Type Here to Get Search Results !

दोन किनारे एक प्रवाह

 #दोन_किनारे_एक_प्रवाह (भाग - ८०)

तीन महिन्यांनंतर संजीवनी परत आली होती. ती दूर गेली होती, स्वतःला सावरायला, स्वतःच्या भावनांना समजून घ्यायला आणि राजनला त्याच्या मनाचा ठाव घ्यायला वेळ द्यायला. तिला आशा होती की हे अंतर त्यांच्यातील नातं पुन्हा जोडेल, पण तिच्या अपेक्षा आज धुळीला मिळाल्या होत्या. आज तिच्या हातात एक सत्य लागलं होतं, ज्याने तिच्या हृदयाला छेद दिला होता.


संजीवनी घरी आली. स्वतःजवळील किल्ल्याने दार उघडून आत शिरली. डॉक्टर राजन हॉस्पिटलला गेले होते. तिने सामान बेडरूममध्ये ठेवलं आणि स्टडीमध्ये आली. ती काही कागदपत्रं शोधत होती, पण तिच्या नजरेस एक डायरी पडली. ती डायरी तिला आधीही दिसली होती, पण तिने कधी त्याकडे लक्ष दिलं नव्हतं. आज मात्र तिच्या मनात एक कुतूहल जागलं. तिने ती हातात घेतली आणि उघडली. पहिलंच पान पाहताच तिचा श्वास अडखळला. डायरीत शेकडो पत्रं लिहिली होती, आणि प्रत्येक पत्राच्या सुरुवातीला एकच नाव होतं—रजनी.


"प्रिय रजनी,"  

"आज पुन्हा तुझी खूप आठवण येते.."  

"संजीवनी परत गेली आहे, पण माझं मन अजूनही तुझ्याच आठवणीत गुंतून आहे…"  


संजीवनीच्या हातातली डायरी थरथरू लागली. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिला आठवलं—त्या रात्री, जेव्हा राजनच्या तोंडून रजनीचं नाव निघालं होतं. तेव्हा तिला वाटलं होतं की कदाचित ही एक चूक असेल, एक जुनी आठवण असेल. पण आता तिला सत्य समजलं होतं. रजनी कोणीतरी अनोळखी व्यक्ती नव्हती, ती राजनची प्रेमिका होती—त्याचं पहिलं प्रेम, ज्याला तो कधीच विसरू शकला नव्हता.


"याचा अर्थ हा की हे तीन महिनेही राजन माझ्यासाठी नाही, तर तिच्यासाठीच जगले?" तिच्या मनात हा प्रश्न घुमला आणि तिच्या हृदयात एक दाहक वेदना जाणवली. तिने डायरी पानापान वाचायला सुरुवात केली. प्रत्येक शब्द तिच्या आत्मविश्वासाला सुरुंग लावत होता. "तू दूर गेली, पण तुझी आठवण मला सोडत नाही," "संजीवनी माझ्यासोबत आहे, पण माझं मन तुझ्याकडेच आहे," अशी वाक्यं तिच्या डोळ्यांसमोर नाचू लागली. तिच्या हातून डायरी निसटायची बाकी होती.


तेवढ्यात स्टडीचा दरवाजा उघडला. राजन आत आला आणि समोरचं दृश्य पाहून तो थिजल्यासारखा उभा राहिला. संजीवनीच्या हातात ती डायरी होती, तिच्या गालांवर अश्रूंच्या ओल्या रेघा स्पष्ट दिसत होत्या. त्याच्या चेहऱ्यावर अपराधी भाव उमटले.


"संजीवनी…" त्याच्या ओठांवर तिचं नाव उमटलं, पण त्याचा आवाज कमकुवत होता.


संजीवनीने डायरी जोरात जमिनीवर आपटली. तिच्या डोळ्यांत आता वेदना आणि राग यांचं तुफान उठलं होतं. "हे काय आहे, राजन?" तिचा आवाज थरथरत होता, पण त्यात एक ठामपणा होता. "मला वाटलं होतं की आपण नव्याने सुरुवात करणार आहोत… पण तुझं मन अजूनही तिच्याकडेच आहे? रजनी—ती तुझी प्रेमिका होती, बरोबर? आणि तू मला कधीच सांगितलं नाहीस!"


राजनने डोळे झाकले. त्याला काहीच बोलता येत नव्हतं. त्याच्या मौनाने संजीवनीच्या संशयाला पुष्टीच मिळाली.


