Type Here to Get Search Results !

संयम आणि अप्रूप

 *संयम आणि अप्रुप*

-----------------------------


पूर्वी घरात इडली करायची म्हटलं तरी उत्सव असायचा. आदल्या दिवशी तांदूळ-डाळ धुवून,भिजत घालून मग ती सरबरीत वाटायची, पीठ आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं. सांबार आणि चटणीसाठीची तयारी आणखी वेगळीच. आता हा सगळा डावच अाठवणींपुरता उरलाय. रेडी टू मेक पीठ मिळतं आणि तयार चटणीही विकत मिळते. नुसत्या इडल्या केल्या की काम झालं. तेवढे कष्ट नको असतील तर ढीगभर हाॅटेल्स आहेत, तिथं जायचं आणि खायचं. तेवढेही कष्ट नको असतील तर स्विगी, झोमॅटो, उबर वगैरे आहेच सेवेला...!


दिवाळी जवळ आली की घरात फराळाच्या पदार्थांची तयारी सुरू व्हायची. काय व्याप असायचा तो..! आता ते संपल्यात जमा आहे. आॅर्डर देऊन पदार्थ विकत आणायचे आणि खायचे. कैरीचं पन्हंसुद्धा तयार करण्याचे कष्ट आता कुणी घेत नाहीत, त्याचा पल्प दुकानात तयार मिळतो. साखरसुद्धा मिसळायची गरज नाही. नुसतं पाण्यात टाकून ढवळलं की झालं. 


ढोकळा, अळूवड्या, कोथिंबीर वड्या करायच्या म्हणजे पुष्कळ घाट असायचा. आता हे पदार्थ घरी करण्याचे पदार्थ राहिलेलेच नाहीत. भेळेसाठी लागणारी चिंच-गुळाची चटणीसुद्धा तयार मिळते, पाणीपुरीचं पाणी तयार मिळतं. मुगाची खिचडीसुद्धा तयार मिळते, आपण फक्त त्यात मापानं पाणी घालून कुकर लावायचा की झालं. (येत्या काळात त्या खिचडीबरोबरच त्यात घालण्याच्या पाण्याचा पाऊच सुद्धा देतील आणि त्याचेही पैसे लावतील असं मला वाटायला लागलं आहे.) 


चिवडा, चकली, करंज्या, शंकरपाळ्या, अनारसे, कडबोळी दिवाळीतच खायला मिळायची, ती आता वर्षभर मिळतात. आंब्याचा रस वर्षभर मिळतो, आंबापोळी-फणसपोळी वर्षभर मिळते, गव्हाचा चिकसुद्धा वर्षभर मिळतो. पूर्वी केवळ दिवाळीतच हौसेनं होणारी कपड्यांची खरेदी आता वर्षभरात कधीही होते किंवा वर्षभर सुरूच असते. एकूण काय तर, कोणत्याही गोष्टीसाठी आता वाट पहावी लागत नाही. सगळं झटपट आणि तयार मिळतं, कधीही-केव्हाही-कुठंही... आयुष्यातलं अप्रूप पार संपूनच गेलं.. त्या अप्रूपातला आनंद आणि अनामिक हुरहूरही आटून गेली. आठवणींची धरणं अप्रूपाच्या दुष्काळामुळं कोरडी पडलीत.. 


आयुष्यातलं अप्रूप संपवून टाकण्याची इतकी घाई लोकांना झाली आहे की सांगता सोय नाही. लग्नाआधीच प्री-वेडींग शूट करणं हे त्यातलंच एक पिल्लू आहे. आयुष्याच्या जोडीदाराबरोबर नात्यात बांधलं जाण्याआधीच इतकं जवळ जाणं म्हणजे त्यातलं अप्रूप संपवून टाकण्यासारखं आहे आणि ते अतिशय खाजगी, उत्कट क्षण आपण एकांतात न जगता केवळ फोटोशूट करण्यासाठी जगतो, तेही दुसऱ्याच कुणाच्यातरी दिग्दर्शनाखाली...? आयुष्य कृत्रिम, बेचव, नीरस, कंटाळवाणं वाटायला लागतं किंवा बोअर व्हायला लागतं ते ह्याच गोष्टींमुळं... असं सतत नीरस वाटणं हेच तर मानसिक अस्वस्थतेचं खरं मूळ आहे..


