठी शोकेस ठेवलेली असते. सरकत्या रंगमंचाप्रमाणे, दुकान बंद करताना, आम्ही ती आत ढकलतो. दार लावून घेतो. त्या कट्ट्यावर मी बसलो. किरण माझ्याजवळ बसली आणि अगदी अभावितपणे तिने माझा हात हातात घेतला.

ह्याच कट्ट्यावर बसून पार्टनरने मला ‘नरक म्हणजे काय ?’—ही कथा ऐकवली होती.

माझ्या आयुष्यातले महत्त्वाचे बदल ह्याच कट्ट्यावर घडावेत, असा काही योग असावा काय ?

बाकी पार्टनर अफाट माणूस !

गुप्तरोगाच्या गोळ्या त्याने अ‍ॅनासिन मागावं इतक्या खुल्या मनाने आणि खणखणीत आवाजात मागितल्या. इतर कस्टमर्सना त्या कशावर आहेत ते माहीत असायचं कारण नव्हतं, पण सगळ्या सेल्समन्सना ते नक्कीच माहीत होतं. मी तर पाहतच राहिलो. गल्लोगल्ली, गावोगावी, पेपरांत, मासिकांत, रेडिओवर, चित्रपटांत ज्याची खुल्लमखुल्ला बोंब चालली आहे ते निरोधाचं पाकीट मागतानाही माणसं कावरीबावरी होतात. असे कस्टमर्स ताबडतोब ओळखायला येतात. रुपयाची नोट सेल्समनकडे सरकवायची आणि काय हवंय हे न सांगता नुसतं उभं राहायचं. पण हा पठ्ठ्या खणखणीत आवाजात म्हणाला,

‘‘व्ही. डी. वर काही टॅबलेट्स, इंजेक्शन्स असतील तर द्या !’’

‘‘Prescribed by ?’’

‘‘माझा मीच डॉक्टर.’’

‘‘तसं चालायचं नाही.’’

‘‘भले ! आता काय झालंय ते मला माहीत आहे. मधूनमधून ते लागतं. काय करणार ?’’

घासाघीस न करता मी बॉक्स हातात ठेवला.

दुसऱ्या दिवशी तो पुन्हा आला.

‘‘सर्वात बेस्टपैकी ‘बी कॉम्प्लेक्स’ द्या.’’

‘‘कालच न्या म्हणणार होतो. त्या तसल्या गोळ्या घ्यायच्या म्हणजे...’’

‘‘खोलीवर होत्या expiry date पाहिली नव्हती.’’

नंतर एकदम विचारावं असं वाटून मी म्हणालो,

‘‘थांबायला सवड आहे का ?’’

‘‘का ?’’

‘‘थोडं काम होतं.’’

‘‘सांगून टाका.’’

‘‘इथं नको. शेजारी हॉटेलात जाऊ या.’’

‘‘माझं एक काम उरकून येऊ का ?—एका पोरटीला—appointment दिली आहे. कोपऱ्यावर उभी असेल. नुसती नाही, कोकलत !’’

‘‘चालेल.’’

दुकान बंद करता-करता तो आला. ह्याच कट्ट्यावर बसत मी त्याला विचारलं,

‘‘तुमच्या ओळखीत कुठं जागा आहे का ?’’

‘‘कशासाठी ?’’

‘‘फक्त रात्रीपुरती, पथारी पसरायला.’’

‘‘म्हणजे टॉलस्टॉय मागतो तेवढी ?’’

‘‘तेवढीच ! मी लोळणारसुद्धा नाही, किंवा तेवढ्याच जागेत लोळेन.’’

‘‘केव्हापासून हवी ?’’

‘‘दिलीत तर आजपासून !’’

‘‘चला !’’

‘‘कुणीकडे ?’’

‘‘पार्टनरच्या खोलीवर.’’

‘‘पार्टनर कोण ?’’

‘‘अस्मादिक.’’

‘‘नाव ?’’

