*☘️प्रीत उमलताना*
*🔖भाग 11*
*दुपारी जेवता जेवता स्वप्नालीने आज संध्याकाळी ती तिच्या मित्र आणि मैत्रिणींसोबत बाहेर जात असल्याचे आईला सांगितले. जेवण करून ती तिच्या खोलीत आली आणि तिने तिचा मोबाईल हातात घेतला. तर एका अनोळखी नम्बरवरून तिला काही मेसेजेस आलेले दिसले. तिने ते मेसेज उघडले असता तिला समजलं कि हा नंबर विकासाचा आहे. त्याने त्याच्या घराचा पत्ता तिला मेसेज केला होतां. तिने घड्याळाकडे पहिले तर दुपारचे दोन वाजून गेले होते. तिच्या घरून विकासाच्या घरी जायला तिला अर्धा तास लागला असता.*
म्हणजे तिला आताच तयारी करावी लागणार होती. स्वप्नाली लगेच उठली आणि तिने तिची तयारी करायला सुरुवात केली. पण तिचा सगळा गोंधळ उडाला होता. विकासाच्या घरी कोण कोण असेल? त्याच्या घरी कसली कपडे घातली पाहिजेत? अशा प्रश्नांमुळे स्वप्नाली काय घालायचे? कशी तयारी करायची? याचा निर्णय घेऊ शकत नव्हती. कपाटातले सगळे कपडे तिने बाहेर काढली होती. सरतेशेवटी तिने निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस निवडला. त्या ड्रेसला साजेसा असा हलका मेकअप केला. आणि तिने घड्याळात पहिले तर साडे चार वाजत आले होते. तिने आईला ती जात असल्याचे सांगितले आणि ती घरातून बाहेर पडली.
स्वप्नालीने बिल्डिंगच्या खाली तिची गाडी पार्क केली आणि ती लिफ्टने विकासच्या फ्लॅटकडे गेली. तिने दारावरची बेल वाजवली. तर विकासनेच दरवाजा उघडला. त्याने तिच्याकडे पहात एक हलकी स्माईल केली आणि तिला आत बोलावले. स्वप्नाली सोफ्यावर बसली होती. बसल्या बसल्या तिने घराचे निरीक्षण सुरु केले. तो एक दोन BHK फ्लॅट होता. घरात फारसं फर्निचर नव्हतं. पण ज्या गोष्टी होत्या त्या जागच्या जागी होत्या. सगळा हॉल अगदी टापटिपीत ठेवला होता. इतक्यात विकास सरबत घेऊन बाहेर आला. सोबतच त्याने खाण्यासाठी काही स्नॅक्स देखील आणले होते. विकास स्वप्नालीशेजारी बसला आणि तिच्या कडे पाहत तो हसत म्हणाला "घे ना सरबत; मग आपण निवांत गप्पा मारू." स्वप्नालीने सरबताचा ग्लास उचलला आणि त्याला विचारले "घरात अजून कोणीच नाही का? I mean तुमची फॅमिली?" विकासने तिच्याकडे पहिले आणि तो म्हणाला इथे मी आणि माझी आई आम्ही दोघेच राहतो. माझे वडील मी लहान असतानाच वारले. मग त्यांच्या माघारी आईनेच मला आणि माझ्या दोन लहान बहिणींना लहानाचे मोठे केले. आता माझ्या दोन्ही बहिणी लग्न करून त्यांच्या त्यांच्या घरी सुखात आहेत. " हे ऐकून स्वप्नाली म्हणाली " मग तुमच्या आई दिसत नाहीत कुठे?" ते ऐकून विकास पुन्हा हलकासा हसला. त्याच्या त्या हसण्यात स्वप्नालीला पुन्हा ती जुनी उदासी दिसली. तेव्हा ती म्हणाली "काय झालं विकास काही प्रॉब्लेम आहे का?" त्यावर विकास तिला म्हणाला " नाही माझ्यासाठी तर काही प्रॉब्लेम नाहीये. पण कदाचित बाहेरच्या लोकांसाठी तो एक मोठा प्रॉब्लेम आहे." असं म्हणत त्याने स्वप्नालीच्याकडे पहिले. तर तिच्या चेहऱ्यावर काहीच न समजल्याने भाव होते. ते भाव पाहून विकासने पुढे बोलणे सुरु केले. " नॉर्मली एक मुलगा आणि एक मुलगी याना जर पहिल्यांदा भेटायचे असेल तर ते कोणतीतरी छान रोमँटिक जागा निवडतात. असं असताना देखील मी मात्र तुला सरळ माझ्या घरीच बोलावले याचं तुला नक्कीच आश्चर्य वाटले असेल." त्यावर स्वप्नाली म्हणाली " नाही सर आश्चर्य नाही वाटले. कारण गेल्या पाच सहा महिन्यात मी जितकं तुम्हाला ओळखू लागले आहे त्यावर मला माहित होतं कि तुमच्या या वागण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. त्यामुळे मला आश्चर्य कमी आणि त्यामागचं कारण जाणून घेण्याची जास्त उत्सुकता आहे." तिचं हे बोलणं ऐकून विकास हसला आणि म्हणाला " स्वप्नाली तुझा हाच समजूतदारपणा मला फार आवडतो. चल तर मग तुझी उत्सुकता मी जास्त ताणून नाही धरत." असं म्हणत तो उठला आणि एका बेडरूमकडे तो जाऊ लागला. स्वप्नाली देखील उठली आणि विकासाच्या मागे चालत जाऊ लागली.
