Type Here to Get Search Results !

दोन किनारे एक प्रवाह


     *🔰दोन किनारे एक प्रवाह 🔰*

                  


गाडी मुंबईच्या गर्दीतून वेगाने धावत होती. सिग्नल्स, गर्दी, गजबजलेले चौक पार करत ती अखेर एका भव्य बंगल्यासमोर येऊन थांबली. मोठं लाकडी गेट, त्यावर कोरलेली सुवर्णाक्षरं— "डॉ. संजीवनी देशमुख"


हे नाव पाहताच मानसीच्या डोळ्यांत आश्चर्य उमटलं. ती नकळतच पुटपुटली, "संजीवनी देशमुख..."


निधीने तिच्याकडे पाहिलं, तिच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव टिपले. 


"घर तुझ्या आईच्या नावावर आहे वाटतं?" ती हळूच म्हणाली.


निधीने एक दीर्घ श्वास घेतला. "हो, हे सगळं माझ्या आईचंच आहे... पण आई मात्र... ती कुठेच नाही. " तिचा आवाज थोडा भरून आला.


मानसी तिच्याकडे सहानुभूतीने पाहत होती. "कदाचित काही कारण असेल, निशा वेळ लागेल, पण कधीतरी हे कोडं सुटेल."


तिने हलकेच गाडीचा ब्रेक दाबला आणि पार्किंगमध्ये गाडी थांबवली. दोघी गाडीतून बाहेर पडल्या, पण मनात मात्र अनुत्तरित प्रश्नांचं वादळ उसळलं होतं.


रजनी काकूंनी थोडं आश्चर्यचकित होत विचारलं, "निशा बेटा, आपण तर थेट हॉस्पिटलला जाणार होतो ना? मग हे कुठे आणलंस?"


निधीने हलकं हसत उत्तर दिलं, "काकू, हे माझं घर आहे. आपण आधी फ्रेश होऊ, थोडा आराम करू, मग हॉस्पिटलला जाऊ."


"अगं, पण सरळच गेलो असतो ना? सौरभला भेटायला उशीर होईल..."


"काकू, आता हॉस्पिटलमध्ये भेटण्याची वेळ संपली आहे. संध्याकाळी जाऊ, तोपर्यंत आपण थोडं फ्रेश होऊ." निधीने समजावत म्हटलं.


मानसी आजूबाजूला नजर फिरवत होती. हे घर म्हणजे मोठाच बंगलाच होता—भव्य आणि प्रशस्त. त्याच्या प्रत्येक कोपऱ्यात एक वेगळीच प्रतिष्ठा आणि शिस्त जाणवत होती.


तिघीही गाडीतून उतरल्या. सामान उचलत त्या बंगल्याच्या दरवाजाकडे चालू लागल्या. निधीने आपल्या पर्समधून चावी काढली आणि सरावलेल्या हाताने दार उघडलं.


मानसी आणि रजनी तिच्या मागोमाग घरात शिरल्या. घरात पाऊल टाकताच मानसीच्या मनात अनेक भावना उसळल्या—कौतुक, आश्चर्य, आणि कुठेतरी खोलवर एक अनामिक ओढ.


राजनीने हलक्याच आवाजात विचारलं, "निधी, हे घर... तुझ्या आईचं आहे का?"


निधी थोडा वेळ शांत राहिली, मग मंद स्वरात म्हणाली, "हो... हे माझ्या आईचं घर आहे पण आता हे माझं अणि बाबांचं आहे. आई आमच्यासोबत राहत नाही"


त्या क्षणी रजनी आणि मानसी एकमेकांकडे पाहत थबकल्या. तीन व्यक्ती, तीन वेगळे विचार… पण कुठेतरी एकच गूढ दडलेलं होतं.


दार उघडून आत येताच श्रीमंतीचे दर्शन होत होते—भव्य हॉल, महागडे फर्निचर, सुंदर रेशमी पडदे, छताला लटकणारं मोठं झुंबर, जमिनीवर मऊशार कालीन. सगळीकडे एक नजाकत, एक ऐश्वर्य जाणवत होतं.