‘‘पार्टनर, मी तुझा पार्टनर आणि तू माझा. मी तुझं नाव विचारलं ?’’

‘‘मग हाक कशी मारायची ?’’

‘‘पार्टनर ह्याच नावाने. स्वत:चं नाव विसरणं ह्यात मस्त आनंद आहे. खरं तर आपल्याला नावच नसतं. बारशाला नाव ठेवतात ते देहाचं.’’

‘‘असं कसं ?’’

‘‘विचार करुन बघ. ते नाव जर आपलं असतं तर उल्हास नावाचा माणूस काय टवटवीत दिसला असता.’’

खूप दिवसांनी मी भरगच्च हसलो.

‘‘तुमचं माझ्या बोलण्याकडे मुळीच लक्षा नाही.’’

मी भानावर आलो.

‘‘पुन्हा सांगते. परवा प्रीतममध्ये तुम्ही जे जे बोलला आहात ते मी सगळं विसरले आहे. मी काही ऐकलं नव्हतं. तुम्ही मला का आवडलात ते पुन्हा विचारु नका. आणि आता चला.’’

‘‘कुठे ?’’

‘‘माझ्या घरी.’’

‘‘नको किरण.’’

‘‘माझ्यासाठी येऊ नका. आईसाठी चला. तिला भेटायला येणार होतात. ती वाट पाहते आहे. कुणाचीही असो, पण ‘आई’ ह्या नात्याला फसवू नये.’’

माझे शब्द संपले.

विरोधही.

‘‘आता तू वाया गेलास.’’

किरण आणि तिच्या घरची हकीगत ऐकताच पार्टनर म्हणाला,

‘‘कसा काय ?’’

‘‘ज्या माणसाच्या बाबतीत प्रेमाची वाटचाल लग्नाच्या मंडपात संपते तो वाया गेला.’’

‘‘त्याची वाटचाल मग कुठं संपायला हवी ?’’

‘‘वो हमको मालुम नही इस लिये हम सिर्फ अफेअर करता है, मोहब्बत करता नही. लग्न ही सुखान्तिका नाही ह्या माझ्या मताशी अनेक लेखक, तमाम चित्रपटसृष्टी सहमत आहे.’’

‘‘ती कशी ?’’

‘‘लहानपणी गोष्टींची पुस्तकं वाचली का ?’’

‘‘चिक्कार !’’

‘‘त्या सर्वांचा शेवट सांगतोस ?’’

‘‘अगदी कॉमन ! मग त्यांनी विवाह केला आणि अनेक वर्षं सुखाने कालक्रमणा केली.’’

‘‘आणि हिंदी चित्रपट कुठं संपतात ?’’

‘‘हिरो-हिरॉईन एकत्र येतात, तिथं !’’

‘‘That's the point.गोष्टीत किंवा सिनेमात वैवाहिक जीवनाबद्दल कधीच काही दाखवत नाहीत. अरे मेरे भाई, रोमिओ-ज्युलिएट, शिरीन-फरहाद, लैला-मजनू ह्यांची लग्नं झाली नाहीत म्हणून त्यांनी जीव दिले. लग्नं झाली असती तर कशावरुन ते फासावर नसते गेले ?’’

‘‘पार्टनर, तू माझा निष्कारण गोंधळ उडवून देऊ नकोस.’’

‘‘तुला एक गंमत सांगू ? गंमत म्हणजे एक जबरदस्त प्रेमकथा आहे.’’

‘‘अवश्य !’’

‘‘एक राजकन्या होती, एकदम सुंदर.’’

‘‘एकदम ?’’

‘‘ऑलराईट !’’

‘‘तर, एकदम देखणी, लाजवाब, क्यूट...’’

‘‘ह्या सगळ्याला एकच शब्द सांगू ?’’

‘‘ऑफकोर्स सांग.’’

‘‘किरणसारखी होती म्हण !’’

‘‘तो शब्द मी टाळत होतो.’’