निरांजनाच्या फुलवाती आता नुसत्या मिळत नाहीत तर थेट तुपात भिजवलेल्याच मिळतात. दसरा, दिवाळीची फुलांची तोरणं आता तयार मिळतात. संक्रांतीचे हलव्याचे दागिने तयार मिळतात. लग्नातलं रूखवत तयार मिळतं, आता तर ते भाड्यानंसुद्धा मिळतं. नऊवारी साडी किंवा सोवळं शिवून मिळतं. साड्या नेसवणारी माणसंसुद्धा मिळतात आणि ती साड्या नेसवण्याचे बक्कळ पैसे घेतात. सत्यनारायण पूजेचं किंवा गणपतीच्या पूजेचं साहित्य रेडीमेड खोक्यात मिळतं. अगदी ओटीच्या पुड्यासुद्धा रेडीमेड...


‘बस दो मिनट’ ह्या तीन शब्दांनी घराघरातल्यांच्या मनांवर गारूड केलं तेव्हापासूनच संयमाला सुरूंग लागला. रसना, मॅगी आणि बोर्नव्हिटा हीच ती तीन उत्पादनं..! घराघरातला, माणसा-माणसांतला संयम संपवायला सुरूवात केली ती ह्यांनीच. लागली भूक की खा मॅगी.. दोन मिनिटांत एनर्जी हवी असली तर घे बोर्नव्हिटा.. मुलांचे लाड दोन मिनिटांत पुरवायचे असतील तर करा रसना लगेच.. “भूक लागली भूक लागली म्हणून कावकाव करू नकोस. दहा मिनिटं बस एका जागी. थालिपीठं लावतेय..” असं म्हणणं आयांनी सोडूनच दिलं. कारण काय? तर “वेळच नसतो..” संयम ठेवण्याची गरजच संपवून टाकायला निघालो आपण. क्षणभर थांबण्याचीसुद्धा काहीही आवश्यकता नाही असं स्वत:लाच पावलोपावली पटवून देत राहिलो आपण. 


आठ-आठ दिवस एखाद्या गोष्टीची तयारी करणं, त्यासाठी आवर्जून वेळ देणं, ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत वाट पाहणं ही जगण्याची पद्धतच आता अडगळीत गेली. पण, त्याचा भलताच दुष्परिणाम आपल्या मुलांच्या आयुष्यावर झाला आहे. त्यांना एखाद्या गोष्टीसाठी वाट पाहण्याची कल्पनासुद्धा करता येत नाही. त्यांची आयुष्यं आपण विनाकारणच नको तितकी वेगवान आणि अतिआरामदायक करून टाकलीत. काही वर्षांपूर्वी टॅक्सी ही चैन होती, पण आता त्यांना गावातल्या गावात कुठं जायचं असेल तरी आपण एसी कॅबनं जातो. मोठ्या भावंडांकडून किंवा शेजार-पाजारहून गोष्टी उसन्या घेऊन त्या वापरणं आपण ‘प्रेस्टीज ईश्यू’ मुळं बंद करून टाकलं खरं, पण त्यामुळं आपल्या मुलांमध्ये ‘मी-माझं-मला’ आणि ‘माझं माझं स्वतंत्र हवं’ ही वृत्ती रूजायला लागली. ‘हे आपलं आहे किंवा हे आपल्या सगळ्यांचं आहे, माझं एकट्याचं नाही’ हे शिक्षणच बंद करून टाकलं गेलं. 


हेच वागणं मुलांना मानसिकदृष्ट्या अधिकाधिक चंचल, स्वार्थी आणि आत्मकेंद्रित बनवत जातं. ती अतिशय अस्वस्थ होतात, टोकाच्या प्रतिक्रिया देऊ लागतात. ‘सगळ्या गोष्टी मला हव्यात तशा आणि तात्काळ होणार नाहीत’ हे त्यांना पटत नाही, आवडत नाही. अनिर्बंध जीवनशैलीची त्यांची अपेक्षा वाढतच जाते. मग त्यांना कुणाचा नकारही पचवता येत नाही, अपयश पचवता येत नाही. कमी पगाराची नोकरी स्वीकारता येत नाही. फेसबुकवरच्या एखाद्या फोटोला कमी लाईक्स मिळाले तर त्यांना पराकोटीचं अस्वस्थ वाटायला लागतं. ही सगळी अत्यंत वेगवान आणि अत्यंत तकलादू व्यक्तिमत्वाची लक्षणं आहेत.