हॉलमध्ये थोडा वेळ थांबून तिघींनी नजर फिरवली. ही वास्तू केवळ श्रीमंतीची नव्हे, तर एखाद्या सुसंस्कृत, उच्चभ्रू कुटुंबाची साक्ष देत होती.


निधीने वातावरण हलकं करत म्हटलं, "काकू, तुम्ही माझ्या बेडरूममध्ये चला. फ्रेश होऊ, मग एक छानशी कॉफी घेऊ आणि नंतर हॉस्पिटलला जाऊ."


तिघीही आत गेल्या. प्रत्येकीच्या मनात निरनिराळे विचार होते, पण कुणीही बोललं नाही.


निधी फ्रेश होऊन बाहेर आली. तिच्या बेडरूमच्या भिंतीवर एक फोटो होता—निधी आणि तिचे बाबा.


रजनीचा नजर त्या फोटोवर स्थिरावली. तिच्या मनात अचानक विचारांचा भुंगा सुरू झाला—"डॉ. राजन...? हाच का तो माणूस? ज्याचं नावही मी विसरायचं ठरवलं होतं?"


रजनीच्या मनात जुन्या आठवणींचा पूर आला. "राजन श्रीमंतांच्या डॉक्टर असलेल्या मुलीशी लग्न करणार होता... मग ही मुलगी? आणि निशाची आई कुठे आहे?" तिच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता.


"नाही... मी इथे थांबणं धोक्याचं ठरेल. जितकं लवकर जाता येईल तितकं चांगलं."


रजनी आता अस्वस्थ झाली होती. ती जायला निघू लागली.


"अहो, काकू! आता गेलं तरी सौरभ भेटणार नाही." निधीने तिला थांबवायचा प्रयत्न केला.


"अगं, आम्ही वेटिंग रूममध्ये बसू." रजनीने पटकन उत्तर दिलं.


"ठीक आहे काकू, मी पटकन मस्त कॉफी करून आणते. मग लगेच निघू."


"मी पण येते किचनमध्ये." मानसी उठली.


"काकू, तुम्ही बसा हं... आम्ही घेऊन येतो." असं म्हणत दोघी किचनकडे निघाल्या.निधीने तिच्याकडे पाहिलं, तिच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव टिपले. 


------- 


दुसरीकडे, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर राजन अस्वस्थ आणि बेचैन होते. ते वारंवार घड्याळाकडे पाहत होते. प्रत्येक मिनिट त्यांच्यासाठी तासासारखं वाटत होतं.


"निधी का आली नाही?" त्यांनी सौरभकडे काळजीच्या सुरात विचारलं.


"काही अर्जंट काम आहे असं बोलली, काका," सौरभ म्हणाला.


"अर्जंट काम? असं कोणतं काम की तिनं मला न सांगता बाहेर पडावं?" राजनांच्या मनात शंकेचं वादळ उठू लागलं.


ते स्वतःशीच पुटपुटले, "निधी हल्ली खूप बदललीय… चार दिवस नागपुरला जाऊन आली, म्हणाली काही काम आहे. पण काय ते स्पष्ट सांगितलंच नाही. चेहऱ्यावर कायम उदासी… डोळ्यांत काळजी… काही अडचणीत तर नाही ना ती? घरी जाऊन बघावं का?"


त्यांच्या मनात काळजी दाटून आली. निधीची आई गेल्यापासून, तीच त्यांची सगळी दुनिया झाली होती. तिचं हसणं, बोलणं, तिचं सुख—याच गोष्टी त्यांच्यासाठी आता आयुष्याचं सार होत्या.


"ती सुखी राहावी म्हणून तर मी सौरभसारखा समंजस, हुशार मुलगा शोधला. त्यांचं लग्न झालं की तिचं आयुष्य स्थिर होईल… आणि मीही शांतपणे श्वास घेईन…" त्यांनी एक खोल श्वास घेत गाडी सुरू केली.


रस्त्यावर गाडी चालवत असताना विचारांचा कल्लोळ मनात घोंघावत होता. काहीतरी बिनसतंय… पण काय?


घरासमोर पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं—दार उघडंच होतं.


हृदय धडधडायला लागलं.


