#दोन_किनारे_एक_प्रवाह (भाग - ७७)
निधी आरशासमोर उभी राहून आपल्या कपड्यांकडे निरखून पाहत होती. तिच्या बेडवर चार-पाच सुंदर ड्रेसेस अस्ताव्यस्त पडल्या होत्या—प्रत्येक वेगळ्या रंगाचा, वेगळ्या स्टाइलचा, आणि प्रत्येकासोबत जुळवलेल्या असंख्य अॅक्सेसरीज—कधी एखादी एअररिंग हातात घेऊन कानाला लावून पाहायची, तर कधी एखादी चेन गळ्यात घालून आरशात न्याहाळायची. पण तरीही काही ठरवता येत नव्हतं.
तेवढ्यात, दारावर हलकासा आवाज झाला, आणि तिचे बाबा, डॉ. राजन, आत आले. ते तिथलं दृश्य पाहून थोडं थबकले. "हे काय चाललंय?" त्यांचं आवाजात गंमतीशीर आश्चर्य होतं.
निधी त्यांच्याकडे वळून हसली. "बाबा, मला पार्टीला जायचं आहे.मला काही कळत नाहीये! कोणता ड्रेस घालू? काही ठरतच नाहीये! तुम्हीच सांगा ना!" ती चेहरा काहीसा अर्धवट तक्रारीच्या सुरात म्हणाली.
डॉ. राजननी खोलीभर नजर फिरवली—बेडवर पडलेले कपडे, सगळीकडे विखुरलेल्या अॅक्सेसरीज, आणि आरशासमोर गोंधळलेल्या चेहऱ्यानं उभी असलेली त्यांची मुलगी. क्षणभर ते थोडेसे थबकले .. बापरे, हे काय आहे? सगळं दुकान काढून ठेवलं, हसत डॉ राजन म्हणाले .
निधीने त्यांच्याकडे पाहिलं आणि मोठ्याने हसली. "बाबा! तुम्ही ना..." ती लाजून कपाळावर हात मारत म्हणाली.
तेवढ्यात तिने एक ड्रेस उचलला आणि डॉ. राजनकडे दाखवत विचारलं, "हा कसा वाटतो?"
"अगदी छान! माझी मुलगी तर आजच्या पार्टीत सर्वात सुंदर दिसणार!" त्यांनी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि हसत बाहेर गेले.
आता निधीही निर्धास्त झाली. बाबांनी पसंती दिलेली गोष्ट चुकीची कधी असते का?
निधीने बाबांनी पसंती दिलेला ड्रेस हातात घेतला आणि आरशासमोर नाचू लागली, जणू पार्टी तिच्या डोळ्यांसमोर उभी होती. ती फक्त ड्रेस निवडत नव्हती, तर स्वतःला मोकळं करत होती. डॉ. राजन यांचं मन तिथेच थांबलं. निधीच्या त्या बिनधास्त ऊर्जेत त्यांना संजीवनी दिसली—जी नेहमी मनाप्रमाणे जगायची. त्यांना आठवलं, संजीवनीही हॉस्पिटलच्या कठोर वातावरणात मस्ती करायची, मित्रांसोबत नाचायची, आणि नव्या उमेदीने कामाला लागायची. "ही मुलगी खरंच तिच्या आईवर गेलीय," राजन मनात पुटपुटले.
"निधीचं हसणं पाहून त्यांना संजीवनीची आठवण झाली, आणि त्यांच्या मनात जुन्या आठवणींचा प्रवाह पुन्हा सुरू झाला."
रात्रीचा गार वारा खिडकीतून आत येत होता. डॉ. राजन संथ पावलाने आपल्या स्टडीमध्ये गेले. त्यांच्या डोळ्यांसमोर जुन्या आठवणी क्षणाक्षणाने जिवंत होत होत्या...
जेव्हा ते अजून जन्मलेही नव्हते, तेव्हाच त्यांचे वडील त्यांना सोडून गेले. त्यांच्या आईच्या जीवनात अचानक काळोख दाटून आला. घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. पण सुदैवाने, तिच्या चुलत भावाने—म्हणजेच डॉ. राजनच्या मामाने—तिला आधार दिला.