तशी काहीच गरज नसते पण तरीही माणसं पायाला भिंगरी लावल्यागत पळत राहतात. प्रत्येकालाच लेटेस्ट आणि ॲडव्हान्स्ड होण्याची घाई लागलीय. सगळ्या गोष्टी अगदी विनासायास आणि हाताशी हव्यात, असा आपला आग्रह असतो. हळूहळू हा आग्रह दुराग्रहामध्ये बदलायला लागतो आणि त्याच दुराग्रहाला आपण ‘लाईफस्टाईल’ मानायला लागतो. हेच गुण (खरं तर दोष) आपल्या मुलांमध्ये पुरेपूर उतरायला असा कितीसा वेळ लागणार? इन्स्टन्ट च्या जमान्यात माणसांमध्ये दोषही फोर-जी च्या स्पीडने डाऊनलोड होतात. मग आयुष्य साधं, सरळ, सोपं राहतच नाही. उलट ते ताणतणाव, चिंता, कटकटींनी भरायला लागतं. ‘लहान-लहान गोष्टींमधला आनंद घ्या’ असं सांगणं फार सोपं आहे. पण त्यासाठी आयुष्याचा वेग कमी करणं आवश्यक आहे. आपण तो वेग कमी न करता, उलट वाढवतच चाललो आहोत. हे चुकीचं नाही का? 


आपल्या व्यक्तिमत्वातल्या संयम आणि अप्रूप या दोन्ही गोष्टी दिवसेंदिवस कमी का होत चालल्या आहेत, याची कारणं इथं दिसतात. “वेळ नाही” ह्या सबबीनं आपलं आयुष्यच खराब करून टाकलं आहे. ही सबब केवळ खाण्यापिण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही तर, चार भिंतींच्या आतलं खाजगी आयुष्यसुद्धा ह्याच सबबीमुळे नासून गेलं आहे. वेळ देणं हाच नात्यांचा कणा असतो. नेमका तोच नसल्यामुळं नाती कणाहीन बनत चालली आहेत. 

त्याचे सगळे दुष्परिणाम घराघरातून दिसतच आहेत. 


आपण माणसं म्हणजे स्वत:च स्वत:ला पृथ्वीवरचे सर्वात जास्त अक्कलवान प्राणी समजणारे स्वयंघोषित तज्ज्ञ..! एखादी गोष्ट स्वत:नं तयार करण्यात खरं तर किती  मोठा आनंद असतो. पण तो आनंद पैशानं विकत घेण्याचा उद्योग माणसानं सुरू केला. मग काय, ह्या अनाठायी प्रगतीच्या मागं लागून जीवघेणी फरफट सुरू होते. आनंद कुठंतरी हरवूनच जातो मग.. आपली ही चूक इतकी मोठी अन् महागात पडणारी आहे की, त्या चुकीची शिक्षा म्हणून आपण स्वत:ला पारखुन  घेणं अजिबात गैर होणार नाही. 


संयम आणि अप्रूप..खरोखरच दोन्ही जपतां आलं तर आयुष्यातला आनंदाचा दरवळच इतका वाढेल की, बाहेरच्या अत्तरांची गरजच वाटणार नाही.


हलवायाची मैतरकी गोडीची असतेच, पण कधीतरी स्वत:च्या हातानं पेढा तयार करावा की...

तो गोडवा आयुष्यभर रेंगाळावा...!!!


😊🌸🌸🌸

 खरंच ते अप्रूप कमी झालंय लोकं इन्स्टंटच्या मागे लागलेत मग ते पदार्थ असोत किंवा नाती,रांगोळीत प्रत्येक रंग हातानी भरला जायचा आणि आउट लाईन करुन सुबकता यायची आता तयार सुबक रांगोळी साचेच मिळतात तयार आणि इन्स्टंटचा जमाना आहे पण गोडी आणि गोडवा दोन्ही गेले.....!

Post a Comment

0 Comments