Type Here to Get Search Results !

कथा :- दोन किनारे एक प्रवाह

 #दोन_किनारे_एक_प्रवाह (भाग - ७५)

आज सौरभाचा वाढदिवस होता. निधीने त्याला खास सरप्राइझ द्यायचं ठरवलं होतं. त्यासाठी तिने एक खास प्लॅन आखला.


रात्रीच्या झगमगत्या प्रकाशात मुंबई समुद्रकिनाऱ्यावरच्या लाटांसारखी धडधडत होती.


पंचतारांकित हॉटेलच्या भव्य प्रवेशद्वाराशी उभी राहिलेली निधी सौरभाच्या वाढदिवसाच्या संध्याकाळी आनंदाने उजळून निघाली होती. निळसर हलकासा गाऊन, मोकळे सोनेरी केस, आणि चेहऱ्यावर हलकासा मेकअप… तिच्या मनात एकच इच्छा होती—हा दिवस तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आठवण ठरावा.


सौरभ तिच्या शेजारी होता. तिच्या डोळ्यांत आज स्वप्नांचं एक अनोखं तेज होतं—निखळ प्रेमाचा, विश्वासाचा. पण सौरभच्या मनात मात्र विचारांचं वादळ उसळलं होतं.


त्याच्या हातातला फोन वारंवार व्हायब्रेट होत होता—स्क्रीनवर झळकत होते अनेक मिस्ड कॉल्स... मानसीचे!


क्षणभर तो सुन्न झाला.


"हे बरोबर आहे का? मी निधीच्या स्वप्नांमध्ये एका अशा प्रेमाची जागा घेतोय, जे कदाचित मी तिला देऊ शकत नाही?"


निधीने हसत त्याचा हात धरला.


"सौरभ, आजचा दिवस खास आहे... आपल्या आठवणींचा नवा अध्याय लिहायचा आहे, नाही का?"


सौरभ तिच्याकडे पाहत राहिला. तिच्या आवाजात एक निखळ आनंद होता. पण तो...? तो एका अवघड निर्णयाच्या उंबरठ्यावर उभा होता.


"कसं सांगू तिला? सत्य सांगून तिचा विश्वास तोडावा की तिच्या या स्वप्नांना अजून थोडा वेळ जगू द्यावं?"


त्या रात्री हॉटेलमधल्या जेवणाचे स्वाद मिसळत होते—पण सौरभच्या मनात मात्र कडवटपणाचं सावट दाटून आलं होतं.


हॉटेल स्टाफने त्यांना खास सजवलेल्या टेबलकडे नेलं. गुलाबांच्या पाकळ्यांनी सजलेलं टेबल, हलक्याशा मेणबत्त्यांचा मंद प्रकाश, आणि जणू प्रेमभरल्या क्षणांसाठी जाणीवपूर्वक तयार केलेली संधी... हे सर्व पाहून निधीच्या मनात रोमांच उठला.


तिने डोळे मोठे करून सौरभकडे पाहिलं.


"सौरभ, मला सांगता येणार नाही, मला किती आनंद झालाय! प्रेम म्हणजे काय, मी कधी अनुभवलंच नाही... पण आज मला ते मिळाल्यासारखं वाटतं!"


पण सौरभ... त्याच्या मनात भीतीचं वादळ घोंघावत होतं.


त्याने तिच्या डोळ्यांत पाहिलं. त्या डोळ्यांत विश्वास होता, प्रेम होतं... आणि तोच विश्वास तो मोडणार होता.


सौरभ समोर बसला होता, पण निधीच्या डोळ्यांसमोर मात्र भूतकाळाची दारं उघडत चालली होती.


ती जणू पुन्हा त्या लहानशा कोपऱ्यात पोहोचली होती—एकटी, हरवलेली.


"सौरभ, लहानपणी आई-बाबांचं खूप भांडण व्हायचं... बाबा दिवसरात्र हॉस्पिटलमध्ये असायचे, आणि आई... तिचं आयुष्य क्लब, पार्ट्या, आणि मित्रमंडळींमध्ये गुंतलेलं. आणि मी? एका कोपऱ्यात गप्प बसलेली, आयाच्या भरवशावर वाढणारी मुलगी... जणू कुणाच्याच आयुष्याचा भाग नसलेली." निधीच्या आवाजात दुःख दाटून आलं.  


ती क्षणभर थांबली, मग पुन्हा म्हणाली, "भांडणं इतकी वाढली की मला शेवटी बोर्डिंग स्कूलला टाकलं. सांग ना, दहा वर्षांच्या मुलीला कुणी असं दूर पाठवतं का? तिथं बरीच मुलं होती, पण त्यांचे आई-बाबा त्यांना भेटायला यायचे, मिठीत घ्यायचे. माझे आई-बाबा...? ते कधीतरी यायचे, आणि आल्यावर विचारायचे—'काय हवं तुला? नवीन सायकल? सुंदरसा ड्रेस? की महागडी खेळणी?' मी जे काही मागितलं, ते त्यांनी दिलं, पण सौरभ, मला ते काहीच नको होतं! मला फक्त त्यांचं प्रेम हवं होतं... पण त्यांना ते कधी कळलंच नाही."  