‘‘ह्याचं कारण तू तिला पाहिलं नाहीस.’’

‘‘मंजूर ! बिलकूल मंजूर ! तेव्हा किरणसारखी एक राजकन्या होती. तिचं एका सरदारपुत्रावर मन बसलं. तिच्या डोक्यातून तो जाईना. आता राजाला ही गोष्ट कशी खपणार ? पण तसा तो राजा फार हुशार होता. हुशार म्हणण्यापेक्षा shrewd होता. आपण विरोध दर्शवला की मामला बिथरेल, ही पोट्टी जास्त-जास्त जीव लावेल, हे त्याने हेरलं. त्यांच्यातली प्रेमभावना नष्ट करायला हवी होती. मग त्याने काय केलं, दोघांना एकदम confidence मध्ये घेतलं. विचारलं,

‘तुमचं एकमेकांवर प्रेम आहे ?’

‘होय.’

‘किती ?’

‘आम्ही एकमेकांशिवाय जगू शकणार नाही.’ सरदारपुत्रा भाबडेपणाने म्हणाला.

राजकन्येने हाताला हात लावून ‘मम’ म्हटलं.

‘कायम एकमेकांना जवळ राहावंसं वाटतं ?’ पुन्हा होकार. ‘मग तशीच व्यवस्था करु’ असं म्हणून राजाने खुणेच्या टाळ्या वाजवल्या. त्याबरोबर 

शिपाई दरबारात धावत आले. पूर्वी ठरल्याप्रमाणे त्या दोघांना एकमेकांना मिठी मारलेल्या अवस्थेत एकत्र करकचून बांधण्यात आलं आणि एका खोलीत फेकण्यात आलं. त्या दोघांना प्रथम गंमत वाटली. जे स्पर्शसुख ते चोरुन मिळवत होते त्याला जणू राजमान्यता मिळाली. तेवढ्यातल्या तेवढ्यात त्यांनी एकमेकांच्या अंगावरुन हात फिरवले. मनसोक्त चुंबनं घेतली. पण किती वेळ ? मग पाहिलावहिला आवेग ओसरला. त्यांना दूर व्हावंसं वाटलं. ते शक्य नव्हतं. बांधलेल्या दोऱ्या टोचायला लागल्या. जाम रग लागली, अवयवही अवघडले, उकडायला लागलं, घामाच्या धारा वाहू लागल्या. आलेला घाम पुसताही येईना. मग तो घामट स्पर्श नकोसा वाटायला लागला. भक्ती संपली, सक्ती आली. सक्ती म्हटलं म्हणजे आसक्ती उरत नाही. हळूहळू भुकेची जाणीव होऊ लागली, तहान लागली, लघवीलाही लागली. पण काही हालचाल करता येईना. मग हळूहळू कुरकूर सुरु झाली. समजून घेता-घेता तक्रारी सुरु झाल्या. आवाज चढू लागले. शरीराच्या एका गरजेपुरती बाईला पुरुष आणि पुरुषाला बाई हवी असते. बाकीच्या निसर्गाच्या गरजा एकेकट्याच्या असतात. काही काही गलिच्छ असतात, पण त्या असतातच. मग ती निकड पुरवायची वेळ आली, तेव्हा ती चक्क भांडायला लागली. तशा अवस्थेत तीन दिवस काढावे लागले. पार्टनर, चौथ्या दिवशी त्यांना एकमेकांचं तोंड पाहायची इच्छा राहिली नव्हती. इतकंच नव्हे तर ते एकमेकांचा कट्टर द्वेषा करायला लागले होते. जस्ट इमॅजिन, एकमेकांशिवाय जगू न शकणारे ते दोन जीव, एकमेकांचा जीव घेण्याच्या पायरीपर्यंत आले होते.’’

पार्टनरने मला ही कथा का ऐकवली ?

माझं आणि किरणचं कालांतराने असं होईल ?

एवढ्या देखण्या मुलीचं तोंडही पाहणं नको असं मला होईल का ?

