"विस्मृतित गेलेले व्यवसाय"!
१९६५-७० च्या सुमारास घरोघरी गॅस कनेकशन
मिळायला सुरवात झाली.त्यावेळेस बरशेन आणि एस्सो या दोन कंपन्याचे सिलेंडर मिळायचे.
पण त्या पूर्वी घराघरात मुख्यत्वे स्वयंपाकासाठी स्टोव्ह(क्वचित चूल)आणि आंघोळी साठी पाणी तापवायला बंब किंवा ॲल्युमिनीयमच भांड स्टोव्हवर किंवा बाहेर अंगणात चूल हे ठरलेले पर्याय.
आणि यासाठी कोळसा,बंबफोड ,कांडी कोळसा हे
व्यवसाय करणार्या वखारी जागोजागी होत्या.(बर्याच वखारी या सरदारजींच्या होत्या)
पुढे जसं गॅस कनेकशन घरोघरी मिळू लागलं तसतसं
कोळसा-बंबफोड याचा वापर कमी कमी होत गेला
आणि या लाकडाच्या वखारी ही.
त्याकाळात अंधार पडल्यावर रस्त्यावर एकंदर उजेड कमीच असायचा.मग वरात,भिक्षावळ आणि प्रेतयात्रा यासाठी गॅस बत्ती लागायचीच.या गॅस बत्ती भाड्याने पुरवणारे अगदि मोजकेच होते.(केळकर रोड वरील "वारे ॲन्ड सन्स"हे प्रसिद्ध होते.त्यांच्या दुकानावरून मेहुणपुर्या कडे जाताना कोपर्यावरील कट्यावर या गॅस बत्या रचून ठेवलेल्या असायच्या.तसंच भिंतीवर भलं मोठं वाघाच चिंत्र अजून ही आठवतं)
बॅन्ड चा आवाज आणि गॅस बत्यांच्या उजेडातील वरात-भिक्षावळ बघायला सगळी जनता वाड्याच्या दारात यायचीच.
त्यावेळेस पुणे हे सायकलींच शहर होतं.घरोघरी सायकल असायचीच.किरकोळ दुरूस्ती,हवा भरायला,पंक्चर काढायला"सायकल मार्ट"कोपर्या कोपर्यावर होते.पूर्वी हवा भरायला एक पंप असायचा.खालच्या बाजुच्या दोन पट्या पायात दाबून वरून पंप मारला जायचा.नंतर एक छोटा काॅम्प्रेसर आला.त्याच्या लांब नळीच एक छोटं गोल पितळी तोंड सायकलच्या व्हाॅल्वला लावलं की दुकानदार आतील बटण चालू करीत.मग एक हलकासा धड-धड आवाज यायचा.अंगठ्याने टायर दाबून हवा किती भरली याचा अंदाज घेतला जायचा.एका चाकात हवा भरून झाली आणि दुसर्या चाकात हवा भरण्यासाठी नळी काढली की फुssssस्स् असा आवाज यायचा.
सध्याचा जमाना फ्लेक्स चा.त्यामुळे आता न दिसणारे व्यावसायिक म्हणजे बोड॔ रंगवणारे पेंटर. अप्पा बळवंत चौकात पेंटर फडके,बुधवार चौकातील पेंटर बेडेकर,कसबा गणपती जवळील पेंटर देव,दत्त मंदिरा जवळील पेंटर करी हे प्रमुख पेंटर म्हणून आठवणारी नावं.
पेंटर फडके हे मुख्यतः नाटकाचे बोड॔ रंगवायचे.
असेच काही फिरते व्यावसायिक आता दिसत नाहीत.
त्यापैकी एक,ज्यांच काम बघण्यात वेळ कसा जायचा ते कळत नसे,ते म्हणजे कल्हई वाले.
जिथं कल्हई लावायची आहे तेथील माती थोडं पाणी टाकून, उकरून एक खड्डा केला जायचा.मग हवा मारणार्या एक कातडी पिशवीच तोंड(नंतर एका हाताने हॅन्डल फिरवून हवा देणारा ब्लोअर आला)त्या खड्ड्या जवळ ठेवलं जायच. खड्ड्यात कोळसे ठेवून ते पेटवले जायचे आणि हवा देऊन फुलवले जायचे.चांगले फुलले की त्यावर भांड ठेवलं जायचं.
भांड तापल की थोडं जस्ताच टोक फिरवलं जायच.त्याची चांदी सारखी चमकदार गोळी बोळ्याने भांडभर फिरवली जायची. त्यात नवसागरची पूड टाकली की विशिष्ट वासाचा धूर यायचा. वितळलेलं जस्त बोळ्याने भांडभर फिरवल जायचं.भांड चांदी सारखं चमकदार झालेलं.बाहेरच्या बाजुन तापुन लाल झालेलं भांड जवळील बादलीतील पाण्यात बुडवलं जायचं. त्याचा चर॔र॔र॔ असा मजेदार आवाज यायचा.कल्हई झालेली भांडी चांदी सारखी चमकायची.
आता अजिबातच न दिसणारे म्हणजे कापूस पिंजून देणारे पिंजारी.
त्यांच्या खांद्यावर असलेली धनुष्याकृती "धनुकली"
एवढं एकच कामासाठी लागणारं साहित्य.बोटानी त्याच्या वादी छेडल्या की एक टणत्कारा सारखा आवाज यायचा.
कुणाच्या जुन्या-फाटक्या गाद्यातील कापूस पिंजून देत असत. क्वचित नविन गादी ही बनवून देत असत.
आता प्लॅस्टिक चा जमाना असल्यामुळे लोखंडाच्या वस्तू(कढई-तवा सोडल्यास)जवळपास वापरात नाहीतच.पूर्वी बादल्या लोखंडी असल्यामुळे गंजून भोकं पडली की गळायच्या.मग बुड बदलाव लागायचा.हे काम करणारे लोक वाड्यात आले की त्यांच्याकडून हे काम केलं जायच.त्यांच्याकडे एक मोठी पत्र्याची पेटी,पत्र्याचे लहान-मोठे तुकडे आणि पत्रे कापण्यासाठी एक भली मोठी कात्री असं
सामान असायच.
आता मिक्सर मुळे पाटा-वरवंटा आणि तयार अष्टगंध
मुळे सहाण-खोड या वस्तू जवळपास हद्दपार झाल्यातच जमा आहेत.वापरून वापरून पाटा, सहाण गुळगुळीत व्हायचे.मग त्याला टाकी मारावी लागायची.हे काम करणार्या वडार बायका
"टाकी लावायची का टाकी"असा आवाज देत वाड्यात यायच्या.
काळ जसा पुढे सरकतो तसं नविन आधुनिक वस्तू, यांत्रिकीकरण यामुळे काही गोष्टींचा वापर कालबाह्य होत जातो.वस्तू अडगळीत किंवा भंगार वाल्या कडे जातात.मग त्यावर पोट भरणारे असे छोटे-मोठे व्यावसायिक देखील विस्मृतित जातात.
Post a Comment
0 Comments