निधीच्या डोळ्यांत आठवणींचे ढग दाटले. "आई-बाबांपैकी कोण चूक, कोण बरोबर, हे ठरवणं मी केव्हाच सोडलंय. बाबा आयुष्यभर पैशाच्या मागे धावत राहिले, आणि आई...? तिला हवं होतं मुक्त आयुष्य. म्हणतात ना, 'आईचं संपूर्ण जग तिच्या मुलांमध्ये असतं.' मग माझीच आई अशी का वागली? तिच्या मनात एकदाही माझा विचार आला नसेल का?" निधीचे शब्द घशात अडकले. "ती तर दुसरं लग्न करून परदेशातही गेली... जणू मी या जगात अस्तित्वातच नाही."  


सौरभ गप्प बसून ऐकत होता. तो पहिल्यांदाच निधीला इतकं उघडपणे बोलताना पाहत होता.  


"सर्वांना वाटतं मी अहंकारी आहे, हट्टी आहे, फक्त स्वतःपुरती विचार करणारी आहे... पण मी अशी नाही सौरभ. माझ्या आई-बाबांनी मला कधी प्रेमच दिलं नाही, तर मी दुसऱ्यांना ते कसं देऊ? मग मीही स्वतःला खुष ठेवण्यासाठी भौतिक गोष्टींच्या मागे लागले. आणि बाबा? त्यांना वाटायचं की मला महागड्या वस्तू दिल्या की मी आनंदी होईन. पण माणूसपणाची उब मिळते का रे पैशाने?"  


सौरभ तिच्या प्रत्येक शब्दावर लक्ष केंद्रित करून ऐकत होता.  


"जेव्हा मी निशांतकाका आणि नॅन्सीकाकूकडे पाहायची, तेव्हा मला खूप हेवा वाटायचा. त्यांचा एकमेकांचा आदर, प्रेम, आपुलकी... मला ते सगळं हवं होतं. मला नेहमी प्रश्न पडायचा—माझे आई-बाबा असे का नाही?" निधीने हलकं हसण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहतच होते.  


सौरभने हलकेच तिचा हात हातात घेतला, आणि तिच्या डोळ्यातून ओघळणारा अश्रू अंगठ्याने पुसला. टेबलावरील पाण्याचा ग्लास तिच्या समोर केला.  


  पण सौरभच्या मनात एक वेगळीच घालमेल सुरू होती. निधी हळूहळू आपल्यात गुंतत चालली आहे… तिच्या डोळ्यांतला विश्वास, तिच्या हसण्यातली सहजता, तिच्या स्वप्नांनी भारावलेली नजर… सगळंच त्याला आतून पोखरत होतं. तो निःशब्द होता, तिच्या आनंदात तो नकळत सामील होत होता. पण या सगळ्यात तो तिच्याशी प्रामाणिक आहे का? ही भावनांची गुंतागुंत खरी आहे का? सत्य सांगायचं, तर कसं? आणि सर्वात मोठा प्रश्न—कधी?  


तेवढ्यात वेटर टेबलजवळ आला.  


"सौरभसाठी स्पेशल!" निधी हसत म्हणाली.  


त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं. टेबलावर त्याच्या आवडत्या पदार्थांची रेलचेल होती—त्याला आवडणाऱ्या मसाल्याच्या छटा, हलकासा तिखटपणा, आणि अगदी त्याच्यासाठी निवडलेलं वाइन.  


इतक्या लवकर तिला कसं कळलं?


"कसं काय माहिती झालं तुला?" त्याने तिच्याकडे पाहत विचारलं.  


"काही विशेष नाही! जेव्हा कोणीतरी मनापासून प्रिय असतं, तेव्हा त्याच्या लहानशा सवयीही आठवणीत कोरल्या जातात." ती मंद हसत म्हणाली.  


तो काहीच बोलला नाही. तिच्या त्या एका वाक्यानं त्याच्या मनातल्या गोंधळावर एक ठिणगी पडली.  


जेवण सुरू झालं. निधी उत्साहाने बोलत होती—त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल, तिच्या मनातल्या नवीन स्वप्नांविषयी. तिच्या प्रत्येक शब्दागणिक सौरभला जाणवत होतं, तो तिच्या विश्वाचा एक अनमोल भाग होत चालला आहे. पण... तोही तिच्या मनासारखाच गुंतला आहे का?  


---


सौरभने क्षणभरासाठी मोबाईलकडे पाहिलं. मानसीचे मिस्ड कॉल्स अजूनही स्क्रीनवर चमकत होते. त्याच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. निधीच्या समोर तो हसरा, तिच्या प्रेमाला प्रतिसाद देणारा प्रियकर होता, पण त्याच्या आत कुठेतरी एक वेगळाच संघर्ष सुरू होता.


