Type Here to Get Search Results !

दोन किनारे एक प्रवाह

 #दोन_किनारे_एक_प्रवाह 

डॉ. निधी आणि डॉ. सौरभ यांचे लग्न ठरले होते. त्यांच्या मित्रमंडळींनी ठरवले की ही संधी साधून त्यांच्यासाठी एक अविस्मरणीय बॅचलर पार्टी आयोजित करायची. मेडिकल प्रोफेशनमधील हे दोघे नेहमीच पेशंट, हॉस्पिटल आणि संशोधनाच्या चक्रात अडकलेले असायचे. त्यामुळे ही रात्र त्यांच्यासाठी वेगळी होती—जिथे जबाबदाऱ्यांचा विचार न करता ते मनमोकळं हसू शकतील, आनंद साजरा करू शकतील. सागराच्या लहरींच्या साक्षीने, एका सुरेख समुद्रकिनारी रिसॉर्टमध्ये ही पार्टी रंगणार होती.


रिसॉर्ट खास सजवले गेले होते—सौरभसाठी क्लासिक ब्लॅक आणि ब्लू थीम, तर निधीसाठी एलिगंट पिंक आणि गोल्डन टच. मंद झगमगणारे दिवे, किनाऱ्यावर लहरणारे कंदील आणि लाइव्ह म्युझिकने भरलेले वातावरण जादुई वाटत होते. वाऱ्याच्या झुळुकीसोबत हलणारे पडदे त्या संध्याकाळी सुरावटींसारखे भासत होते. सौरभ काळ्या ड्रेसमध्ये रॉयल दिसत होता, तर निधी पिंक गाऊनमध्ये चित्रपटातल्या नायिकेसारखी खुलून दिसत होती. ती समुद्रकिनाऱ्यावर पाऊल ठेवताच हलकंसं वारं तिच्या केसांना स्पर्श करून गेलं, आणि त्या क्षणी सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे खिळले.


दोघे एकमेकांकडे पाहून हसले. तेवढ्यात मागून कुणीतरी खोडकरपणे ओरडले, "अरे, ही बॅचलर पार्टी आहे की रोमान्सचा प्रोमो?" त्या वाक्याने सगळीकडे हास्याचा स्फोट झाला. मित्र-मैत्रिणींनी त्यांना घेरले—कुणी फुलांची उधळण केली, तर कुणी गाण्यांच्या तालावर नाचायला सुरुवात केली. कॉकटेल्स, धमाल गेम्स आणि समुद्राच्या लाटांवर झुलणारी संगीताची लय यामुळे वातावरण उत्साहाच्या शिखरावर पोहोचले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणि मनात आठवणी कोरण्याची तयारी होती.


पार्टीचा पहिला भाग धमाल गमतींनी भरलेला होता. सौरभच्या मित्रांनी त्याच्या हॉस्पिटलमधल्या लाजिरवाण्या गोष्टींचे व्हिडिओ एकत्र करून एक मजेशीर प्रेझेंटेशन तयार केले होते—पेशंटसमोर घाईत चुकीचा डायलॉग बोलणे, वॉर्डमध्ये डुलक्या काढणे—हे पाहून हॉल हास्याने गडगडला.


"सौरभ, तुला याची कल्पनाही नव्हती ना?" एक मित्र डोळा मारत म्हणाला. "अरे, हे कधी झाले?" सौरभ चकित होत विचारताच दुसरा मित्र हसत म्हणाला, "भाऊ, आम्ही सगळं रेकॉर्ड ठेवतो!"


निधीच्या मैत्रिणीही मागे राहिल्या नाहीत. त्यांनी तिच्या कॉलेजमधली गुपिते उघडली. "सांग ना, निधी, कॉलेजमध्ये तुझा सिक्रेट क्रश कोणावर होता?" एकीने खोचकपणे विचारले. "होता, पण त्याचे नाव ‘M.B.B.S’ होते!" निधी लाजत हसत म्हणाली. "अगं, असं नाही!" दुसरी मिश्कीलपणे म्हणाली, "आठवतंय का, एकदा सीनियर डॉक्टरसमोर तू चुकून त्याला 'डॅड' म्हटले होतेस?" सगळे खळखळून हसले, आणि निधीने कपाळावर हात मारत स्वतःच हसायला सुरुवात केली.


