Type Here to Get Search Results !

महासरस्वती

 *‼बासरची श्री महासरस्वती‼*


*नांदेड - निजामाबाद रेल्वे मार्गावर धर्माबादनंतर १० कि. मी . अंतरावर बासर हे रेल्वेस्टेशन आहे.*


स्वातंत्र्यपूर्वी मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात हे गाव होतं, मात्र राज्य पुनर्रचनेच्या वेळी ते आंध्र प्रांतात गेले. 

या घटनेला ही जवळपास पंचेचाळीस वर्ष होताहेत. तरीही या गावावर मराठी संस्कृतीची जबरदस्त पकड आहे. 

आज मध्यम लोकवस्तीचं जरी हे गाव असलं तरीही हजारो वर्षांची परंपरा या गावाला आहे, या परिसराचं प्राचीनत्व महाभारत पूर्वकालापर्यंत जातं , महर्षी व्यासांनी याच क्षेत्री गोदावरीच्या काठी पाच हजार वर्षांपूर्वी घोर तपश्चर्या केली होती. त्यांना महासरस्वती प्रसन्न झाली, त्यामुळे ते ' महाभारता' सारखा अजोड ग्रंथ लिहू शकले. आचार्य परंपरेत त्यांचं स्थान सर्वोच्च आहे.


ज्या परिसरात महर्षी व्यासांना श्री महासरस्वती प्रसन्न झाली त्याच परिसरात त्यांनी वाळूपासून श्री सरस्वतीची मूर्ती तयार करून तिची प्राणप्रतिष्ठा केली. 


*संपूर्ण भरत खंडात हे एकमेव श्री महासरस्वतीचं मंदिर आहे.*


 त्यामुळे देशभरातून लक्षावधी भाविक नित्यनेमाने इथे दर्शनासाठी येतात. अनेकजण अनुष्ठानं करतात. 

श्री महासरस्वतीचं मंदिर हेमाडपंती असून देवीची मूर्ती जवळपास तीन फूट आहे. मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराचा सभामंडप फार मोठा नाही. अर्ध्या भागात देवघर, गाभारा तर अर्ध्या भागावर सभामंडप आहे. देवीच्या पवित्र पादुका देवीपासून थोड्या अंतरावर असून याच पादुकांवर मंदिराचं शिखर आहे. दिवसातून दोन वेळा मंत्रघोषात देवीची महापूजा होते. देवीला दही-दुधाचे स्नान घातल्यानंतर जे तीर्थ बाहेर येते त्याला सोमसूत्र असे म्हणतात. भक्त मोठ्या श्रद्धेने ते प्राशन करतात.


*जीवसृष्टीमध्ये ज्ञानामुळेच माणूस श्रेष्ठ आहे.*


मंदिरासमोरच्या टेकडीवर अगदी जवळच महर्षी व्यासांनी महालक्ष्मी आणि महाकालीची प्रतिष्ठापना केली आहे. म्हणजे या पवित्र क्षेत्री श्री महासरस्वती, श्री महाकाली आणि श्री महालक्ष्मी या त्रिगुणात्मक महाशक्तीची महर्षी व्यासांनी प्रतिष्ठापना करून अखिल मानवजातीचं कल्याण केलं, या जगन्माऊलीच्या दर्शनानं आयुष्यातील दुःख, संकट संपून मनाला सात्विक समाधान लाभते. म्हणून शेकडो माणसं इथे अनुष्ठान करतात. 


अन्य शक्तीपीठात भक्तगण प्रामुख्याने नवरात्रात घटी बसतात, अनुष्ठानं करतात पण बासर येथील सरस्वती मंदिरात अखंड सप्तशतीचं पाठ चालू असतात. अनेक सत्पुरुषांनी, संतमहंतांनी चा पवित्र क्षेत्री अनुष्ठानं केल्याची नोंद सापडते.


' दुर्गे दुर्गट भारी' या आरतीचा कर्ता नरहरी मालू यांनी श्री महासरस्वतीच्या मंदिरात किती तरी वर्षे अनुष्ठानं केली. ज्या गुहेत अनुष्ठानं केली ती गुहा आजही पहावयास मिळते. भक्तगण मोठा श्रद्धेनं या गुहेचं दर्शन घेतात, श्री शंकराचार्यांनी येथे अनुष्ठान केलं होतं तर अनेक योगी पुरुषांनी इथे यज्ञ केल्याची नोंद कागदपत्रात सापडते. धवलवस्त्र परिधान केलेली महासरस्वती भक्ताच्या कल्याणासाठी इथ उभी आहे. भगवती कल्यणदायी आहे.