विचार करीत गॅलरीत आलो.

नेहमीप्रमाणे समोर देवळात कथा उभी राहिली होती. बुवा सांगत होते...

‘‘आमचा देव दगडाचा नाही. आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत.’’

चपराक बसावी तसा मी भानावर आलो. हे नेहमीचं टाळ कुटणारं कीर्तन नव्हतं. हे शब्द निराळे होते. जाग आणणारे.

‘‘दगडात देव असतोच. मूर्ती असतेच. दगडाचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. मूर्तीच्या भागाकडे लक्षा ठेवा, फेकून द्यायच्या भागाकडे नको. आणि मग ह्याच भावनेने, निसर्गाच्या इतर गोष्टींकडे पाहा. झाडं, नद्या, वारे, आकाश, जमीन आणि शेवटी माणूस. माणसालाही नको असलेला भाग दूर करायला शिका. ह्याची सुरुवात स्वत:पासून करा. स्वत:ला नको असलेला भाग कोणता ?—तर ज्यापायी आपला आनंद, प्रगती, निष्ठा आणि आत्मविश्वास ह्याला तडा जातो तो आचार, तो विचार हा टाकायचा भाग...’’

मी पुढचं काही ऐकलं नाही. खोलीत आलो.

पार्टनर नवं पाखरु घेऊन सिनेमाला गेला होता. मला एकदम हलकं वाटलं.

सगळं सोपं वाटलं.

किरणला सुखी करणं सर्वस्वी माझ्याच हातात आहे.

दुसऱ्याच दिवशी मी जेवताना जाहीर केलं,

‘‘आई, मी लग्न करतोय.’’

आई थबकलीच.

‘‘म्हणतोस तरी काय ?’’

‘‘मी लग्न करतोय.’’

‘‘मुलगी ?’’

‘‘पाहिली.’’

‘‘आणि राहणार कुठे ?’’ अरविंदने विचारलं.

‘‘कुठे म्हणजे ? इथंच.’’

‘‘जागा कशी पुरणार ?’’

‘‘न पुरायला काय झालं ? तुझं लग्न झाल्यावर मी माझी झोपायची सोय बाहेर केली. आता काही दिवस तुम्हा दोघांना जावं लागेल. उसमे क्या ?’’

‘‘भावजी, खरं बोलताय की चेष्टा ?’’

‘‘सेंट परसेंट खरं !’’

‘‘मग इतके दिवस पत्ता लागू नाही दिलात तो ?’’

‘‘अरविंदबाबू, बात तो ऐसी है. माताजीने कहा था, कौनसेही लडकीसे शादी करो. आई, हे खरं ना ?’’

आईने होकारार्थी मान हलवली. मी पुढे म्हणालो,

‘‘तेव्हा अरु, आपल्याला तशा अनेक मुली आवडतात. पण शेवटी आपण कुणाला आवडतो हा प्रश्न जास्त मौलिक. त्याप्रमाणे एक मुलगी आपल्यासाठी ‘मॅड’ झाली हे समजल्यावर ठरवून टाकलं. तेव्हा वहिनी, तुमच्या ह्या एकुलत्या भावजींसाठी काही दिवस रंजनला आणि अरविंदला घेऊन, माहेरी झोपायला जाल ना ?—मधूनमधून भेटायला येत जा !’’

‘‘कशाला तेवढा तरी तुम्हाला त्रास ?’’

‘‘हो, तेही खरंच ! पाहा, जमलं तर येत जा. मुळीच Disturb नाही केलंत तर उत्तमच.’’

‘‘आणि मला कुठे हाकलणार आहेस ?’’—आईने अगदी अकारण विचारलं.

मी त्याच शब्दात उत्तर दिलं,

‘‘अरविंदने ह्यापूर्वीच तुला हाकललं नाही का ?’’

आई ह्या माझ्या प्रश्नावर काही बोलली नाही. मनोरमेने फक्त जळजळीतपणे पाहिलं.

