Type Here to Get Search Results !

योग

 पुरुषोत्तम योग म्हणजेच 'मी' निघून जाणे!


श्रीकृष्ण अतिशय काटेकोर आहेत. बघा नीट विचार करून. गीतेचा पंधरावा अध्याय त्याची साक्ष देतो. भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय म्हणजेच पुरुषोत्तम योग  हा संपूर्ण गीताशास्त्रातील एक अतिमहत्त्वाचा, गहन आणि परिपूर्ण रत्न अध्याय आहे. अवघ्या वीस श्लोकांत श्रीकृष्णांनी अर्जुनाला संसाराचे खरे स्वरूप, जीवाचे स्थान, परम तत्त्वाचे रहस्य आणि मुक्तीचा सोपा मार्ग उलगडून दाखवला आहे. हा अध्याय छोटा असला तरी त्यात संपूर्ण वेदांचा, उपनिषदांचा आणि संतांच्या अनुभवांचा सार समाविष्ट आहे. येथे भगवंत स्वतःला “पुरुषोत्तम” म्हणून प्रकट करतात  जो नाशवंत जगतापासूनही अतीत आहे आणि अविनाशी जीवात्म्यापासूनही श्रेष्ठ आहे. हा योग जेव्हा मनात उतरतो, तेव्हा जीवनातील सर्व संभ्रम दूर होतो आणि एक शांत, आनंदमय दृष्टी प्राप्त होते.


भगवंत पहिल्या श्लोकापासूनच एक अद्भुत उपमा देतात, हे संपूर्ण जग एका उलट्या पिंपळाच्या झाडासारखे आहे. सामान्य झाडाची मुळे खाली जमिनीत रुजलेली असतात आणि फांद्या-पाने वर आकाशाकडे पसरलेली असतात. पण हा संसारवृक्ष उलटा आहे. त्याची मुळे वर परमात्म्यात खोलवर रुजलेली आहेत आणि फांद्या-पाने खाली त्रैलोक्यात पसरलेली आहेत. वेद हे या झाडाची पाने आहेत, जे या झाडाला पोषण देतात, सौंदर्य देतात आणि जीवनाला दिशा देतात. जो माणूस हे झाड मूळासहित तत्त्वाने ओळखतो, तो खरा वेदज्ज्ञ होतो. ही उपमा किती जिवंत आणि रोजच्या जीवनाशी जोडलेली आहे! आपले शरीर आणि मन हे या उलट्या झाडाचे प्रतिबिंब आहे. मेंदू वर आहे, जिथे मन-बुद्धी रूपी मुळे आहेत, आणि हात-पाय, इंद्रिये, कर्मे हे खाली फांद्या आहेत. जेव्हा आपण विषयांकडे, धन-मान-सुख-नात्यांकडे धावतो, तेव्हा या फांद्या अधिकच पसरतात, गुंतागुंत वाढते, नव्या इच्छा-वासनांचे कोंब फुटतात. आपण मूळ विसरतो जे ते मूळ परमात्म्यात आहे. परिणामी आपण या झाडात अडकतो, जन्म-मृत्यूच्या अनंत चक्रात फिरत राहतो. पिंपळाचे झाड आपल्या संस्कृतीत पवित्र आहे, कारण ते कधी पूर्ण नष्ट होत नाही. त्याची मुळे खोल पसरतात, नवे रोपटी फुटतात. तसेच हा संसार अविनाशी वाटतो, एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी उगवते, एक बंधन तुटले की दुसरे जन्म घेते.


पण भगवंत सांगतात की हे झाड कापता येते: वैराग्याच्या तीक्ष्ण कुऱ्हाडीने. “असङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा” - आसक्तीचा पूर्ण त्याग हेच ते शस्त्र आहे. जेव्हा आपण ठामपणे म्हणतो “हे माझे नाही, हे अनित्य आहे”, तेव्हा हे झाड कोसळते आणि मूळाकडे - परमात्म्याकडे - जाणारा मार्ग उघडतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात जेव्हा एखादी मोठी गोष्ट हिरावली जाते - नोकरी, प्रियजन, यश, आरोग्य - तेव्हा रिकामेपणा जाणवतो. तोच खरा वैराग्याचा क्षण आहे. तेव्हा फांद्यांत अडकणे थांबते आणि मुळाची आठवण येते. वेद ही पाने आहेत कारण ते आत्मोन्नतीचे साधन आहेत. जो फक्त फांद्यांत गुंततो तो वेदांचा खरा अर्थ समजत नाही; जो मूळ ओळखतो तो सर्ववेदवित होतो.