देशभरात देवीची ५१ शक्तीपीठे आहेत. त्यात बासर येथील श्री महासरस्वतीचं स्थान अत्यंत श्रेष्ठ आहे. ज्ञान हाच माणसाचा खरा अलंकार आहे. जीवसृष्टीमध्ये ज्ञानामुळेच माणूस श्रेष्ठ आहे. सरस्वतीच्या आशीर्वादाने माणसाच्या आयुष्याचं सोनं होतं, कविकुल गुरू कालिदास याचं उदाहरण आहे. नवरात्र महोत्सवात हा परिसर माणसांनी फुललेला असतो, देवीची महापूजा, मंत्रघोष, सप्तशतीचे पाठ, भजन, आरती आणि जयघोषांनी वातावरण नुसतं आनंदानं ओसंडत असतं, धूप-दीप गंधांनी मन प्रसन्न होतं, शेकडो भक्त घरी बसलेले असतात दसर्‍याच्या दिवशी श्री महासरस्वतीची पालखीतून गावभर मिरवणूक निघते, सारे रस्ते झाडून सडा शिंपडून सुंदर रांगोळ्यांनी रेखाटलेले असतात. तर माय माऊली दारासमोर जरीकाठी नेसून हातात पंचारती घेऊन मोठा प्रसन्न मनानं उभ्या असतात. औक्षण अन्‌ फुलं उधळल्यानंतर पालखी हळूहळू पुढे सरकते. गावभर नुसता आनंदोत्सव असतो.


माघ वद्य १४ पासून फाल्गून शुद्ध प्रतिपदेपर्यंत येथे फार मोठी यात्रा भरते. अन्नदानही मोठ्या प्रमाणात होते. यावरून याच काळात महर्षी व्यासांनी श्री महासरस्वतीनं दर्शन दिलं असावं, किंवा महर्षी व्यासांनी प्राणप्रतिष्ठा केलेली असावी म्हणूनच हजारो वर्षांपासून या काळात आनंदोत्सव साजरा केला जातो.


दगडावर रचलेली दगडे या परिसरात आणखी एक आश्चर्य पहावयास मिळते. भल्या मोठे दगडावर दगडं इथे रचलेले आहेत, या संदर्भात कथा व लोककथा प्रचलित आहेत. लंकाधीश रावणाने सीता देवीला पळवून नेत्यानंतर प्रभू रामचंद्र अस्वस्थ झाले. वानर सेनेने शोध सुरू केला. शोध घेता घेता मारूतीराय या परिसरात आले व त्यांनी आपण आल्याची खूण म्हणून दगडाची उतरंड रचली अशी कथा लोकगीतातून, लोककथेतून आढळते, तरीही या प्रंचंड मोठा दगडाची उतरंड कुणी रचली? व का रचली? का हा निसर्गाचा चमत्कार आहे? या प्रश्नाचं नेमकं उत्तर आजपर्यंत कुणालाही गवसलं नाही, असाच चमत्कार कर्नाटक प्रांतातील हम्पीजवळ दिसतो. तिथेही अशाच लोककथा सांगितल्या जातात, सुग्रीव, वाली, हनुमान या महाबलीचा, वानरराजाचा हा परिसर आहे. बासरजवळील दगडाच्या उतरंडीतून पितळी भांड्यांसारखा आवाज येतो, हे एक फार मोठे आश्चर्य आहे.


श्री महासरस्वती मंदिरासमोर कांही अंतरावर एक भव्य सरोवर आहे. कधीकाळी हे उत्तम बांधलेलं होतं, पण आज मात्र ढासळलेला आहे. या तलावातील पाणी कधीच आटत नाही या तलावाला अष्टतीर्थ असेही म्हणतात. कारण या तलावाच्या काठी हजारों वर्षांपूर्वी इंद्र, वरूण, यम, कुबेर, वायू, चंद्र यांनी तपश्चर्या केल्यामुळे हा तलाव अमरतीर्थ म्हणून ओळखला जातो तर मंदिरासमोर पिंपळ-लिंब, औदुंबर वृक्ष श्री महासरस्वतीवर चवर्‍या ढाळीत आहेत. श्री महर्षी व्यासांनी स्थापन केलेली श्री महासरस्वतीची मूर्ती अत्यंत रेखीव अन्‌ प्रसन्न आहे की, समोर कितीही वेळ बसलो तरी मन तृप्त होत नाही. एवढं देखणं रूप आहे. महर्षी व्यासांनी ते शब्दबद्ध केलं आहे.


*या कुन्देंदुतुषार हार धवला या शुभ्र वस्त्राव्रता।*

*या वीणावरदण्डमंडित करा या श्वत पद्मासना॥*

*या ब्रम्हाच्युतशंकर प्रभूर्तिभिः देवैः सदा वंदिता*

*सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्या पहा॥*


*शुभ्र वस्त्र परिधान केलेली, वीणाधारिणी, सुहास्यवदना श्री महासरस्वती पांढर्‍या कमलदलावर अत्यंत शोभून दिसते, दिव्यत्वाचा, मांगल्याचा साक्षात्कार होतो, अशा महासरस्वतीला सृष्टीनिर्मात्या ब्रह्मदेवापासून श्री शंकरापर्यंत सर्वच देव वंदन करतात, दर्शनानं आयुष्याचं कल्याण होतं, म्हणून देशभरातून लक्षावधी भाविक दर्शनास येतात.*


*विद्यां देहि सरस्वती बुद्धिं देहि सरस्वती।*


*ज्ञानं देहि सरस्वती मुक्ति देहि सरस्वती॥*⛳⛳⛳

Post a Comment

0 Comments