हळूच पावलं टाकत ते घरात शिरले. हॉलमध्ये निस्तब्ध शांतता होती. पं ते सरळ निधीच्या बेडरूमकडे वळले…


आणि पुढचं दृश्य पाहून त्यांना जोराचा धक्का बसला. त्यांच्या नजरेसमोर अंधार दाटून आला.


"तू…??? इथे???" त्यांच्या ओठांतून क्षीण, थरथरता स्वर बाहेर पडला.


त्यांच्या आवाजात आश्चर्य, वेदना, आणि अनपेक्षित धक्क्याचं मिश्रण होतं...


डॉ. राजन दारात स्तब्ध उभे राहिले. समोर रजनी खडबडून उभी होती. त्यांच्या नजरा भिडल्या, आणि क्षणभर भूतकाळ जिवंत झाला. २७ वर्षांनी दोन भूतकाळाशी जोडलेली माणसं एकमेकांसमोर उभी होती.


त्या क्षणात कित्येक आठवणी वीजेसारख्या त्यांच्या मनात चमकून गेल्या.


डॉ. राजन हलकेच पुटपुटले,


"तू...? तू इथे कशी?"


रजनीनं स्वतःला सावरलं. तिच्या स्वरात स्पष्टतेचा अंश होता.

"डॉ. राजन, मला माहीतच नव्हतं की हे तुमचं घर आहे... निशाने मला इथे आणलं."


"निशा?" डॉ. राजन अजूनही गोंधळलेले होते.


"हो... तुमची मुलगी."


"माझ्या मुलीचं नाव निधी आहे, पण तू तिला 'निशा' का म्हणते आहेस?"


रजनी चमकली. "हो का? पण तिनेच मला तिचं नाव निशा सांगितलं. का बरं?"


डॉ. राजन काही बोलायच्या आतच रजनी पुढे म्हणाली,


"डॉक्टर, मी इथे कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी आलेली नाही. फक्त एवढंच सांगायला आले आहे की... डॉक्टर सौरभ नागपुरला शिकत असताना माझ्या मुलीशी त्याचं प्रेम जुळलं होतं. आजही ते एकमेकांवर मनापासून प्रेम करतात. आणि आता, सौरभच्या अपघाताची बातमी समजताच तिला त्याला भेटायचं होतं."


डॉ. राजन स्तब्ध झाले. "म्हणजे...?"


"हो. आम्ही फक्त भेटायला आलो आहोत. काही दावेदारी करायला नाही. आणि जर मला आधीच माहिती असतं की 'निशा' म्हणजेच तुमची मुलगी निधी आहे, तर मी इथे कधीच आले नसते."


रजनी बोलत असताना डॉ. राजन तिच्या डोळ्यांत पाहत होते. त्या डोळ्यांत एकीकडे जुन्या आठवणींची साक्ष होती, तर दुसरीकडे आजच्या परिस्थितीची कठोर जाणीव...


डॉ. राजन स्तब्ध उभे होते. त्यांच्या नजरेसमोर जुन्या आठवणींचा एक वेगवान पट उलगडत होता. भूतकाळ जिवंत झाल्यासारखा वाटत होता. त्यांनी कधीच विचार केला नव्हता की रजनी परत त्यांच्या आयुष्यात येईल... तेही अशा परिस्थितीत.


त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. स्वर कंप पावत त्यांनी पुटपुटलं, "रजनी... सिस्टर रजनी... बस ना. कशी आहेस? कुठे होतीस इतके दिवस? मी तुला किती शोधलं होतं..."


रजनी थंडपणे हसली. तिच्या डोळ्यांत वेदना स्पष्ट जाणवत होती. "शोधायचं काय होतं, डॉक्टर? तू तुझ्या मार्गाने गेलास. लग्न केलंस. मग कशाला शोधत होतास? आता त्या जुन्या गोष्टींचा काही उपयोग नाही. आम्ही इथे फक्त सौरभला भेटायला आलो आहोत आणि निघून जाणार आहोत."


रजनी काही बोलायच्या आतच डॉ राजन म्हणाले , "पण तुझी मुलगी सौरभवर प्रेम करत असेल तर?" त्यांनी हळू आवाजात विचारलं.


रजनी थोडीशी थबकली. तिच्या चेहऱ्यावर काही क्षण अस्पष्ट भावना उमटल्या आणि नाहीशा झाल्या. "प्रेम आहे... पण लग्न करणार की नाही. हे अजून नक्की नाही."