"हा मुलगा वडिलांशिवाय कसा वाढणार?" मामाने एकदा गंभीर स्वरात म्हटले होते.
मामाने त्यांना आपल्या घरी आसरा दिला. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. राजन अत्यंत हुशार होते, मेहनती होते. त्यांच्या बुद्धीमत्तेमुळे त्यांनी एमबीबीएस, मग एमडी पूर्ण केले. त्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आले, आणि त्यामागे मामांचा मोठा हातभार होता.
पण आयुष्य नेहमीच मनासारखं घडतं असं नाही...
एमडीच्या शेवटच्या वर्षाला असताना, राजनला रजनी भेटली. तिच्या हास्यात एक वेगळंच आकर्षण होतं. तिच्या डोळ्यांत एक जादू होती, जिच्याशी त्यांचं मन नकळत जडत गेलं. दोघांचं प्रेम सर्व सीमा ओलांडून फुलत गेलं.
एक दिवस, रजनीच्या मिठीत विसावलेला राजन तिच्या डोळ्यांत डोकावत म्हणाला,
"रजनी, आपण लग्न करूया!"
ती गोंधळली.
"राजन, तुझी आई... तुझा मामा... ते काय म्हणतील?"
"माझ्यासाठी फक्त तू आहेस, रजनी. दुसरं काहीही महत्त्वाचं नाही."
पण नियतीच्या हातात वेगळंच लिहिलं होतं...
त्या दिवशी संध्याकाळीच आईचा फोन आला. तिचा आवाज हलत होता.
"राजन, ताबडतोब घरी ये! मामाला तुला काहीतरी सांगायचं आहे."
जेव्हा राजन घरी पोहोचला, तेव्हा त्याच्या मामाने त्याला समोर बसवलं. आवाज गंभीर होता.
"राजन, माझ्या आयुष्याचा शेवट जवळ आलाय..." मामांनी हलक्या आवाजात सांगितलं.
"काय बोलताय तुम्ही?" राजनने घाबरून विचारलं.
"कॅन्सर झालाय मला. शेवटची स्टेज आहे. मला खात्री आहे की फार काळ नाही. मी गेल्यावर 'संजीवनी हॉस्पिटल' कोण सांभाळणार?"
राजन अवाक् झाला. शब्दच फुटेना.
"राजन, तू माझ्या मुलीशी डॉक्टर संजीवनीशी लग्न कर. ती चांगली डॉक्टर आहे, पण एकटी हे सगळं सांभाळू शकणार नाही. मला खात्री आहे, माझ्या डोळ्यांसमोर तूच योग्य व्यक्ती आहेस."
राजनच्या डोक्यावर भावनिक ओझं कोसळलं. आईच्या डोळ्यांत अश्रू होते.
"बाळा, तुझ्या मामाने आपल्यासाठी खूप काही केलंय... त्यांची शेवटची इच्छा आहे..."
राजन गोंधळला. त्याला माहिती होतं, त्याचं हृदय फक्त रजनीसाठी धडधडत होतं. पण आईचे अश्रू, मामांचा त्याग, आणि कर्तव्याची जाणीव... त्याने डोळे मिटले. एक खोल श्वास घेतला आणि मान डोलावली.
केवळ पंधरा दिवसांत त्याचं संजीवनीशी लग्न लावून दिलं गेलं. मोठा सोहळा, मोठा आनंद... पण फक्त बाहेरून. आतून मात्र राजन तुटलेला होता.
संजीवनी खूप चांगली होती. तिने त्याच्यावर कधीही कोणतीही जबरदस्ती केली नाही. ती इतकी समजूतदार होती, तरीही राजनच्या मनात फक्त रजनी होती.
रजनी... जिच्यासोबत त्याने आयुष्य रंगवण्याची स्वप्नं पाहिली होती.
संजीवनीने सुरवातीला प्रयत्न केले की राजनने तिला स्वीकारावे, पण त्याचं मन नेहमी भूतकाळातच अडकलेलं होतं. त्या भूतकाळात, जिथे त्याचं खरं प्रेम होतं, पण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हतं...