‘‘मुलगी काय करते ?’’

‘‘रिचर्डसन-क्रूडासमध्ये नोकरी करते.’’

‘‘घरी कोण कोण आहे ?’’

‘‘आई, वडील. बाकी कुणी नाही.’’

‘‘सख्खं नसेल. मावस, चुलत...’’

‘‘अजून विचारलं नाही.’’

पार्टनरकडे निघालो तेव्हा आई थेट रस्त्यापर्यंत आली. मला थांबवत तिने विचारलं,

‘‘लग्नाचं खरंच म्हणालास का ?’’

‘‘छे ग, चेष्टा ! तुला मुलगी दाखवल्याशिवाय...’’

‘‘माझा काय प्रश्न आहे त्यात ? तुला आवडलेली असली म्हणजे झालं. एवढ्यात नाही ना ?’’

‘‘नाही.’’

‘‘मग निघताना त्याला सांगितलं का नाहीस ?’’

‘‘माझं स्वत:चं एखादं काम असलं तर आपलं घर त्याचं कसं स्वागत करतं ते पाहायचं होतं.’’

‘‘स्पष्ट बोल.’’

‘‘हेच पाहा की ! अरविंद माझा भाऊ. ह्याच्यासाठी आपण आर्थिक झळ काय कमी वर्षं सोसली ? मी त्याचं कोणतं काम केलं नाही ? पण माझं लग्न म्हटल्यावर त्यांचे चेहरे पाहिलेस ?’’

‘‘नाही हो, तसं काही नाही त्या दोघांचं ! तू मनात काही आणू नकोस.’’

‘‘आई, त्याच्या जागी मी असतो तर, पाठीवर थाप मारुन पार्टी मागितली असती. काँग्रच्युलेशन्स म्हणून ओरडलो असतो. ह्याला चिंता जागेची !’’

‘‘तू असा वाकड्यात शिरु नकोस. जागेची काळजी त्याला तुझ्यासाठी वाटली असेल.’’

‘‘तू त्याचीच बाजू घेणार.’’

‘‘श्री, मला तुम्ही दोघं सारखेच आहात. काहीतरी काय बोलतोस ?’’

‘‘मला कुठे हाकलणार, असं तू नाही विचारलंस ?’’

आई सफाईने म्हणाली,

‘‘ते तर मी त्यालाच टोमणावलं.’’

माझ्याजवळ काही राहिलंच नाही. मी निघालो.

‘‘सकाळी येणार ना ?’’

‘‘सेंटरवरुन दूध आणण्यासाठी ? चिंता करु नकोस.’’

‘‘त्याला सांगून टाक, गंमत केली म्हणून.’’

‘‘त्याचीही काळजी करु नकोस.’’

निरोपादाखल मागे वळून हात वगैरे हलवावा, असं मला वाटेचना. ती तशा अपेक्षेने उभी असेल का हे पाहायचा मात्र अनावर मोह होत होता. तिने उभं राहावं आणि मी मात्र राहू नये आणि तरी ती तशी थांबली होती हे मला कळावं—अशी विचित्र इच्छा बाळगून मी चालत राहिलो.

माझ्यापेक्षा तिचा अरविंदकडे जास्त ओढा होता ह्यात वादच नव्हता. त्याबद्दल माझा दावाही नव्हता. ‘जबरदस्तीच्या पोटी प्रेम नसतं’ असं काकासाहेब खाडिलकरांनी ‘विद्याहरण’ नाटकात जेव्हा लिहिलं, तेव्हा कोणत्या अपेक्षित व्यक्तीकडून त्यांना प्रेम मिळालं नव्हतं, कोण जाणे ! ह्या क्षणी समाधान एवढंच वाटलं की, उपेक्षा वाट्याला येणारा मी एकटाच नाही, खाडीलकर पण आहेत. चालायचंच !