डॉ. राजन यावर शांत बसू शकत नव्हते. एक बाप त्यांच्या आत तडफडत होता. त्यांना निधीसाठी सौरभ हवा होता. त्यांच्या मुलीच्या जीवनात पहिल्यांदा प्रेम आलं होतं. ती आयुष्यभर त्यांच्या प्रेमाच्या शोधात होती, आणि आता ते प्रेम तिला मिळू लागलं होतं.


"रजनी, प्लीज..."

त्यांनी थोडा आवाज वाढवला, पण निधी ऐकेल या भीतीने तो लगेचच कमी केला. ते अगदी जवळ येऊन हळू आवाजात म्हणाले,

"निधीचं सौरभशी लग्न ठरलं आहे. तुझी मुलगी आणि सौरभ... त्यांचं काही शक्य नाही. प्लीज, तू निघून जा. मी तुझ्या पाया पडतो, रजनी... सौरभला सोड. माझ्या मुलीच्या सुखासाठी मी तुझ्यापुढे हात जोडतो."


डॉ. राजन, एक प्रतिष्ठित डॉक्टर, मोठ्या बंगल्याचा मालक, आता फक्त एक बाप होते... आपल्या मुलीच्या सुखासाठी भिक मागणारा बाप. त्यांच्या डोळ्यातून आसवं वाहत होती.


रजनी त्या दृश्याकडे काही क्षण निःशब्दपणे पाहत राहिली. तिच्या मनात कितीतरी भावना एकत्र उसळल्या. संताप, वेदना, अविश्वास, आणि काहीतरी अजून खोल, अजून वेदनादायक. तिने हळूच डोळे मिटले आणि एक खोल श्वास घेतला.


"किती स्वार्थी आहात तुम्ही, डॉक्टर राजन."तिचा आवाज ठाम होता, पण त्यात दाटलेली वेदना स्पष्ट जाणवत होती.


"तुम्ही आजही तुमचं सुख, तुमच्या मुलीचं भविष्य, आणि तुमचं समाजातलं स्थान... याच गणितात अडकलेले आहात. पण माझ्या मुलीच्या भावना, तिचं प्रेम, तिचं दुःख... त्याचा काहीच विचार नाही? आज इतक्या वर्षांनी भेटतोय तू, आणि पहिल्याच क्षणी माझ्या मुलीच्या प्रेमाचा सौदा करत आहेस?"


डॉ. राजन गप्प होते. त्यांच्या नजरा खाली झुकल्या होत्या


"निधीचं प्रेम खूप असू शकतं, आणि तिला सुख मिळावं अशी तुमची इच्छा देखील खरी असेल. पण सौरभ कोणाचा आहे, याचा निर्णय तुम्ही नाही, तोच घेणार. त्याच्या हृदयात कोण आहे, हे त्यालाच ठरवू द्या."


रजनी वळली. तिच्या पावलात आता निर्धार होता, डोळ्यांत अश्रू.


"मी इथे आली, कारण माझ्या मुलीच्या मनात अजूनही आशा आहे. सौरभला शेवटचं पाहण्याची, त्याच्याशी बोलण्याची. तुमच्या भीतीमुळे नाही, पण तिच्या प्रेमासाठी. आणि आता... मी फक्त तिच्यासोबत आहे. बाकी काहीही नाही."


डॉ. राजन तिथेच थिजून उभे राहिले. त्यांना उमगत होतं—काही गोष्टी पैशानं, प्रतिष्ठेनं किंवा इगोने जिंकता येत नाहीत. त्या हृदयानं आणि समजून घेण्याच्या ताकदीनंच जिंकता येतात.


"ठीक आहे, निधी मला मुलीसारखीच आहे. तिला खरंच प्रेम मिळणार असेल, तर आम्ही सौरभला भेटून लगेच निघून जाऊ."


त्या रात्री, हवेत गूढ शांतता होती. तीन हृदयं, तीन वेगळ्या संघर्षांत गुंतलेली होती. पण त्या सगळ्या धुक्यातही, कुठे तरी एक नाजूक आशेची किरण झिरपत होती...


क्रमशः

Post a Comment

0 Comments