संजीवनी एक स्वतंत्र विचारांची, धाडसी मुलगी होती. तिच्या मनात डॉक्टर होण्याची फारशी इच्छा नव्हती, पण तिच्या वडिलांचा जुना, प्रस्थापित दवाखाना होता आणि त्यांच्या आग्रहाखातर तिने वैद्यकीय शिक्षण घेतले.
डॉक्टर राजन तिच्या लहानपणापासूनचे मित्र होते. त्यांची ओळख होती, जिव्हाळा होता. जेव्हा वडिलांनी तिच्यासाठी राजनचा विवाह प्रस्ताव ठेवला, तेव्हा ती आधीच धडधडली. "मी अजून त्यांना पूर्ण ओळखत नाही... अशा घाईगडबडीत लग्न करणं मला शक्य नाही!" ती स्पष्टपणे म्हणाली.
पण परिस्थितीने वेगळाच पेच टाकला. वडिलांची तब्येत ढासळत चालली होती, आणि संजीवनीला एका वर्षाच्या डिप्लोमा अभ्यासासाठी परदेशी जायचं होतं. वडिलांनी स्पष्ट सांगितलं, "परदेशात जायचं असेल, तर लग्न करावंच लागेल!"
ती गोंधळली. हृदयात हजार प्रश्न घोंगावत होते, पण शेवटी वडिलांची इच्छेपुढे झुकून तिने होकार दिला. लग्न झालं... चारच दिवस तिने नव्या नात्याचा विचार केला तरी असेल का? पण वेळेने तिला थांबू दिलं नाही. अवघ्या काही दिवसांत तीने परदेशात जाण्यासाठी उड्डाण घेतले.
डॉ. राजन मात्र पुन्हा एकटे पडले. त्यांच्या खांद्यावर संजीवनी हॉस्पिटलचा भार होता, त्याला आणखी मोठं करण्याची जबाबदारी होती. दिवस जात होते, पण मन मात्र मागेच अडकून पडलं. रजनीची आठवण त्यांना सतावत राहिली. अखेर, तिला शोधायचा त्यांनी प्रयत्न केला.
पण जेव्हा समजलं की ती तिच्या आयुष्यात पुढे निघून गेली आहे, नव्या जीवनात स्थिरावली आहे, तेव्हा त्यांनी स्वतःला समजावलं—"ठीक आहे, ती पुढे गेली..."
पण त्यांचं मन? ते मात्र त्या जुन्या आठवणींच्या वर्तुळातच गुंतून राहिलं... पुढे जाण्याचा विचार त्यांनी केला तरी काय?
डॉ. राजन स्टडीतील खुर्चीत बसले, हातात एक जुना फोटो घेऊन. फोटोत संजीवनी आणि नन्ही निधी हसताना दिसत होत्या—ती क्षणचित्रं जणू कालच घडल्यासारखी ताजी होती. त्यांनी फोटो टेबलावर ठेवला आणि डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला. संजीवनी... तिच्या नावातच एक जीवन होतं, पण तिच्यासोबतचं त्यांचं आयुष्य मात्र नेहमीचअस्थिर—जणू वेळेच्या काट्याने त्यांना मागेच अडकवून ठेवलं होतं.
त्याने डायरी उघडली आणि एक ओळ लिहिली: "संजीवनी, मी तुला कधीच समजू शकलो नाही, पण निधीला मी तुझ्यासारखं मोकळं सोडणार नाही." पेन खाली ठेवताना त्याच्या मनात एक निश्चय दृढ झाला—निधीला तिच्या स्वप्नांसाठी लढायला शिकवायचं, पण त्याचबरोबर कर्तव्याची जाणीवही द्यायची. कदाचित, हेच त्याचं संजीवनीबद्दलचं अपराधीपण कमी करू शकेल...
राजनला संजीवनीबद्दल अपराधी वाटायचं का? जर हो, तर का? आणि जर नाही, तर त्याने तिच्याशी कधीच नातं जोडण्याचा प्रयत्न का केला नाही?
हे जाणून घेण्यासाठी वाचा पुढचा भाग
क्रमशः
Post a Comment
0 Comments