खरी मजा तेव्हा आली जेव्हा ‘डॉक्टर चॅलेंज’ सुरू झाले— “तुम्ही एकमेकांबद्दल किती जाणता?” पहिला प्रश्न होता, "सौरभ, निधीचा आवडता फूड आयटम?" "ऑब्व्हियसली, पाणीपुरी!" सौरभ क्षणाचाही विलंब न करता म्हणाला. "करेक्ट!" निधीने टाळी वाजवत चिअर केले. मग निधीला विचारले, "सौरभची लाडकी हॉस्पिटल मशीन?" "ऑफकोर्स, Echo machine!" ती म्हणाली. "मी तुला कधी सांगितले होते?" सौरभने कौतुकाने विचारले. "सांगायची गरज नव्हती," ती मिश्कील हसत म्हणाली. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.


पार्टीचा उत्साह आता शिगेला पोहोचला होता. "चला, आणखी एक गेम खेळूया!" सौरभचा जवळचा मित्र रोहन उत्साहात ओरडला. "हा गेम आहे 'डॉक्टर डायग्नोसिस ट्विस्ट'!" मित्रमंडळींनी टाळ्या वाजवत आनंदाने साथ दिली.


नियम स्पष्ट करण्यात आले—प्रत्येक जोडीला एक कार्ड मिळणार होते, ज्यावर काही "लक्षणे" लिहिलेली असतील. त्या लक्षणांवरून त्यांना निदान करायचे होते, आणि शेवटी त्यामागचा खरा किस्सा उलगडणार होता.


पहिली जोडी होती रोहन आणि निधीची मैत्रीण, प्रिया. त्यांना मिळालेल्या कार्डावर लिहिले होते:


"लक्षणे—हृदयाचे ठोके वाढणे, चेहरा लाल होणे, आणि बोलताना अडखळणे."


रोहनने गंभीर चेहरा करत लगेच निष्कर्ष काढला, "हा नक्कीच हार्ट अटॅकचा केस आहे!"


प्रियाने डोकं खाजवत विचार केला आणि म्हणाली, "नाही, ही तर एखादी अॅलर्जी असावी!"


सगळे हसले, आणि मग खुलासा झाला—हा होता सौरभचा तो प्रसंग, जेव्हा तो हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये पहिल्यांदा निधीला भेटला होता आणि तिच्यासमोर कॉफी सांडली होती!


सौरभने लाजून हसत डोकं खाली झुकवले, तर निधीने त्याला चिडवत म्हणाली, "अरे, तेव्हा तू म्हणाला होतास, 'मी ठीक आहे,' पण तुझा चेहरा सांगत होता की तू पळायला तयार होतास!"


दुसरी जोडी होती विशाल आणि अजय. त्यांना मिळालेलं कार्ड होतं:


"लक्षणं—अचानक गप्प बसणं, हात थरथरणे, आणि डोळे तिरके होणं."


अजयने विचार करत म्हटलं, "हा तर एखाद्या स्ट्रोकसारखा वाटतो!"


विशालने मिश्कील हसत डोळे मिचकावले, "नाही रे, ही तर निधीची स्टोरी आहे—जेव्हा विमानामध्ये पेशंटला अचानक हार्ट अटॅक आला होता."


निधीने चेहरा हाताने झाकला आणि हसत म्हणाली, "विशाल, तुला हे कसं काय माहीत? सौरभने सांगितलं? मी तर तेव्हा अक्षरशः घाबरले होते!"


गेम पुढे सरकत गेला, आणि प्रत्येक डायग्नोसिसमागे एक मजेदार आठवण उलगडत गेली. सौरभ आणि निधीच्या आयुष्यातील गमतीजमतींनी सगळ्यांना खळखळून हसायला भाग पाडलं.


शेवटी, रोहनने हसत हसत मिश्कील टिप्पणी केली, "हा गेम खेळून एकच समजलं—तुम्हा दोघांचं लग्न हे खरंतर एकमेकांचं बेस्ट डायग्नोसिस आहे!"


सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला, आणि वातावरण पुन्हा एकदा आनंदाने भरून गेलं.


पार्टीचा शेवटचा टप्पा होता—सरप्राईज डान्स. "रोमँटिक कपल डान्स!" एका मैत्रिणीने उत्साहात घोषणा केली. "मला डान्स फारसा येत नाही," सौरभ संकोचत म्हणाला. "काही नाही! तू आता डॉक्टर नाहीस, फक्त निधीचा होणारा नवरा आहेस!" मित्राने टोमणा मारला.


निधीने त्याचा हात हलकेच धरला आणि फ्लोअरवर ओढलं. "सौरभ, हा क्षण जरा जगूया!" एड शीरनच्या Perfect गाण्यावर दोघांनी नृत्य सुरू केलं.