"मी तुला तीन महिने दिले होते, राजन!" ती ओरडली. "मी स्वतःला सावरलं, तुझी वाट पाहिली, की कदाचित या वेगळे राहाल्याने तुला माझी किंमत कळेल… पण तू काय केलंस? रोज तिला पत्रं लिहिलीस? तुझ्या आयुष्यात मी फक्त एक सावली आहे का? तुझ्या मनात रजनी आहे, आणि मी फक्त तिची जागा भरायला  एक पर्याय आहे का?" तिच्या प्रत्येक शब्दात तिचं दुखलेलं मन व्यक्त होत होतं.


"संजीवनी, मी…" राजन बोलायचा प्रयत्न करत होता, पण त्याला शब्द सापडत नव्हते.


"राजन, मला फक्त एकच उत्तर दे—तू अजूनही रजनीला विसरू शकला नाहीस, बरोबर?" तिने थेट प्रश्न टाकला, आणि तिच्या नजरेत एक आर्जव होतं.


राजनने मान खाली घातली. त्याचं मौनच तिच्यासाठी उत्तर होतं. संजीवनीच्या अंगातलं त्राणच गेलं. तिला भोवळ यायला लागली, आणि तिच्या दृष्टीसमोर काळोख पसरू लागला.


"संजीवनी!" राजन धावत तिच्याजवळ गेला, पण ती त्याच्या हातातच कोसळली.


"संजीवनी, डोळे उघड! तुला काय झालं?" राजनने तिला उचललं आणि बेडरूममध्ये नेलं. त्याने घाईघाईने पाण्याचा ग्लास आणला आणि तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं. हळूहळू ती शुद्धीवर आली. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण ती शांतपणे त्याच्याकडे पाहत होती.


"संजीवनी, तू ठीक आहेस?" त्याने काळजीने विचारलं.


तिने हलकंसं हसण्याचा प्रयत्न केला, पण त्या हास्यात दुःख ओसंडत होतं. "राजन… मी प्रेग्नेंट आहे."


राजनच्या हातून पेला निसटला आणि तो जमिनीवर पडून फुटला. त्याचा मेंदू काही क्षण शून्यात गेला. "काय? तू… तू गरोदर आहेस?" त्याच्या स्वरात आश्चर्य आणि गोंधळ मिसळला होता.


"हो," ती म्हणाली. "आणि मी आजच डॉक्टरकडे जाऊन कन्फर्म केलं. मला पहिल्यांदा जेव्हा चक्कर आली, तेव्हा मी दुर्लक्ष केलं… पण आता समजलं." तिचा आवाज थरथरला. "मी ही बातमी तुला आनंदाने सांगायला आले होते… पण तुझ्या डायरीने मला सांगितलं की तुझ्या आयुष्यात माझी जागा कधीच नव्हती. तुझ्या मनात फक्त रजनी आहे—ती तुझी प्रेमिका, जिच्याशिवाय तू जगू शकत नाहीस."


राजन अजूनही स्तब्धच होता. त्याच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला. "माझ्या मनात अजूनही रजनी आहे… पण माझ्या आयुष्यात संजीवनीदेखील आहे… आणि आता ती फक्त माझी बायको नाही, तर माझ्या मूलाची आई होणार आहे," तो स्वतःशीच पुटपुटला.


संजीवनी उठून उभी राहिली. तिच्या डोळ्यांत आता वेदना होती, पण त्याबरोबरच एक ठाम निर्णयही दिसत होता. "राजन, आता एक गोष्ट स्पष्ट आहे… आपण दोघं एकाच घरात राहू शकतो, पण नवरा-बायको म्हणून नाही. मी तुझ्यासोबत राहीन, पण फक्त या बाळासाठी—माझ्या बाळासाठी. तुझ्या प्रेमाची अपेक्षा मला आता नाही ".

ती पुढे सरसावली.  "मी तुला काहीच मागत नाही, राजन. फक्त इतकंच—माझ्या बाबांना त्यांच्या अखेरच्या क्षणी असं वाटू नये की त्यांच्या निर्णयामुळे मी दुःखी आहे. आपण त्यांच्यासमोर नवरा-बायकोसारखं वागू, पण त्याच्या पुढे काहीच नाही."


संजीवनीच्या डोळ्यांतून आता वेदना ओसंडून वाहत होती. तिचा संपूर्ण देह थरथरत होता, आणि हृदयात साठवून ठेवलेल्या असह्य वेदना आता शब्दांमधून बाहेर पडत होत्या. ती राजनाकडे रोखून पाहत म्हणाली,


"माझ्या बाबांनी किती विश्वासाने त्यांच्या लाडक्या मुलीला तुझ्या हातात सोपवलं होतं, राजन! त्यांना वाटलं होतं, तू माझं संपूर्ण आयुष्य आनंदानं भरून टाकशील… पण तू काय केलंस?"