आता काहीही कारण नसताना किरणच्या आईनं पहिल्याच भेटीत एवढी माया का दाखवावी ?—तिने माझी वाट का पाहावी ?—मी कोण ?—पण माझ्या जाण्याने त्या घराला पालवी फुटली.

मी नमस्कार करताच आई म्हणाल्या,

‘‘तुमच्याबद्दल ऐकून होते’’

मी किरणकडे पाहिलं. ती केवळ नजरेने म्हणाली,

‘‘मीच सारखी बडबडत होते.’’

मी आर्इंना म्हणालो,

‘‘माझ्यात तसं खास काही नाही.’’

‘‘खूप साधेपणा, स्वभावाचा सरळपणा, हाही वर्णनाचा विषय होऊ शकतो.’’ किरणकडे पाहत मी म्हणालो,

‘‘तुम्हाला तुमच्या मुलीने काय काय सांगितलं आहे, ह्याची मला कल्पना नाही.’’

‘‘तिला जेवढं माहीत होतं, तेवढं सगळं !’’

‘‘म्हणजे काहीच नाही.’’ मी म्हणालो.

‘‘असं का म्हणता ?’’

‘‘प्रेमात पडलेल्या माणसाला सगळ्याच गोष्टी चांगल्या वाटतात, म्हणून तसं म्हणाली. उद्या मला फटाफट् शिंका यायला लागल्या तर त्याचंही कौतुक होईल.’’

‘‘मग, तुमचं काय म्हणणं ?’’

‘‘पहिल्या भेटीत तुमच्या मुलीशी जे बोललो, तेच तुम्हाला सांगतो.’’

‘‘तेही मला तिने सांगितलंय.’’

‘‘तरी तुम्ही तिला विरोध केला नाहीत ?’’

‘‘नाही.’’

‘‘माझी आजी म्हणायची, आपली मुलगी आपण नेहमी श्रीमंताकडे द्यावी आणि सून आणावी ती मात्र गरिबाची.’’

‘‘पुढे ?’’ आर्इंनी हा प्रश्न इतक्या थंडपणे विचारला की पुढची विधानं मी विसरलोच. तरी कशीतरी चिरगुटं गोळा करावीत तसा म्हणालो,

‘‘बड्याबड्यांच्या तिला मागण्या येतील, मोटारीतून हिंडण्यासाठी तिचा जन्म झालाय. माझ्या घराला तिचं देखणेपण पेलवणार नाही. लंकेच्या पार्वतीसारखं तिला कदाचित जगावं लागेल. मी तिच्यावर जिवापाड प्रेम करीन. वैभव देऊ शकेन की नाही, हे कसं सांगू ? तिची योग्यता हे दोन्ही मिळावं एवढी आहे.’’

‘‘संपलं...?’’—त्याच शांत स्वरात आर्इंनी विचारलं.

मी ‘हो’ म्हणालो.

‘‘वेडे आहात !’’ त्यांनी समारोप केला. मी किरणकडे पाहिलं.

ती नजरेने म्हणाली,

‘‘तू वेडू आहेस.’’

‘‘तुझ्या अंगावर टेरिकॉटचा शर्ट कशाला ? टेरिकॉट, टेरिलीन ह्या कापडाचा शोध पेडर रोडवरल्या माणसांसाठी लागलेला आहे.’’

‘‘माझं कुणालाच पटत नाही.’’ मी स्वत:शीच पुटपुटलो.

‘‘गाढवासारखी विधानं कुणाला पटतील ? किरणचा जन्म तुझ्यासाठी नाही, असं तुझं म्हणणं.’’

‘‘भे !’’

‘‘हाच गाढवपणा ! अर्थात तुझी फारशी चूक नाही म्हणा ! सौंदर्य, ऐश्वर्य, उपभोग ह्याच्याकडे जो पाठ फिरवतो तो पुरुषोत्तम, तो जितेन्द्रिय, हीच षांढ शिकवण आहे आपल्या धर्मात, त्याला कोण काय करणार ? सगळी भिकारड्याची लक्षणं !’’