या अध्यायाचे सर्वांत क्रांतिकारी आणि गहन तत्त्व आहे तीन पुरुषांचे वर्णन. पहिला क्षर पुरुष - नाशवंत जगत, सर्व शरीर, भौतिक वस्तू, प्राणी - जे बदलते, नष्ट होते. दुसरा अक्षर पुरुष - अविनाशी जीवात्मा, जो शरीरात राहतो पण शरीराच्या नाशाने नष्ट होत नाही; हा सर्व जीवांत समान, कूटस्थ, निर्गुण आहे. आणि तिसरा उत्तम पुरुष - जो या दोघांपासूनही वेगळा आणि श्रेष्ठ आहे - परमात्मा, पुरुषोत्तम. भगवंत म्हणतात, “यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः । अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः।।” मी क्षरापासून अतीत आहे आणि अक्षरापासूनही उत्तम आहे, म्हणूनच मी पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. हे तत्त्व फार खोल आहे. आपण बहुतेकदा जीवात्मा आणि परमात्मा यांत एकरूपता किंवा भेद मानतो, पण भगवंत स्पष्ट करतात की, जीवात्मा अविनाशी असला तरी तो सीमित आहे, निष्क्रिय आहे, मायेने बद्ध झालेला आहे. तर पुरुषोत्तम सक्रिय आहे व तो जगाचे पालन करतो, आधार देतो, भक्तांच्या आवाहनाला उत्तर देतो, सर्वत्र व्याप्त आहे. “सर्वतः पाणिपादं तत् सर्वतोऽक्षिशिरोमुखम्” - तो सर्वत्र हात-पाय, डोळे-कान, मुख आहे. जीवात्मा हा परमात्म्याचाच अंश आहे, पण सीमित झालेला - जसे सूर्यकिरण आणि सूर्य; किरण सूर्यापासून वेगळा नाही पण सूर्याइतका प्रखर नाही.


या तत्त्वाचा अनुभव आपल्या रोजच्या जीवनात येतो. जेव्हा एकटेपणा जाणवतो, तेव्हा तो जीवात्म्याचा सीमितपणा आहे. पण जेव्हा प्रार्थना करतो, भक्ती करतो, तेव्हा पुरुषोत्तमाची जवळीक, त्याची ऊब जाणवते. पुरुषोत्तम प्राप्तीचे दोन मार्ग भगवंत सांगतात - एक वैराग्याचा, संसारवृक्ष कापण्याचा; दुसरा भक्तीचा, पुरुषोत्तमाचा आश्रय घेण्याचा. “मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् । नाप्नुवन्ति महात्मानः...” जो मला प्राप्त होतो तो पुन्हा या दुःखमय, अनित्य संसारात येत नाही. शेवटचे श्लोक हृदयाला भिडतात - जो मला पुरुषोत्तम म्हणून असम्मूढ होऊन ओळखतो, तो सर्वज्ञ होऊन सर्वभावाने माझे भजन करतो. हे सर्वांत गुप्त शास्त्र आहे; याला जाणणारा बुद्धिमान आणि कृतार्थ होतो. भक्तीचा मार्ग सोपा वाटतो पण तो परम वैराग्यच आहे, कारण पूर्ण समर्पणात क्षर-अक्षर दोन्ही ओलांडले जातात.


पद्मपुराणात या अध्यायाचे फार सुंदर माहात्म्य वर्णन आहे. गौडदेशातील कृपालनृसिंह राजा आणि त्याचा पापी सेनापती सरभमेरुंड - सेनापतीने राजवधाचा विचार केला पण आजाराने मेला आणि पापामुळे घोडा झाला. राजा शिकारीला गेला, तहाने व्याकुळ झाला, एका पानावर या अध्यायाचा अर्धा श्लोक लिहिलेला मिळाला. राजा तो वाचू लागला आणि घोड्याने तो ऐकताच मुक्ती मिळाली, दिव्य विमानात स्वर्गात गेला. नंतर ब्राह्मणाने राजाला रहस्य सांगितले आणि राजाने नित्य पाठ सुरू केला, मोक्ष प्राप्त झाला. हे माहात्म्य सांगते की, या अध्यायाचे केवळ श्रवण, उच्चारण किंवा पाठही मुक्ती देते, कारण यात पुरुषोत्तमाचे नाम आणि स्वरूप आहे.


आजच्या जगात हे तत्त्व किती उपयुक्त आहे! आपण सतत धावपळ करतो - यश, सुरक्षा, नाती शोधतो - पण हे सर्व क्षर आहे. जेव्हा ते हिरावले जाते तेव्हा खरा प्रश्न उभा राहतो - मी कोण? तेव्हा पुरुषोत्तमाची आठवण येते. विज्ञानाच्या भाषेत क्वांटम फिजिक्स सांगते की, सर्व कण एकमेकांशी जोडलेले आहेत - तसेच पुरुषोत्तम सर्वांना व्यापून आहे. मानसशास्त्रात ‘सेल्फ’ आणि ‘हायर सेल्फ’चा भेद आहे - तोच अक्षर आणि उत्तम पुरुषाचा. जो पुरुषोत्तमाला ओळखतो त्याचे जीवन खेळ बनते - तो हसतो, रडतो, कर्म करतो पण अंतर्मन शांत राहते. हा अध्याय संपूर्ण वेदांचा सार आहे. तो सांगतो की, जीवन हे उलटे झाड आहे - मूळ परमात्म्यात आहे. जो हे ओळखतो तो फांद्यांत अडकत नाही, पुरुषोत्तमाला शरण जातो आणि सर्वभावाने भजतो. असे भजन करणारा कधी एकटा राहत नाही - पुरुषोत्तम त्याच्या हृदयात वास करतो. हा आनंद सुख-दुःखापलीकडचा शुद्ध आनंद आहे. पुरुषोत्तमाच्या चरणी समर्पित होऊया. 


जय श्रीकृष्ण! जय पुरुषोत्तम!

महादेव!!


Post a Comment

0 Comments