Type Here to Get Search Results !

No title

 *फोर बर्नर थिअरी* बद्दल ऐकलंय का तुम्ही कधी? सुंदर रूपक आहे. 

तुमचं आयुष्य म्हणजे जणू चार बर्नर असलेला गॅसस्टोव्ह आहे असं समजा. *कुटुंब, मैत्री, आरोग्य आणि व्यवसाय* ह्या त्या चार चुली. *ऍटोमिक हॅबिट्स* ह्या पुस्तकाचे लेखक *जेम्स क्लिअर* यांनी लोकप्रिय केलेली ही कल्पना. कुठल्याही व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक ऊर्जा ही मर्यादित असते. ती ऊर्जा म्हणजे आपापला गॅस सिलिंडर समजा. फोर बर्नर थियरी हे रूपक आपल्याला सांगतं की हे चारही बर्नर एकाच वेळी मोठ्या आचेवर ठेवले तर आपली ऊर्जा लवकर संपून जाईल आणि आपण पूर्णपणे बर्नआऊट होऊ. जे लोक आपापल्या क्षेत्रात अतिशय यशस्वी होतात त्यांना ह्या चार पैकी एक तरी बर्नर कधीतरी बंद करावाच लागतो. बहुतेक लोकांसाठी ‘मैत्री’ हा बंद होणारा पहिला बर्नर असतो, मग कुटुंब, मग आरोग्य आणि सर्वात शेवटी काम! 


पण एखादा बर्नर पूर्णपणे बंद न करता, आपण जीवनाच्या कुठल्या टप्प्यावर आहोत, आपलं प्राधान्य कशाला आहे हे समजून ते दोन बर्नर त्या वेळेला मोठ्या आचेवर ठेवून इतर दोन बर्नर सिमवर ठेवता आले तर? आपापल्या स्वयंपाकघरात आपण ते करतोच की, भाताला आधण आलं की उष्णता कमी करून भाजीच्या कढईची उष्णता वाढवतो. तसं केलं नाही तर गॅस पण संपेल आणि जे आपण बनवतोय तेही करपून जाईल हे आपल्याला समजतं. तोच धडा आपण आपल्या जीवनात गिरवायला सुरु केला तर? 


फोर बर्नर थियरी हा कुठला मानसशास्त्रीय सिद्धांत नाहीये. ही एक रूपकात्मक मांडणी आहे. पण मला ही संकल्पना खूपच आवडली. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे टप्पे येतात. काही काळ असा असतो  जेव्हा आपापल्या कामाला प्राधान्य द्यावंच लागतं. शिक्षणाचा काळ, 

स्पर्धा परीक्षा, व्यवसाय उभारणी, एखादा महत्त्वाचा व्यावसायिक प्रकल्प. अश्या वेळी कामाचा बर्नर जोमाने पेटतो. कुटुंब, मैत्री, आरोग्य सर्वांकडे दुर्लक्ष होतं. पण अश्या वेळी इतर बर्नर्स कडे पूर्णपणे दुर्लक्ष न करता ते मंद आचेवर ठेवता आले तर? 


पुढे आयुष्यात एक टप्पा असाही येतो जेव्हा कुटुंब केंद्रस्थानी येतं. नवीन संसार उभारताना, मुलं लहान असताना, आई-वडील म्हातारे होत जाताना, घरातलं कुणी आजारी असताना.. अशा वेळी कुटुंबाचा बर्नर मोठ्या आचेवर असावाच लागतो. पण आरोग्य, काम आणि मैत्री असे उरलेले तीन बर्नर पूर्णपणे बंद करून चालत नाही. आरोग्याबाबत बोलायचं तर शरीर हाच फार कठोर गुरु आहे. आपण त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं, तर ते आपल्याला धडा शिकवतंच. म्हणून आरोग्य बिघडतं तेव्हा इतर बर्नर आपोआपच मंदावतात, कधीकधी पूर्णपणे बंदही पडतात, त्यामुळे *आरोग्य हा बर्नर सदैव चालू असलाच पाहिजे.*


आयुष्याचं संतुलन म्हणजे हे चारही बर्नर सदैव सारख्या आचेवर ठेवणं नव्हे. ते अशक्य आहे. संतुलन म्हणजे एक-दोन बर्नर पूर्णपणे बंद करून उरलेले मोठ्या आचेवर धगधगत ठेवणे हे ही नाही. संतुलन म्हणजे योग्य वेळी योग्य बर्नरची उष्णता वाढवणं, आणि इतर बर्नर्स बंद न करता त्यांना मंद आचेवर जिवंत ठेवणं. कामाचा काळ कठीण असला तरी कुटुंबासोबत संवाद आणि जेवण, दररोज थोडासा तरी व्यायाम, जुन्या मित्र-मैत्रिणींना अधूनमधून तरी भेटत राहणं. हे सगळं म्हणजे मंद आचेवर चालू ठेवलेले इतर बर्नर्स. 


आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपला प्राधान्यक्रम वेगळा असतो, किंबहुना असायला पाहिजे. २५ वर्षांच्या व्यक्तीच्या प्रायॉरिटीज  वेगळ्या, ४५ वर्षांच्या व्यक्तीच्या वेगळ्या, ६० वर्षांच्या व्यक्तीच्या वेगळ्या. खरा प्रश्न हा नाहीच आहे की, ‘मी सगळं एकाच वेळी करू शकते का?’ खरं शहाणपण हे समजण्यात आहे की *आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर कुठली चूल धडधडून पेटायला हवी* आणि कुठली मंद आचेवर असायला हवी. ज्या व्यक्तीला हे कळलं *त्याचं आयुष्य शांत, समतोल आणि सुखी होणारच!*

Post a Comment

0 Comments