तो काहीतरी बोलणार इतक्यात निधी हसून म्हणाली, "सौरभ, तुला माहितेय का? तू माझ्या आयुष्यात आलेला सर्वात सुंदर योगायोग आहेस. तुला पाहिल्यापासून मला असं वाटायला लागलंय की आता मी एकटी नाही..."


ती सांगत राहिली, तिच्या आयुष्याच्या त्या हरवलेल्या, प्रेमाच्या शोधात असलेल्या क्षणांबद्दल. तिच्या प्रत्येक शब्दागणिक सौरभचं मन अधिकच अस्वस्थ होत होतं.


"सौरभ, आजचा दिवस मला नेहमी लक्षात राहील," निधीने हलक्या आवाजात म्हटलं.


सौरभ तिच्या डोळ्यांत पाहत राहिला. तिला खरंच तो प्रिय होता. तिच्यासाठी त्याचं अस्तित्व महत्त्वाचं झालं होतं. पण... तो तिच्या प्रेमाचा योग्य प्रतिसाद देऊ शकणार होता का?


त्याने मोबाईल सायलेंटवर टाकला आणि स्वतःला त्या क्षणात गुंतवून घेतलं.


"चल, एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी!" निधीने उत्साहाने त्याचा हात धरला.


"सरप्राईज?" त्याने कुतूहलाने विचारलं.


"हो!  आजचा दिवस तुझा आहे. मी तुझ्यासाठी काहीतरी खास करायला हवं ना?"


ती त्याला बाहेर घेऊन गेली. समोर समुद्रकिनाऱ्याचं निळंशार पाणी अलगद लाटा उमटवत होतं. हलकासा वारा सुटला होता.


समुद्रकिनाऱ्यावर एका खास जागी टेबल सजवलेलं होतं. कँडल लाइट्स, टपोऱ्या चंद्रप्रकाशात चमकणारी वाळू, आणि लाटांचा मंद आवाज... जणू काही परीकथेतील दृश्य!


"हे सगळं तुला कसं वाटतंय?" निधीने त्याच्याकडे पाहिलं.


सौरभ तिच्या प्रेमाने भारावून गेला होता. तिचा उत्साह, तिचा आनंद, तिचं निखळ प्रेम...


"खूप सुंदर..." तो हळूच बोलला.


थोड्या वेळाने वेटर छोटासा केक घेऊन आला.  


"अगं, कशासाठी?" सौरभनं आश्चर्यानं विचारलं.  


"अरे तुझा वाढदिवस,आपल्या पहिल्या डेटची आठवण!" ती आनंदाने म्हणाली.  


तिने प्रेमभराने केक कापला आणि लपवून ठेवलेलं एक छोटेसे गिफ्ट त्याच्या हातात ठेवलं. तिच्या डोळ्यांत अनामिक उत्सुकता होती.  


सौरभच्या मनात कल्लोळ माजला. बोलायचं होतं, स्पष्ट करायचं होतं, पण शब्दच सापडत नव्हते. इतक्यात त्याच्या मोबाईलचा स्क्रीन हलकासा लखलखला—मानसीचे बरेच मिस्ड कॉल्स!


क्षणभर त्याचं मन सुन्न झालं. हे काय चाललंय? कुणाशी काय बोलावं? कुठल्या नात्याला महत्त्व द्यावं?


त्याने नकळत हातातलं गिफ्ट घट्ट पकडलं.  


"अरे, उघडणार नाहीस?" तिने हळूच विचारलं आणि तिच्या हसऱ्या डोळ्यांत एक छोटासा विश्वास दाटून आला.  


त्याने काही न बोलता गिफ्टकडे पाहिलं, आणि निधीनं स्वतःच त्यावरची नाजूक रिबिन उलगडली. एक सुंदर हार्ट शेल पेंडंट!आत दोघांचे फोटो होते—ती आणि सौरभ… एका सुंदर क्षणात बंदिस्त.  


सौरभने ते हातात उचललं. त्या छोट्याशा गोष्टीने त्याच्या मनावर जड झालेलं ओझं अधिकच गडद झालं.  


त्या हळव्या क्षणात तिचे डोळे त्याच्याकडून काहीतरी अपेक्षा करत होते—एक हसू, एक मिठी, किमान एक शब्द...  


पण त्याच्याकडून काहीच उमटत नव्हतं.  


त्याच्या मनात एकच प्रश्न घुमत होता—मी हिला हे प्रेम देऊ शकतो का? की तिला एका फसव्या स्वप्नात ठेवतोय?  


तेवढ्यात, त्याचा फोन पुन्हा व्हायब्रेट झाला. मानसी...


"सौरभ, मी तुझ्यावर खरंच खूप प्रेम करते," निधी म्हणाली, तिच्या डोळ्यांत अनामिक चमक होती.


सौरभ गप्प राहिला. त्याच्या हृदयात प्रामाणिकतेचा आणि सत्याचा संघर्ष सुरू होता.


फोन पुन्हा व्हायब्रेट झाला.


हा गोंधळ कधी संपणार होता? आणि सत्य बाहेर येण्याचा तो निर्णायक क्षण कधी येणार होता?


क्रमशः

Post a Comment

0 Comments