‘‘पार्टनर, चिडू नकोस !’’

‘‘मग दुसरं काय करु ? सौंदर्याचा संबंध तुम्ही संपत्तीशी जोडता, तेव्हा काय करु ?—कायम चांगल्या गोष्टींची मक्तेदारी श्रीमंतांकडे ? Why for ? मग गरिबांना चांगलं आरोग्य नको, असं का म्हणत नाहीस ?—तुला राजा, आयुष्य समजलंच नाही. उमरभर जिंदा रहा, मगर जिंदगी देखी नही. जाना देव ! तुला किरण नकोय ना, माझी ओळख करुन दे, मी तिच्याशी लग्न करतो.’’

‘‘नाही-नाही पार्टनर !’’

मी इतक्या गडबडीने म्हणालो की मला शरम वाटावी इतका. पार्टनर हसत राहिला.

‘‘O.K., O.K. ! Don't worry. खूबसूरत पोरी जशा गरिबांसाठी नसतात, तशाच त्या माझ्यासारख्या बाहेरख्याली माणसासाठी...’’

‘‘मी तुला बाहेरख्याली म्हणालो नाही.’’

‘‘म्हणालास तरी... I don't care.’’

‘‘माझ्या जे मनातच नाही ते मी का म्हणू ?’’

मी हे म्हणताच पार्टनर एकाएकी बदलला. कावराबावरा झाला. अशा भेदरलेल्या अवस्थेत मी त्याला प्रथमच पाहत होतो. त्याची ती अवस्था माझ्या लक्षात आली आहे हे त्यानेही जाणलं. तो पटकन् उठला. त्याने चिरुट शिलगावला.

चिरुटाच्या भारदस्त, डिग्निफाईड वासाने खोली भरुन गेली. मी तो वास भरुन घेतला. बेफिकीरपणाचं नाटक करीत तो म्हणाला,

‘‘तुला मी लफडेबाज, चालू, बाहेरख्याली माणूस कधी वाटलो नाही ?’’

‘‘नाही.’’

‘‘It's strange.’’

‘‘माणसाच्या प्रत्येक विचारामागे, वागण्यामागे त्याची अशी काहीतरी संगती असते. त्याचा शोध न घेता नुसती माणसांना लेबलं लावायचा आपल्याला काय अधिकार आहे ?’’

‘‘तू हे अगदी मनापासून बोलतोस ?’’

—दोनच मिनिटांपूर्वी, I, don't care असं म्हणणाऱ्या पार्टनरने मला कळवळून विचारलं,

‘‘मी जर असा विचार केला नसता, तर एव्हाना माझ्या आईचं तोंड पाहायचं नाही असं ठरवलं असतं. प्रत्यक्षा आईचं ! मग इतरांची बातच सोड.’’

आणखीन अस्वस्थ होत पार्टनर एकाएकी माझ्या व्यथेकडे वळत म्हणाला,

‘‘तुझी आई तुझ्यावर प्रेम का करु शकत नाही ?’’

मी तितक्याच शांतपणे म्हणालो,

‘‘ह्याचं उत्तर शोधताना, तिची तीसुद्धा थकली असेल. माणसाला, स्वत:ची स्वत:लाही संगती लावता येत नाही केव्हा केव्हा !’’

खूप मोठा झुरका घेऊन, सावकाश धूर सोडीत पार्टनर म्हणाला,

‘‘It's a fact. माझं असंच झालं. जुनी गोष्ट आहे, मला वाटतं...’’

‘‘पार्टनर, मला आज काही ऐकायचं नाही. मी तुझ्याबद्दल गैरसमज करुन घेतलेला नाही, म्हणूनच मला स्पष्टीकरण पण नकोय. एकच लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणून मला तू हवा आहेस.’’

तोच मुद्दा पकडीत पार्टनर म्हणाला,

‘‘किरणचं म्हणणं हेच असेल तर ?’’


क्रमशः.

Post a Comment

0 Comments