#दोन_किनारे_एक_प्रवाह
संजीवनीने राजनपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला त्या रात्री तिच्या मनात अनेक विचार घुमत होते. पण सकाळी निधीचं राजनसोबत खेळणं बघून तिचं मन बदललं. "निधीला आई आणि बाबा दोघांचं प्रेम मिळायला हवं," ती स्वतःशीच म्हणाली. तिने राजनला बोलावलं आणि एक प्रस्ताव ठेवला, "आपण निधीसाठी एकाच घरात राहू, पण आपलं नातं संपलेलं आहे हे तुला मान्य करावं लागेल." राजनला निधीचं प्रेम आणि तिच्यासोबत राहण्याची संधी यापेक्षा जास्त काही नको होतं. त्याने मान डोलावली, आणि दोघांनी एकाच घरात राहण्याचा निर्णय घेतला—नवरा-बायको म्हणून नाही, तर निधीचे पालक म्हणून.
राजनने स्वतःला बदलायचा खूप प्रयत्न केला. तो आता हॉस्पिटलमधून लवकर घरी यायचा, निधीला शाळेत सोडायचा, तिच्यासोबत खेळायचा. त्याच्या आयुष्याचा केंद्रबिंदू आता निधी झाली होती. त्याने रजनीच्या आठवणी मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला, डायरी त्याने कपाटाच्या अगदी वरच्या कप्प्यात ठेवली आणि संजीवनीला पुन्हा जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला. "संजीवनी, मी बदललोय. मला अजून एक संधी देऊ शकतेस का?" तो एकदा म्हणाला. पण संजीवनीच्या मनात रजनीचं सत्य आणि तुटलेली वचनं अजूनही ताजी होती. "राजन, तुझं निधीवरचं प्रेम मी पाहते, आणि त्यासाठीच मी इथे आहे. पण माझा तुझ्यावर विश्वास उरला नाही," ती थंडपणे म्हणाली. तिच्या मनात माफी नव्हती, फक्त निधीसाठी एक जबाबदारी होती.
राजन निधीवर खूप प्रेम करायचा. तिच्या प्रत्येक गोष्टीत त्याचा सहभाग असायचा—तिला गोष्टी सांगणं, तिच्यासोबत चित्र काढणं, तिच्या शाळेच्या कार्यक्रमांना हजेरी लावणं. निधीही "बाबा" म्हणत त्याच्या मागे धावायची. त्याचं निधीवरचं प्रेम पाहून संजीवनीला कधी कधी वाटायचं की तिने त्याला माफ करावं, पण रजनीच्या आठवणी आणि त्याच्या भूतकाळातील चुका तिच्या मनातून जायच्या नाहीत.
संजीवनी आता डॉक्टर म्हणून काम करत नव्हती. तिच्या वडिलांनी सोडलेली प्रचंड संपत्ती—घरं, जमिनी, बँकेतले पैसे—यामुळे तिला पैशाची कधीच चिंता नव्हती. तिने स्वतःचा आनंद शोधायला सुरुवात केली. मित्रमंडळींसोबत पार्ट्या, पिकनिक, ट्रिप्स—हा तिचा नवा दिनक्रम झाला. ती स्वतःला व्यस्त ठेवायची, जणू त्या व्यस्ततेत ती भूतकाळ विसरू शकणार होती. पण या सगळ्यात तिचं निधीवरचं लक्ष कमी होऊ लागलं. निधीची काळजी आता मुख्यतः राजन घ्यायचा. तोच तिला शाळेतून आणायचा, तिचं होमवर्क करायला मदत करायचा, तिच्यासोबत वेळ घालवायचा. संजीवनी कधी कधी निधीला भेटायची, पण तिचं लक्ष आता तिच्या नव्या आयुष्याकडे जास्त होतं.
संजीवनी आणि राजन यांच्यात आता नेहमीच भांडणं व्हायची. "संजीवनी, तू निधीवर लक्ष देत नाहीस. ती तुझीही मुलगी आहे," राजन एकदा चिडून म्हणाला.
"मी तिला सगळं देते, राजन. तिची काळजी तू घेतोयस, मग माझ्यावर का ओरडतोस?" ती प्रत्युत्तर द्यायची.
"काळजी म्हणजे फक्त पैसे देणं नाही, संजीवनी. तिला तुझ्या वेळेचीही गरज आहे," तो म्हणायचा. पण संजीवनीला त्याचं बोलणं ऐकायचंच नसायचं. तिच्या आयुष्यात आता स्वातंत्र्य आणि आनंद महत्त्वाचा होता, आणि ती त्यासाठी कोणत्याही बंधनाला तयार नव्हती.
काही वर्षांनी संजीवनीच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती आली—अमित. तो तिच्या मित्रमंडळीतला एक जिव्हाळ्याचा मित्र होता, जो हळूहळू तिच्या जवळ आला. तो एक यशस्वी उद्योजक होता, मजेदार स्वभावाचा आणि संजीवनीच्या स्वातंत्र्याचा आदर करणारा. त्यांच्या भेटी वाढल्या, आणि दोघं एकमेकांवर प्रेम करू लागले. संजीवनीला अमितसोबत एक नवीन आनंद मिळाला, ज्याचा आनंद तिला राजनबरोबर कधीच अनुभवता आला नव्हता.. निधी तेव्हा दहा वर्षांची झाली होती, आणि संजीवनीला वाटलं की तिच्या नव्या आयुष्याचा निधीच्या मनावर परिणाम होऊ नये. तिने निधीला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. "निधी, तिथे तुला नवीन मित्र मिळतील, आणि तू स्वतंत्र होशील," ती म्हणाली. पण निधीच्या डोळ्यांत तिच्यासाठी आणि राजनसाठी एक अनामिक ओढ होती.
