#दोन_किनारे_एक_प्रवाह ( भाग - ७९)
एके संध्याकाळी संजीवनी आणि राजन दोघंही बागेत फिरायला निघाले. मावळत्या सूर्याच्या प्रकाशात चंद्राची कोमल किरणं पसरली होती. थंड वाऱ्याच्या झुळकीने संजीवनी हलकीशी शहारली. तिच्या चेहऱ्यावर थकवा असला तरी डोळ्यांत वेगळीच चमक होती.
"थंडी वाजतेय का?" राजनने तिच्याकडे पाहत प्रेमाने विचारलं. त्याचा आवाज नेहमीप्रमाणे मऊ आणि आधार देणारा होता.
संजीवनी हसली, तिच्या ओठांवर एक नाजूक हसू उमटलं. "थोडीशी... पण तू आहेस ना माझ्यासोबत, त्यामुळे उब मिळतेय." तिच्या बोलण्यात एक आपुलकी होती, जी त्यांच्या नात्यात नव्याने फुलत होती.
राजनने तिच्या हातात आपला हात गुंफला आणि तिला हलकेच जवळ घेतलं. त्याच्या स्पर्शातून एक उष्णता तिच्या हातातून तिच्या मनापर्यंत पोहोचली. "तुला माहिती आहे, संजीवनी, तुझ्या परत येण्याने माझं आयुष्य एका वेगळ्या दिशेला चाललंय .आपण एकमेकांना खरंच नव्याने ओळखायला शिकलोय," तो म्हणाला.
त्याच्या स्वरात एक खोलवरची भावना दडली होती, जणू तो स्वतःलाच समजावत होता की आता त्याच्या आयुष्यात फक्त संजीवनीच आहे.
संजीवनीने हलकंसं हसत त्याच्याकडे पाहिलं. "म्हणूनच आता एकमेकांमध्ये अंतर राहता कामा नये..." तिच्या बोलण्यात एक आर्जव होतं, एक अपेक्षा होती की त्यांचं हे नातं आता कोणत्याही भूतकाळाच्या सावलीपासून मुक्त असावं. तिने त्याच्या डोळ्यांत पाहिलं, आणि त्या क्षणी तिला वाटलं की हे प्रेम खरं आहे, पूर्ण आहे.
हलक्या थंड वाऱ्यामुळे बागेतलं वातावरण अधिकच गूढ आणि आकर्षक झालं होतं. झाडांच्या पानांतून येणारा सळसळण्याचा आवाज आणि दूर कुठेतरी कोकिळेचं मंजूळ स्वर यामुळे त्या संध्याकाळला एक वेगळीच जादू प्राप्त झाली होती.
संजीवनीच्या स्वरातला गोडवा, तिच्या डोळ्यांतील नशा आणि त्या थंड हवेचा स्पर्श यामुळे राजनच्या मनातही एक वेगळीच भावना जागी झाली. त्याने हळूच तिच्या कमलासारख्या मऊ गालांना स्पर्श केला. त्या स्पर्शाने संजीवनीच्या हृदयाची लय वेगाने वाढू लागली. तिच्या मनात रोमांच उठले—प्रेमाचे, विश्वासाचे आणि त्यांच्या एकत्र येण्याच्या नव्या सुरुवातीचे.
ती हळूच त्याच्या छातीवर डोकं टेकवत म्हणाली, "राजन, आयुष्यभर मला असंच तुझ्या मिठीत राहायचं आहे." तिचा आवाज भावनेने भरला होता, जणू ती त्याला सांगत होती की आता तिच्यासाठी फक्त तोच आहे, आणि त्याच्यासाठीही तीच असावी.
राजनने तिच्या लांबसडक केसांमध्ये हात फिरवत तिला अधिक जवळ ओढलं. तिच्या उष्ण श्वासांची झुळूक त्याच्या त्वचेला स्पर्श करत होती, आणि त्याला तिच्या जवळ असण्याची तीव्रता जाणवत होती. त्यांच्या श्वासांचा वेग हळूहळू वाढू लागला, जणू त्यांचं प्रेम आता शब्दांच्या पलीकडे जाऊन एकमेकांच्या हृदयात उतरत होतं. बागेतली शांतता आणि त्यांच्या जवळीकेची उब यामुळे त्या क्षणाला एक अविस्मरणीय स्वरूप प्राप्त झालं होतं.
राजनने तिच्या नजरेत खोलवर पाहिलं. तिचे डोळे त्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जात होते. आणि मग, सहजच, त्याच्या ओठांवर एक नाव आलं…
"रजनी..."