तिचा आवाज हलका कंप पावत होता, तरीही त्यातील तिखट कडवटपणा स्पष्ट जाणवत होता. तिने एक पाऊल पुढे टाकत त्याच्याकडे कटाक्ष टाकला.


"तू त्यांच्या विश्वासाचा सौदा केलास, राजन… विश्वासघात केलास! तुला कधी कळलंच नाही की प्रेम हे उपकाराचं ओझं नसतं. तू फक्त ते ओझं उतरवण्यासाठी माझ्याशी लग्न केलंस. पण त्यात तू काय केलंस माहीत आहे का? तू तीन आयुष्य उद्ध्वस्त केलीस…!"


ती क्षणभर थांबली, खोल श्वास घेतला, आणि अचानक तिच्या ओठांवर एक कटू, उपहासमिश्रित हसू उमटलं. डोळ्यांतून वाहणारे अश्रू तिने पुसायचा प्रयत्नही केला नाही.


"सॉरी… तीन नाही."


ती आता अगदी खोलीच्या कोपऱ्यातून साचलेलं दु:ख बाहेर काढत होती. तिचा स्वर आणखी धारदार झाला.


"ती रजनी… तीही सुखी झाली, नाही का? तिने तिच्या आयुष्याचा निर्णय घेतला, लग्न केलं आणि संसारही थाटला… आणि तू?"


ती पुन्हा थोडी पुढे सरसावली, त्याच्या डोळ्यांत डोळे रोखत.


"तू मात्र तिथेच अडकून राहिलास! इतकं प्रेम होतं ना तुझं तिच्यावर? मग निभावायची धम्मकही असावी लागते माणसात! पण नाही… तुझ्यात ती हिंमतच नव्हती, राजन!"


संजीवनीच्या शब्दांनी खोलीत एक विचित्र शांतता पसरली. ती फक्त बोलत नव्हती, तिच्या मनात साठलेल्या वेदना आणि तिरस्काराचा तो एक स्फोट होता. राजन काही बोलण्यासाठी ओठ उघडत होता, पण त्याचं प्रत्येक शब्द मनातच गोठून जात होतं.


संजीवनीच्या नजरेतून आता प्रेमाचा मागमूसही गायब झाला होता… तिथे उरला होता फक्त भयंकर तिरस्कार आणि तुटलेल्या विश्वासाचा राखेतला निखारा.


"संजीवनी, असं म्हणू नकोस… मला थोडा वेळ देशील?" त्याने विनवणी केली.


"वेळ?" ती कडवट हसली. "तीच वेळ मी तुला तीन महिन्यांपूर्वी दिली होती, राजन. तेव्हा तू रजनीच्या आठवणींमध्ये हरवला होतास. आता मला फक्त माझ्या बाळाची काळजी आहे. तुझ्या प्रेमावर माझा विश्वास उरला नाही." तिच्या स्वरात एक अंतिमता होती.


त्या दिवसानंतर संजीवनी आणि राजन एकाच घरात राहू लागले, पण त्यांच्यातील नातं आता फक्त एक औपचारिकता बनून राहिलं होतं. संजीवनी दिवसेंदिवस गप्प राहू लागली. ती फक्त आपल्या बाळासाठी जगत होती. तिच्या चेहऱ्यावर आता हास्य दिसत नव्हतं, फक्त एक शांतता होती—जणू तिने स्वतःला या परिस्थितीशी जुळवून घेतलं होतं.


राजन मात्र स्वतःच्या मनाशी झगडत होता. त्याला जाणवत होतं की रजनी ही त्याच्या आयुष्याची एक भूतकाळातली पानं होती, पण त्या पानांना तो कधीच फाडू शकला नव्हता. आणि आता संजीवनीला गमावण्याची भीती त्याला सतावत होती. तो रात्री जागून विचार करायचा, "संजीवनीचं मन पुन्हा जिंकता येईल का? की मी तिच्यासाठी कायमच अपूर्ण राहीन?"


एका घरात असूनही त्यांच्यात एक अदृश्य भिंत उभी राहिली होती. संजीवनीने तिचं मन बंद केलं होतं, आणि राजनला आता ती भिंत तोडण्याचा मार्ग सापडत नव्हता.


राजनला मार्ग सापडेल का? परत एकत्र येतात का? हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की वाचा 


क्रमशः 

---

Post a Comment

0 Comments