निधी बोर्डिंगला गेली, आणि संजीवनी अमितसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायला निघून गेली. तिने राजनला सांगितलं, "मी माझं आयुष्य जगणार आहे. निधी तुझ्यावर विश्वास ठेवते, आणि तू तिची काळजी घेऊ शकतोस." राजनला हे ऐकून धक्का बसला, पण तो निधीला गमावू शकत नव्हता. "ठीक आहे, पण निधी माझ्यासोबतच राहील जेव्हा ती सुट्टीवर येईल," तो म्हणाला. संजीवनीने मान डोलावली आणि आपलं नवं आयुष्य सुरू केलं. तिच्या वडिलांची संपत्ती तिला सगळं काही पुरवत होती—पैशाची चिंता नव्हती, फक्त स्वतःचा आनंद शोधण्याची धडपड होती.
निधी बारावीत पोहोचली तेव्हा संजीवनीने राजनपासून रीतसर घटस्फोट घेतला. ती आता अमितसोबत लग्न करून पूर्णपणे स्थायिक झाली होती. निधीला तिच्या वडिलांबद्दल—राजनबद्दल—खूप प्रेम होतं. सुट्ट्यांमध्ये ती त्याच्याकडे यायची, आणि राजन तिच्यासाठी सगळं करायचा. त्याला निधीशिवाय आयुष्य अशक्य वाटायचं. रजनीचं प्रेम त्याच्या आयुष्यात एक भूतकाळ होता, पण निधी त्याचं वर्तमान आणि भविष्य होती. निधीला तिच्या आईच्या नव्या आयुष्याची जाणीव होती, पण ती राजनच्या प्रेमाला जास्त जवळची मानायची.
एकदा निधीने राजनला विचारलं, "बाबा, तू माझ्यावर किती प्रेम करतोस?" राजनने तिला जवळ घेतलं आणि म्हणाला, " तू माझं सगळं आहेस, निधी. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे." त्याच्या डोळ्यांत अश्रू होते, आणि निधीने त्याला मिठी मारली.
संजीवनी आता अमितसोबत सुखी होती, पण तिच्या आयुष्यात निधीचं स्थान कमी झालं होतं. ती निधीला भेटायची, आई म्हणून प्रेमही होतं, पण तिचं लक्ष आता तिच्या नव्या जोडीदारावर आणि स्वतःच्या आनंदावर होतं. तिला माहिती होतं राजन तिला जपतो त्यामुळे तिला तिची काळजी नव्हती.राजन मात्र निधीला आपलं सर्वस्व मानायचा. त्याने स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला होता, पण संजीवनीचा अविश्वास आणि तिचं नवं आयुष्य यामुळे त्यांच्यातलं अंतर कायमचं झालं.
एका घरातून सुरू झालेलं त्यांचं नातं आता पूर्णपणे विखुरलं होतं. संजीवनी आपल्या स्वातंत्र्यात आनंदी होती, आणि राजन निधीच्या प्रेमात समाधानी होता. पण त्यांच्या मधला एकेकाळचा धागा—प्रेमाचा—कायमचा तुटला होता.
______
तेवढ्यात निधी हळूच दार ढकलून स्टडीत आली. "बाबा?" तिचा सौम्य आवाज त्याच्या कानात पडला. राजन भानावर आला—तो आता वर्तमानात होता. त्याने पटापट डायरी आणि पत्रं निधीच्या नजरेत न पडू देता एका फाईलमध्ये ठेवली आणि कपाटाच्या वरच्या कप्प्यात लपवली. हृदयाचा ठोका चुकल्यासारखा वाटला तरी त्याने चेहऱ्यावर किंचित हसू आणत स्वतःला सावरलं.
"हो, निधी, काय झालं?" तो हसत म्हणाला, जणू काहीच घडलेलं नव्हतं.
निधी त्याच्याजवळ आली, तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. तिच्या डोळ्यांत चमक होती, जणू लहानपणी जसा तिला एखादा मोठा आनंद मिळायचा, तशीच निरागसता तिच्या चेहऱ्यावर उमटली होती.
"बाबा, मला तुला सांगायचं होतं—उद्या माझी बॅचलर पार्टी आहे!" ती उत्साहाने बोलली, हात हलवत. "सौरभ आणि माझं लग्न ठरलंय, आणि मी खूप खुश आहे!"
क्षणभर राजन सुन्न झाला. निधी मोठी झाली, हे माहीत होतं, पण ती इतकी मोठी झाली की आता तिच्या आयुष्यात कोणी दुसरं प्रेम आलंय, हे त्याला पचवायला कठीण जात होतं. पण तिच्या आनंदासाठी त्याने चेहऱ्यावर हसू आणलं.
तो हळूच पुढे सरसावला आणि तिला जवळ घेतलं. "जा, मजा कर," तो मृदू आवाजात म्हणाला. त्याच्या डोळ्यांत प्रेम आणि अभिमान होता, पण कुठेतरी आत खोलवर एक हुरहूरही होती.
निधी हसत बाहेर गेली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून राजन सुखावला, पण त्याच्या मनात मात्र विचारांचे काहूर उठले. त्याने कपाटाकडे कटाक्ष टाकला. तिथे बंद केलेली ती फाईल, जणू त्याच्या जुन्या आठवणींचं एक दार होतं, ज्यामध्ये काही सुखद, काही वेदनादायी गोष्टी बंदिस्त होत्या.
निधीच्या मागे पाहत त्याच्या मनात एकच विचार गूंजत राहिला—"तिचं सुख हेच माझं सर्वस्व आहे, पण काही सत्यं अशी असतात, जी कधीच उघड करता येत नाहीत..."
सौरभ आणि निधीचे नाते कोणते वळण घेते हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की वाचा
क्रमशः
Post a Comment
0 Comments