आय फाउंड अ लव्ह फॉर मी

डार्लिंग, जस्ट डायव्ह राइट इन अँड फॉलो माय लीड

वेल, आय फाउंड अ गर्ल, ब्युटीफुल अँड स्वीट

ओह, आय नेव्हर न्यू यू वेअर द समवन वेटिंग फॉर मी!


सौरभ आधी अडखळला, पण निधी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवताच तो त्या लयीमध्ये हरवला. समुद्राच्या लाटा त्यांच्या तालावर नाचत होत्या. गाणं संपताच टाळ्या आणि शिट्ट्यांनी वातावरण भरून गेलं. "हा डान्स पाहून तुम्हाला बॅचलर म्हणायचं की कपल?" कुणीतरी हसत विचारलं, आणि सगळ्यांचा हशा फुटला.


संध्याकाळी मित्रमंडळींनी फोटो स्लाइडशोचं सरप्राईज दिलं. लाइट्स मंद झाल्या, आणि प्रोजेक्टरवर निधी-सौरभच्या आठवणी उलगडू लागल्या—लहानपणापासून  आजपर्यंतचे गोड क्षण. निधी हलकंसं हसली, तिच्या डोळ्यांत भावनिक चमक होती. "हे सगळं किती सुंदर आहे!" ती कुजबुजली. निधीने त्याचा  हात हातात घेतला, त्याच्या स्पर्शात एक अनोखी ऊब होती.


पण स्लाइडशो पुढे सरकताच काहीतरी वेगळं दिसलं—सौरभसोबत एक अनोळखी मुलगी, मानसी. काही फोटोंमध्ये ती त्याच्या अगदी जवळ होती, त्यांचे हावभाव मैत्रीपलीकडचे वाटत होते—एकमेकांकडे पाहण्यातली ती ओढ, त्यांचे हातात हात गुंफलेले. "ही मुलगी कोण?" निधीच्या मनात विचारांचं वादळ उठलं. तिच्या ओठांवर प्रश्न आले, पण शब्द बाहेर पडले नाहीत.


तिने सौरभकडे पहिलं. त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थ भाव दिसत होते. इतका वेळ हसत खेळत असणारा सौरभ अचानक जसा गायबच झाला होता. कुठेतरी भूतकाळात हरवल्यासारखा वाटत होता.


तिला तिचा एमबीबीएसचा मित्र विशाल दिसला. "विशाल, जरा इकडे येशील?" तिने हळूच बोलावलं. 

"हो, काय झालं?" तो जवळ आला. 

"ती मुलगी... सौरभसोबत बऱ्याच फोटोंमध्ये आहे... कोण आहे ती?" तिने विचारलं.

विशाल काही क्षण गप्प राहिला, जणू योग्य शब्द शोधत होता. "अगं, तुला काहीच माहिती नाही का? मला वाटलं सौरभने तुला सांगितलं असेल..." तो सावधपणे म्हणाला. निधीचं हृदय जोरात धडधडलं. 


"विशाल, प्लीज सांग... कोण आहे ती?" तिने आर्जव केलं. विशालने खोल श्वास घेतला आणि हळूच म्हणाला, "ती मानसी... सौरभची..."


तो पुढे बोलणार तेवढ्यात सौरभ तिथे आला. "काय बोलताय तुम्ही?" त्याने सहज विचारलं, पण त्याच्या चेहऱ्यावर वेदनादायक भाव उमटले होते. संभाषण अर्धवट राहिलं. निधीने त्याच्या डोळ्यांत पाहिलं—तिथे एक वेगळीच भावना होती, जणू भूतकाळ त्याच्या मनावर ताबा मिळवत होता.


पार्टी संपली. मित्रमंडळींसाठी ही एक अविस्मरणीय रात्र होती—हास्य, नृत्य आणि आनंदाने भरलेली. पण निधीच्या मनात विचारांचं वादळ थांबलं नव्हतं. ही बॅचलर पार्टी तिच्यासाठी फक्त सेलिब्रेशन नव्हती—ती एका खोल प्रश्नाचा जन्म ठरली होती. ही मानसी कोण होती? सौरभच्या आयुष्यात तिचं स्थान काय होतं? त्या रात्री ताऱ्यांनी नव्या नात्याचं साक्षीदार व्हावं म्हणून आकाश झगमगत होतं, पण निधीच्या मनात एक अंधार पसरत होता. ती सौरभकडे पाहत राहिली, आणि तिच्या मनात एकच प्रश्न घुमत होता—जे काही लपलंय, ते उद्या उघड होणार का?


क्रमशः.

Post a Comment

0 Comments