बेडरूमचे दार उघडताच स्वप्नाली थबकली. समोर बेडवर एक साठीच्या आसपासची बाई पडली होती. विकास तिच्या जवळ जात बेडवर बसला. आणि स्वप्नाली कडे पाहत तिला आत बोलावले. स्वप्नाली आत जाऊन बेडच्या बाजूला उभी राहिली. विकास तिला म्हणाला " ही माझी आई; " त्याने हळूच त्याच्या आईला हाक मारली. तिने डोळे उघडताच तिला समोर स्वप्नाली उभी दिसली. विकासच्या आईने विकासाकडे पाहिले. आणि डोळ्यांची हालचाल केली. विकास निरागसपणे हसला आणि त्याच्या आईकडे पाहत म्हणाला "अगं हि माझ्या ऑफिसमधली एक मैत्रीण आहे. सहज आली होती तुला भेटायला." ते ऐकून विकासच्या आईच्या चेहऱ्यावर हसू फुललं. स्वप्नाली मात्र स्तब्ध झाली होती. तिला नक्की काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजत नव्हते. ती एकदम थिजल्यासारखी उभी होती. तिची ती अवस्था जाणून विकास बेडवरुन उठला आणि त्याच्या आईला म्हणाला " आई तू झोप आम्ही आहोत बाहेर." असे म्हणतच तो उठला आणि बाहेर जायला वळला. स्वप्नाली देखील त्याच्यासोबत बाहेर आली. दोघेही सोफ्यावर बसले होते. काही वेळ तसाच गेला पण कोणीही बोलत नव्हते. स्वप्नालीला नक्की काय बोलावे हेच समजत नव्हते. तिची ती अवस्था समजून घेऊन विकासदेखील काही काळ शांत होता.
थोड्यावेळाने तो स्वप्नालीला म्हणाला "मला वाटत आता तुला समजलं असेल मी तुला बाहेर कुठेही न भेटता माझ्या घरी का बोलावले असेल ते." विकासाचे ते बोलणे ऐकून भानावर येत स्वप्नाली म्हणाली " त्यांना नक्की काय झालं आहे?" त्यावर विकास म्हणाला "ती एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि तीच गोष्ट माझ्या आत्ताच्या वागण्याला कारणीभूत आहे. पण मला आता तुझ्यापासून काहीच लपवायचे नाही. खरतर माझ्या मनाचा तो कप्पा मी खूप वर्षांपूर्वी सगळ्यांसाठी बंद केला होता. पण गेल्या सहा महिन्यातल तुझं वागणं आणि तुझी विचार करायची क्षमता पाहून तू हलक्या हाताने हा कप्पा उघडला आहेस."
*विकास हे बोलत असताना स्वप्नाली विकासाकडे बघत होती. तिने हळूच विकासाचा हात तिच्या हातात घेतला आणि ती म्हणाली " विकास जर तुम्हाला त्रास होणार असेल तर तुम्ही काही सांगितले नाही तरी चालेल." त्यावर हलका हसत विकास म्हणाला "नको स्वप्नाली काही गोष्टी योग्य वेळी समजल्या तर सगळ्यात चांगलं असतं. आणि मला खरच वाटतं हीच ती वेळ आहे."*
*स्वप्नालीचा हात तसाच हातात ठेऊन विकास सांगू लागला.*
*क्रमशः.....*
Post a Comment
0 Comments