त्या दोन अक्षरांनी संजीवनीच्या अंगावर काटा आला. तिच्या मनात एक अनपेक्षित धक्का बसला. ती क्षणभर जणू गोठलीच. तिच्या डोळ्यांतून भावनांचं एक वादळ उसळलं—आश्चर्य, संभ्रम आणि एक अनामिक भीती.
"राजन… तू… तू काय म्हणालास?" तिचा आवाज हलकासा थरथरत होता. तिने स्वतःला सावरायचा प्रयत्न केला, पण तिच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं होतं.
राजनही गोंधळला. त्याला स्वतःच्या तोंडून निघालेल्या त्या नावाची जाणीव झाली आणि तो एकदम घाबरला. "मी… मी… संजीवनी, मी चुकून बोललो…" तो गडबडून म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणा आणि संभ्रम स्पष्ट दिसत होता.
संजीवनी त्याच्यापासून हळूच मागे सरकली. तिच्या डोळ्यांत आता वेदना आणि आश्चर्य यांचं मिश्रण होतं. "चुकून? म्हणजे काय राजन? रजनी कोण आहे? तुझ्या आयुष्यात अशी कोणती मुलगी आहे हे मला का माहिती नाही?" तिच्या स्वरात संभ्रम होता, आणि तिच्या प्रश्नांमध्ये एक अनपेक्षित सत्य शोधण्याची तडफड होती.
"संजीवनी, मला खरंच काही कळलं नाही. मी तुझ्यासोबतच आहे. पण… कधी कधी जुन्या आठवणी…" राजन अडखळत बोलला. त्याला स्वतःला समजत नव्हतं की त्याच्या तोंडून ते नाव कसं निघालं.
"जुन्या आठवणी?" संजीवनीच्या डोळ्यांत आता प्रश्नचिन्ह उमटलं. "म्हणजे माझ्यासोबत असताना तुझ्या मनात दुसरी कोणीतरी आहे? आणि तीही अशी व्यक्ती जिच्याबद्दल मला काहीच माहिती नाही? तू मला कधीच का सांगितलं नाहीस की तुझ्या आयुष्यात रजनी नावाची कोणती मुलगी होती?" तिच्या बोलण्यात आता संभ्रमाबरोबरच एक हलकासा रागही मिसळला होता.
"संजीवनी, असं नको करू… मी तुला दुखवू इच्छित नाही. माझ्या भावना फक्त तुझ्यासाठी आहेत," राजनने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याच्या स्वरात एक विनवणी होती, पण त्याच्या बोलण्यात आत्मविश्वासाचा अभाव होता.
"खरंच?" ती संभ्रमात हसली. तिच्या हसण्यात एक कटुता होती. "मग त्या नाजूक क्षणी रजनीचं नाव का आलं तुझ्या तोंडातून? ती कोण आहे, राजन? मला सांग! माझ्यासोबत असताना तुझ्या मनात दुसरं कोणीतरी का आहे? आणि मला तिच्याबद्दल काहीच माहिती नाही हे तुला योग्य वाटतं?" तिच्या प्रश्नांनी त्याला अस्वस्थ केलं.
राजनला उत्तर सापडत नव्हतं. तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला, जणू त्याच्या मनातही तेच प्रश्न घोळत होते. त्याच्या डोळ्यांत अपराधीपणा आणि गोंधळ स्पष्ट दिसत होता.
संजीवनीचा चेहरा आता कठोर झाला. "तू नेहमी म्हणतोस की आपण नव्याने सुरुवात करायची आहे, पण मला आता शंका येते की तुझ्या मनात अजूनही कोणीतरी आहे जिच्याबद्दल मला काहीच माहिती नाही. मी तुला माझं मन दिलं, प्रेम दिलं, आणि तू मला काय दिलंस? एक अनोळखी नाव आणि संशय?" तिच्या स्वरात आता वेदनेचा सूर होता.
"संजीवनी, मी तुला खरोखरच प्रेम करतो…" राजनने पुन्हा एकदा प्रयत्न केला, पण त्याचे शब्द आता कमकुवत वाटत होते.
"प्रेम?" ती व्यंगाने म्हणाली. "नाही राजन, हे प्रेम नाही. प्रेमात दुसऱ्याचं नाव मनातही येत नाही. पण तुझ्या तोंडून रजनीचं नाव ऐकून मला वाटतंय की माझ्या आयुष्यात तुझ्या भूतकाळातली एक सावली आहे, आणि मला तिच्याबद्दल काहीच माहिती नाही. ती कोण आहे, राजन? तुझ्या आयुष्यात ती कधी होती? आणि मला का सांगितलं नाहीस?"
राजन तिच्या जवळ जाऊ पाहत होता, पण तिने त्याचा हात झिडकारला. "संजीवनी…" त्याने हळूच तिचं नाव घेतलं, पण त्याला पुढे काय बोलावं हे सुचेना.
"राजन, मला एकटं राहू दे. मला विचार करायला वेळ हवा आहे," ती म्हणाली आणि तिच्या स्वरात एक ठामपणा होता. ती वेगाने खोलीत गेली आणि दरवाजा बंद केला.
राजन बागेत एकटाच उभा राहिला. त्याने भिंतीला डोकं टेकवलं. आजच्या रात्रीचं स्वप्न एका चुकीमुळे नकोसं झालं होतं. त्याने डोळे बंद केले आणि स्वतःशीच विचार करू लागला—"रजनीचं नाव का आलं?
त्याला ती पावसाळी रात्र आठवली ज्या दिवशी रजनीही अशीच त्याच्या मिठीत शिरली होती.. म्हणजे आपण आजही रजनीला विसरू शकलो नाही का?
आणि संजीवनीला हे कसं समजावणार?" त्याच्या मनात आता स्वतःबद्दलच संशय निर्माण झाला होता. बागेतला थंड वारा त्याच्या चेहऱ्याला झोंबत होता, पण त्याच्या मनातलं वादळ शांत होण्याचं नाव घेत नव्हतं.
त्या रात्री संजीवनीने खोलीतून बाहेर न येण्याचा निर्णय घेतला. दरवाजा बंद करून ती बेडवर बसली, हात गुडघ्यांभोवती आवळले. खिडकीतून थंड वारा येत होता, पण तिच्या मनातलं वादळ शांत होत नव्हतं. "रजनी…" हे नाव तिच्या मनात प्रश्न आणि भीती घेऊन आलं होतं. ती कोण? राजनने तिच्याबद्दल का सांगितलं नाही? अश्रू ढाळत ती स्वतःशी म्हणाली, "मी त्याच्यावर विश्वास ठेवला, पण आता?"
राजन स्टडीत बसला होता, समोर रजनीसाठी लिहिलेली कोरी डायरी होती. त्या नावाने त्याला स्वतःचाच राग आला. "मी संजीवनीला स्वीकारलं, मग रजनीचं नाव का आलं?" त्याच्या मनात आत्मचिंतन सुरू झालं. डायरी बंद करून तो डोकं हातात घेऊन बसला, संजीवनीचा प्रश्नांनी भरलेला चेहरा त्याला अस्वस्थ करत होता.
दोघांनाही झोप लागली नाही. संजीवनीला वाटत होतं, "तो माझ्यासोबत आहे, पण त्याचं मन खरंच माझ्याकडे आहे का?" रजनीचं रहस्य तिचं मन पोखरत होतं. राजनही विचारात बुडाला होता.
पहाटे संजीवनी बागेत आली, चहाचा कप हातात, पण मन शांत नव्हतं. राजनही बागेत आला, त्याच्या चेहऱ्यावर थकवा आणि अपराधीपणा दिसत होता. शांततेनंतर संजीवनीने विचारलं, "रजनी कोण आहे? मला का माहिती नाही?"
राजन म्हणाला, "ती जुनी आठवण आहे. मी तुला मनापासून स्वीकारलंय." पण त्याच्या बोलण्यात संकोच होता.
"जुनी आठवण? मग माझ्यासोबत असताना ती आठवते? मी तुझ्यासाठी काय आहे—नवीन सुरुवात की पर्याय?" संजीवनीच्या प्रश्नांनी राजन अस्वस्थ झाला. तो गप्प राहिला.
ती पुढे म्हणाली, "मला तुझं संपूर्ण मन हवंय, नुसती जागा नाही. मी काही दिवस दूर जाणार आहे. मला आणि तुला विचार करायला वेळ हवा." तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
"कधी परत येशील?" राजनने कापऱ्या आवाजात विचारलं.
"जेव्हा मला समजेल की तुझ्या मनात फक्त मी आहे," ती म्हणाली आणि आत निघून गेली. त्या पहाटे दोघांच्या मनात प्रश्न होते—संजीवनीला रजनीबद्दल, आणि राजनला स्वतःच्या भावनांबद्दल. उत्तरं वेळच देणार होती.
क्रमशः
Post a Comment
0 Comments